सातारा जिल्ह्यातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक महत्व लाभलं आहे. परंतु या सर्व जिल्ह्यांमध्ये वाईच नाव प्रथम क्रमांकावर घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ढोल्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वाईमद्ये मराठी विश्वकोश कार्यालय आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण वाईतील मेणवलीच्या घाटावर आणि ढोल्या गणपतीच्या परिसरात होत असतं. ऐतिहासीक महत्व लाभलेल्या या वाई शहराचा पाठीराखा म्हणून Vairatgad Fort ची इतिहासात नोंद आहे. वैराटगडावर वीरगळ आणि सतीशिळा पाहायला मिळते.
प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच वाई शहराचा पाठीराखा आणि म्हणून या गडाचे नाव वैराटगड. शिवकाळातील कवींद्र परमानंद यांनी लिहलेल्या शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात वैराटनगरीचा उल्लेख आढळून येतो. या गडाचा इतिहास खूप जूना आहे. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने 11 व्या शतकामध्ये इ.स 1178 ते 93 या काळात वैराटगड बांधला अशी इतिहासात नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लष्कराचा तळ म्हणून या गडाचा वापर होत असे. जेव्हा शिवाजी महाराजांनी वाई जिंकली तेव्हा वैराटगड आणि पांडवगड यांचा स्वराज्यामध्ये समावेश झाला. वैराटगड स्वराज्यात दाखल होण्यापूर्वी शिलाहार, यादव, त्यानंतर आदिलशाही, शिवशाही, मुघल आणि पुन्हा मराठे असा रोमांचक प्रवास या गडाने केला आहे. औरंगजेबाने इसवी सन 1699 मध्ये हा गड जिंकून घेतला होता. औरंगजेबाच्या काळात गडाचे नामकरण सर्जागड झाल्याची इतिहासात नोंद आहे. अखेर ब्रिटीशांनी इसवी सन 1818 मध्ये वैराटगड काबीज केला.
गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था
‘शंभू महादेव’ या सह्याद्रीच्या उपरांगेवर वैराटगडाचे वास्तव्य आहे. गडाची समुद्रसपाटीपासून उंची 1200 मीटर किंवा 4000 फूट इतकी आहे. मध्यम श्रेणीचा हा गड गिरीदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. त्यामुळे एका दिवसामध्ये संपूर्ण गड पाहून होते. पावसाळ्यामध्ये हिरव्या गार शालूमध्ये नटलेल्या या गडाने रौद्ररूप धारण केल्याचा भास होतो. गडावर अनेक ऐतिहासिक वास्तूंची पडझड झालेली आहे. गडची सध्याची अवस्था उत्तम असली, तरी काही ठिकाणी थोडीफार पडझड झालेली पाहायला मिळते.
गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे
पावसाळ्यामध्ये गड सह्याद्रीच्या रंगात नाहून निघतो. संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला असतो आणि गडाचे रूप हे ढग-धुक्यांमध्ये बुडून जाते. पावसाळी वातावरणामध्ये गडावर जाताना विविध प्रकारची झाडे लक्ष वेधून घेतात. जसे की, सोनकी, कवल्या, केणा, फलुगाडी, गेंद, पंद आणि तेरडा असे असंख्य झाडांनी आणि फुलांनी हा गड बहरलेला असतो. गडावर पोहचताच दोन महादरवाजे निदर्शणास येतात. दोन्ही दरवाजे एकापाठीएक असून त्यांच्या कमाणी ढासळलेल्या आहेत. तसेच गडाच्या दक्षिण बाजुला कातळात कोरलेल्या अशा पाच पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. यांना गडदा असे म्हंटले जाते. गडदांना स्थानिक लोक पाच पांडवांच्या नावांनी संबोधतात.
गडावर पोहचल्यानंतर वाडे, शिबंदीची घरे, सदर अशा अनेक वास्तूंचे अवशेष निदर्शनास येतात. तसेच मारूतीरायाचे मंदिर सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. तिथून पुढे आल्यावर एका शिखराकडे आपसूक सर्वांचे लक्ष जाते, ते शिखर म्हणजे गडदेवचा वैराटेश्वराचे राऊळ. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यामुळे सभामंडप, गाभारा अशी मंदिराची रचना पाहायला मिळते. गाभाऱ्यात महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर तिथेच एक वीरगळ सुद्धा पाहायला मिळते. हा वीरगळ यादवकाळातील असल्याचे जाणकार सांगतात. या वीरगळीच्या बाजूलाच एक सतीशिळा आहे. एका सपाट दगडावर हाताच्या कोपरात काटकोनामध्ये स्त्रीच्या हाताचा पंजा आहे. मनगटात चुडा भरलेला, दंडावर चोळीचा भाग आणि तळहातावर गोल प्रतीक असलेले चिन्ह स्पष्ट पाहता येते. मध्ययुगीन कालखंडात वीरमरण आलेल्या वीराची पत्नी सती गेल्यानंतर तिच्या नावाने कुटुंबातील सदस्य कोरीव शिळा उभारत असत. या कोरीव शिळेवर काटकोनात स्त्रीचा कंकणाकीत हात दाखविला जोता याचाल सतीशिळा असे म्हणतात.
वैराटगडाच्या तटावरून कृष्णा-वेण्णा या नद्यांच देखणं रूप डोळ्यात साठवून घ्यावं. तसेच गडावरून पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, चंदन-वंदन, खंबाटकी, जरंडेश्वर, मेरूलिंग आणि नांदगिरी अशी विविध गिरिशिखरे पाहता येतात.
(टीप – महादरवाजाच्या खालच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे. अत्यंत अरूंद असा हा मार्ग आहे. गड परिसरात तरस, कोल्हे आणि रानडुक्कर यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे या भुयारी मार्गात जाणे टाळावे)
गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या आहेत?
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील भटक्यांसाठी हा गड एका दिवसात पाहणे तसे सोईस्कर म्हणावे लागेल. पुणे-कोल्हापूर महामार्गाला (NH4) लागून असलेल्या पाचवड या गावाच्या अगदी जवळ हा गड आहे. या गडावर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एक वाट उत्तरेकडून पाचवड-व्याजवाडी या गावातून गडावर जाते, तर दुसरी वाट गडाच्या दक्षिणेकडील सरताळे-गणेशवाडीतून गडावर जाते. गड खड्या चढणीचा असल्यामुळे गडावर जाताना दक्षिणेकडील बाजूने गडावर जावे आणि उतरताना उत्तरेकडून खाली उतरावे. यामुळे दोन्ही बाजूंचा विस्तीर्ण प्रदेश पाहता येतो.
(टीप – आपापल्या सोईने गडावर जाण्याची वाट निवडावी)
गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय आहे का?
गडावर गडदा असल्यामुळे पाण्याची मुबलक प्रमाणात सोय आहे. गडदा म्हणजेच पाण्याची पाच टाकी गडावर आहेत. गडदा पांडवकालीन असाव्यात म्हणून या गडदांना स्थानिक लोक पाच पांडवांच्या नावांनी संबोधतात. महत्वाची गोष्ट म्हणजे या गडदांमधील पाणी स्वच्छ, थंडगार आणि विशेष म्हणजे तिन्ही ऋतुंमध्ये पिण्यायोग्य आहे. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे वैराटेश्वर प्रतिष्ठान आणि स्थानिक लोकांच्या पुढाकारामुळे गडदांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यात आले आहे. गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे आपली सोय आपणच करावी. तसेच गडावर कोणताही कचरा करू नये.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
आवर्जून वाचावे असे काही
1) रायरेश्वर किल्ला
2) कमळगड किल्ला
3) किल्ले सुधागड