Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मराठ्यांची राजधानी म्हटल की सातारा जिल्ह्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. निसर्ग संपन्नतेने नटलेला सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी आणि फौजींचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो. शुरवीरांची परंपरा लाभलेल्या या सातारा जिल्ह्यात अनेक गडकिल्ले अगदी थाटात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. ज्या प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी काढला, त्या प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर Ajinkyatara Fort उभारण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा अजिंक्यतारा सप्तर्षी, सातारचा किल्ला अशा विविध नावांनी ओळखला जातो. सातारा शहरामध्ये असणारा हा किल्ला सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी पदभ्रमंती करण्याच्या दृष्टीने अगदी योग्य गड आहे. गडावरून सातारा शहराचे सुंदर दृश्य नजरेस पडते. अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी होय. पहिली राजगड, त्यानंतर रायगड, जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. 

अजिंक्यतारा आणि इतिहास

सातारा जिल्ह्याचे इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच अनुषंगाने अनेक सत्तांनी साताऱ्यात सत्ता उपभोगली. इतिहासात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, शिलाहार वंशीय दुसरा भोज याने इ.स 1690 साली साताऱ्याचा किल्ला बांधला. त्यानंतर बहामनी आणि विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात हा किल्ला होता. आदलिशहाने बराच काळ अजिंक्यतारा किल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तार करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्या अनुषंगाने साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी त्यांनी कंबर कसली आणि 27 जुलै 1673 साली अजिंक्यतारा स्वराज्यात दाखल झाला.

दरम्यान, इ.स 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबीला अजिंक्यतारा किल्ल्यावर कैदेत ठेवले होते. तसेच बजाजी निंबाळकरला सुद्धा गडावरील तुरूंगात डांबण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंजेबाने आपली पंख पसरवायला सुरुवात केली होती. महाराष्ट्रात आल्या नंतर त्याने इ.स 1699 मध्ये त्याने अजिंक्यताराला वेढा घातला. गडावर प्रयागजी प्रभू गडाचे किल्लेदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होते. मोठ्या शर्तीने त्यांनी किल्ला लढवला. मुघलांना मराठ्यांनी अक्षरश: रडवले. त्यामुळे त्यांनी 13 एप्रिल 1700 च्या पहाटे सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि मंगळाईचा बुरूजावर हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात तटावर असणाऱ्या काही मराठ्यांनी वीरमरण आले.

मुघलांनी केलेल्या या स्फोटात किल्लेदार प्रयागजी प्रभु देखील सापडले होते. मात्र, त्यांना फार गंभीर इजा झाली नव्हती. याच दरम्यान मुघलांनी दुसरा स्फोट घडवून आणला. मात्र, यावेळी मुघलांचा डाव त्यांच्यावरच उधळला. कारण या स्फोटात गडावरील मोठा तट मुघलांवरच ढासळला आणि तब्बल दीड हजार मुघल सैनिक ढिगाऱ्याखाली दबून मेले. अखेर गडावरील सर्व दारूगोळा संपला आणि 21 एप्रिल रोजी किल्ला सुभानजी याने जिंकून घेतला. किल्लेदार प्रयागजी प्रभु आणि मावळ्यांनी मोठ्या शर्तीने किल्ला लढवला त्यामुळे चार महिन्यांनी मुघलांना गडावर हिरव निशाण फडकवण्यात यश आले. 

मुघलांच्या ताब्यात गड गेल्यानंतर गडाचे नामकरण आझमतारा असे करण्यात आले होते. मात्र, ताराराणी यांच्या सैन्याने गड जिंकून घेतल्यानंतर गडाचे नाव पुन्हा अजिंक्यतारा असे केले. परंतु ताराराणी यांच्या ताब्यात अजिंक्यतारा फार काळ नव्हता. मुघलांच्या ताब्यात पुन्हा गड गेला होता. 1708 साली शाहू महाराजांना गडावर स्वत:स राज्याभिषेक करून घेतला होता. छत्रपती शाहू महाराजांनी मराठी साम्राज्याचा कारभार पाहताना अनेक बदल गडाच्या आसपासच्या परिसरात करून घेतले. याच काळात त्यांनी सातारा शहराची स्थापना केली होती. दुसर्‍या शाहू महाराजांच्या निधनानंतर 11 फेब्रुवारी 1818 मध्ये गड इतर गडांप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गेला. इतिहासात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, अजिंक्यतारा फितुरीमुळे इंग्रजांच्या ताब्यात गेला होता.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

गडावर जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. गडावर प्रवेश करतो त्या मार्गावर दोन दरवाजे असून पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. गडावर प्रवेश केल्यानतंर हनुमानाचे मंदिर आहे. तिथून पुढे गेल्यानंतर महादेवाचे मंदिर नजरेस पडते. त्याच बरोबर गडावर मंगळादेवीचे सुद्धा मंदिर पाहण्यासारखे आहे. मंगळादेवीच्या मंदिराकडे जातना तुम्हाला वाटेत एक ढासळलेल्या अवस्थेत ताराराणींचा राजवाडा पहायला मिळेल. याच ठिकाणी एक कोठार सुद्धा आहे. त्याच बरोबर गडावर काही पाण्याचे तलाव सुद्धा आहेत.

संपूर्ण गड पाहण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागू शकतात. गडावरून सातारा शहराचे सुंदर दृश्य नजरेस पडते. तसेच रात्रीच्या वेळी गडावरून दिसणारा नजारा पाहण्यासारखा असतो. गडावरून चौफेर नजर फिरवल्यास तुम्हाला चंदन-वंदन किल्ला, कल्याणगड, यवतेश्वराचे पठार, जरंडा आणि सज्जनगडचा परिसर पाहता येतो.

गडावर जायचे कसे

अजिंक्यतारा सातारा शहरामध्ये असल्यामुळे गडावर जाण्याच्या अनेक वाटा आहेत. सातार एसटी स्थानकावरून अदालत वाडा या मार्गे जाणारी कोणताही गाडी पकडून तुम्हाला अदालत वाडा या ठिकाणी उतरावे लागणार आहे. कारण अदालत वाड्याच्या येथून वाट अजिंक्यतारा गडावर गेली आहे. अदालत वाडा ते गड हे एक किलोमीटरचे अंतर आहे. विशेष हा पुर्ण डांबरी रस्ता आहे. त्यामुळे गाडी घेऊन जाणार असात तर गडाच्या मुख्य प्रवेश द्वारापाशी गाडीने सुद्धा जाता येते.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

गडावर दोन तीन मंदिरे आहेत. त्यामुळे गडावर राहण्यीच सोय होऊ शकते. तसेच गडावर असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये 10 ते 15 जण आरामात राहू शकतात. मात्र, गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे जेवणाची सोय तुमची तुम्हाला करावी लागणार आहे. गडावर पाण्याची काही टाकी आहेत. परंतु ते पाणी पिण्यायोग्य आहे का नाही? याबद्दल खात्री नाही. त्यामुळे गडावर जाताना शक्यतो पिण्याचे पाणी सोबत घेऊन जावा.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment