Prabalgad Fort – प्रबळगडाच्या शेजारी असणारा कलावंतीण दुर्ग आहे की सुळका? जाणून घ्या सविस्तर…

नवी मुंबई आणि मुंबई या प्रगतशील शहरांपासून अगदीच हाकेच्या अंतरावर असणारे Prabalgad Fort आणि kalavantin fort हे दुर्गप्रेमींच्या रडारवर असणारे गड. मात्र, या दोन्हींमध्ये बऱ्याच जणांचा सतावणारा प्रश्न म्हणजे, कलावंतीण हा दुर्ग आहे की सुळका? प्रबळगड आणि कलावंतीण हे दोन्ही बाजूबाजूला आहेत. त्यामुळे एकाच फेरीत दोन्ही गडांना भेट देता येते. मुंबई आणि नवी मुंबई पासून जवळ असल्यामुळे शनिवार आणि रविवार गडांवर तुफान गर्दी असते. पावसाळी आणि हिवाळी वातावरणात या गडांना एकदा आवर्जून भेट दिली पाहिजे.

प्रबळगड आणि कलावंतीण हे दुर्ग एकाच टप्प्यात पाहणे म्हणजे धाडसाचे काम. गडावर जाण्याचा मार्ग अतिशय अवघड स्वरुपाचा आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या गडाच्या दिशेने आपल्याला खेचून घेतात. मात्र, गडावर चढत असताना तुमचं एक चुकीचे पाऊल मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. पावसाळी वातवरणात गड अगदी धोकादायक ठरतो. परंतु योग्य काळजी घेतल्यास हा थरार अनुभवता येतो. चल तर न वेळ न दवडता जाणून घेऊयात कलावंतीण दुर्ग आहे की सुळका.

प्रबळगड आणि इतिहास

इसवी सन 1485 पासून प्रबळगडाच्या इतिहासाची नोंद आढळून येते. बहमनी सरदार मलिक अहमद याने कोकण मोहिम हाती घेतली होती. या मोहिमे दरम्यान त्याने प्रबळगड म्हणजेच मुरंजन हा गड जिंकून घेतला होता. सय्यद अली तबातबा यांच्या ‘बुर्हान इ मासिर’ या ग्रंथामध्ये याची नोंद करण्यात आली आहे. या ग्रंथात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार प्रबळगडाचे पूर्वीचे नाव मुरंजन असे होते. त्यानंतर मात्र, गड कोणाच्या ताब्यात होता. याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही. परंतु मुरंजन गड बराच काळ अहमदनगरच्या निझामशाहीच्या ताब्यात होता.

Premchand Roychand – स्टॉक मार्केटचा बेताज बादशाह

मुघलांनी 1636 साली शहाजी राजे यांच्यावर स्वारी केली होती. तेव्हा मुरंजन गडाचा उल्लेख करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करताना कल्याण-भिवंडी परिसरात स्वारी केली होती. यावेळी त्यांनी मुरंजन गडाची डागडुजी केल्याची नोंद आढळून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा गड जिंकून घेतला, तेव्हा गडाचे नाव बदलून प्रबळगड असे करण्यात आले. त्यानंतर 1664 साला पर्यंत प्रबळगड मराठ्यांच्या ताब्यात होता. 1664 साली पुरंदरचा तह झाला आणि 23 गड मुघलांना द्यावे लागले होते. या 23 गडांमध्ये प्रबळगडाचा सुद्धा समावेश होता.

Torna Fort – अतिदुर्गम व अतिविशाल गरुडाच घरटं, स्वराज्याचे तोरण

जवळपास 5 ते 6 वर्ष प्रबळगड मुघलांच्या ताब्यात होता. मराठ्यांनी मोहीम आखली आणि 1670 साली प्रबळगडावर हल्ला केला आणि गड जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. मुघल आणि मराठ्यांमध्ये तुंबळ लढाई झाली होती. मुघलांनी केलेला प्रतिकार मराठ्यांनी मोडून काढला आणि किल्लेदार केशरसिंगला ठार केले. त्यानंतर मात्र गड बराच काळ मराठ्यांच्याच ताब्यात होता. 1823 साली पुरंदर येथील रामोशी लोकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले होते. त्या काळात बंडात सामील झालेल्या जवळपास 300 लोकांनी प्रबळगडावर आश्रय घेतला होता.

कलावंतीण दुर्ग आहे का सुळका?

कलावंतीण दुर्ग असा उल्लेख करण्यात येत असला तरी कलावंतीण हा दुर्ग नाही. प्रबळगडा जवळ 2250 फूट उंचावर असणारे हे शिखर कलावंतीणचा सुळका, कलावंतीन पिनॅकल किंवा केल्वे टीन या विविध नावांनी ओळखला जातो. या सुळक्याचा इतिहासात फारसा उल्ळेख आढळून येत नाही. काही प्रसिद्ध इतिहासकारांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 व्या शतकात कलावंतीण नावाची एक राणी होऊन गेली. त्या राणीसाठी हा सुळका बांधण्यात आला होता. त्यामुळे या सुळक्याचे नाव कलावंतीण असे ठेवण्यात आले. प्रबळगडाची बांधणी करण्यात आली तेव्हाच कलावंतीण सुळका निर्माण केला असावा. प्रबळगडाच्या समोरच असणाऱ्या या सुळक्याचा वापर राज्यकर्त्यांनी आसपासच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी केला होता. कलावंतीण सुळक्याची रचना अगदीच थरारक स्वरुपाची आहे. सुळक्यावार जाणाऱ्या पायऱ्या पूर्णपणे कातळात कोरलेल्या आहेत. त्यामुळे इतर गडांच्या तुलनेत ही चढण फारच कठीण स्वरुपाची आहे.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

गडाच्या पायथ्याला असणाऱ्या ठाकुरवाडी गावात आल्यानंतर गडावर जाण्याचा मार्ग सुरू होतो. मुख्य टप्प्यात गेल्यानतंर कलावंतीण सुळक्यावर आणि प्रबळगडावर जाणारा वेगवेगळे मार्ग आहेत. गडाच्या माचीवर प्रवेश करताचा भग्न दरावाजांचे अवशेष पहायला मिळतात. त्याच बरोबर दगडात कोरलेली गणेशाची आणि हनुमानाची मुर्ती पाहण्यासारखी आहे. कलावंतीण सुळक्यावर मात्र पाहण्यासारखे काही नाही. सुळक्यावर गेल्यानंतर सह्याद्रीच सुंदर नजारा पहायला मिळतो. सुळक्यावर गेल्यानंतर दोरीच्या सहाय्याने सुळक्याच्या टोकावर जाण्यासाठी छोटीशी रॅपलींग करावी लागते. गावकऱ्यांच्या माध्यामातून रॅपलींगची सोय करण्यात आलेली आहे.

Santaji Ghorpade – सरसेनापती संताजी घोरपडे हे नाव कानावर पडताच औरंगजेब थरथर कापायचा, वाचा संपूर्ण इतिहास…

प्रबळगडावर सुद्धा फार थोडे अवशेष शिल्लक आहेत. प्रबळगडावर एकमेव गणपतीचे मंदिर आहे. याव्यतिरिक्त पाण्याचा तलाव गडावर आहे. मात्र, या तलावात फक्त पावसाळ्यामध्येच पाणी असते. गडाच्या दक्षिणेकडे नजर मारल्यास काळ बुरूज आपलं लक्ष वेधून घेतो. या ठिकाणा खडकात कोरलेली दोन पाण्याची टाकी आहेत.

गडावर जायचे कसे

प्रबळगड मुंबई-पुणे या जुन्या रोडवरून नजरेस पडतो. पनवेलमधील शेडूंग येथे तुम्हाला यावे लागणार आहे. स्वत:ची गाडी घेऊन गडावर येणार असाल पनवेलहून 30 ते 40 मिनिटांत तुम्ही गडाच्या पायथ्याला पोहचू शकता. गडाच्या पायथ्याला प्रशस्त पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर एसटीने येणार असाल तर पनवेलहून पुण्याला किंवा खोपोलीला जाणारी बस पकडून शेडूंगला उतरावे व तिथून गडावर जाण्यासाठी रिक्षा मिळून जातात.

गडावर जेवणाची राहण्याची सोय आहे का

गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गडावर जाताना जेवणाची सोय तुम्हालाचं करावी लागणार आहे. तसेच गडावर पाण्याची टाकी आहेत. मात्र त्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे गडावर जाताना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी घेऊन जावे.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment