Dategad Fort – गड जिंकला अन् शिवरायांनी नामकरण केले, पाटणच्या खोऱ्यातला एक देखणा दातेगड

निसर्ग सौंदर्याने नटलेला सातारा जिल्हातील पाटण तालुका विविध गोष्टींसाठी प्रचलित आहे. पावसाळी वातवरणात या भागात असलेला सडा सडावाघापूरचा उलटा धबधबा, कोयना धरण परिसर, पवनचक्यांचा परिसर तसेच अनेक छोटी मोठी धरण या परिसराच्या सौंदर्यामध्ये भर घालतात. त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक पाटणच्या खोऱ्यात क्षणभर विश्रांती घेऊन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. पाटणचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक आणि पर्यटकांना आकर्षीत करणारा आहे. अनेक गडकिल्ले पाटणच्या खोऱ्यात आहेत. त्यातला एक म्हणजे दातेगड होय.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणारा Dategad Fort तलवारीच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रचलित आहे. पाटण शहरापासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या या गडावर अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. या गडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गड जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) या गडाचे नामकरण केले होते. तुम्हाला या गडाचे दुसरे नाव माहित आहे का? जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत आवर्जून वाचा.

दातेगड आणि इतिहास

दातेगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पंधराव्या शतकात डोकवावे लागणार आहे. कारण या काळात दातेगडावर शिर्के घराण्याचे वर्चस्व होते. शिर्क्यांच्या वर्चस्वाला मलिक उत्तुजारने सुरुंग लावला आणि गड बहामनी राज्यात सामील करून घेतला. त्यानंतर बराच काळ दातेगड बहामनी राज्यातील महत्त्वाचा भाग होता. पुढे बहामनी राज्याचे तुकडे झाले आणि दातेगड आदिलशहाच्या ताब्यात गेला. कालांतराने 1572 साली पाटणकारांना या गडाची देशमुखी मिळाली होती.

विजापूरचा आदिलशाही सरदार बत्तीस दातांच्या बोकडाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी कोथळा काढला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगड जिंकून घेतल्याची इतिहासात नोंद आढळून येते. गड जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले होते. तसेच गडाची जबाबदारी त्यांनी साळुंखे नावाच्या सरदारावर सोपवली होती. साळुंखे घराने पाटणच्या खोऱ्यात वास्तव्याला होते. त्यामुळे त्यांना पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांना गड जिंकून घेतल्यानंतर बराच काळ गड स्वराज्यात होता. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांचा 11 मार्च 1689 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर दातेगड मुघलांनी जिंकून घेतला होता. मात्र, मुघलांना गड जिंकल्याचा आनंद फार काळ घेता आला नाही. त्याच वर्षी संताजी आणि पाटणकर यांनी संयुक्तरित्या भीम पराक्रम करत मुघलांचा सळो की पळो करून सोडले आणि दातेगड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. संताजी आणि पाटणकर यांनी गाजवलेला पराक्रम अनन्यसाधारण होता. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी त्याना पाटण महालातील 34 गावं बक्षीस स्वरुपात दिली होती.

इसवी सन 1745 मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात मोठा वाद झाला होता. या काळात आंग्र्‍यांनी दातेगडाला वेढा घालत गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गडावर ताबा मिळवता आला नाही. त्यानंतर काही काळ दातेगड मुघलांच्या ताब्यात होता. अखेर मे 1818 मध्ये कॅप्टन ग्रॅट याने दातेगड न लढताच जिंकून घेतला. दातेगडाबद्दल सांगण्यात येणारी विशेष बाब म्हणजे तिन्ही छत्रपतींच्या स्वराज्यात जगलेले रामचंद्र आमात्य बावडेकर यांचे या दातेगडावर वास्तव्य होते. त्याच बरोबर गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेली कचेरी व कायमची शिबंदी सुद्धा होती.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

गडाचा घेरा बऱ्यापैकी मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण गड फिरण्यास अंदाजे दोन तास लागू शकतात. गडाच्या काही भागाची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. गडावर प्रवेश केल्यानंतर पहारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठी एक खोली नजरेस पडते. तिथून पुढे गेल्यानंतर काही वाड्याचे अवशेष आहेत. इथेच पुढे एक छोटी विहीर आपलं लक्ष वेधून घेते. वाड्याचे अवशेष पाहून पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्या आपल्याला थेट भिंतीत कोरलेल्या गणपती मुर्तीच्या दिशेने घेऊन जातात. गणपतीची मुर्ती साधारण 6 फुट उंच आहे. याच ठिकाणी कातळात कोरलेली 8 फुटांची मारुती रायाची मुर्ती सुद्धा पाहण्यासारखी आहे.

गडाच्या माथ्यावर आल्यानंतर या गडाचं वैशिष्ट्य असणाऱ्या ठिकाणी आपण पोहोचतो. स्तापत्य शास्त्राचा अद्भुत आणि मावळ्यांच्या कलेचा अद्भुत नमुना आपल्याला पहायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर. 50 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल असणाऱ्या या विहिरीमध्ये उतरण्यासाठी 44 मोठ्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. विहिरीत पाण्याचा साठा आहे. पंरतु पाणी पिण्यायोग्य नाही. विहिरीमध्ये उजव्या बाजूला एक छोटी गुहा आहे. या गुहेमध्ये पिंड आणि नंदीचे आपल्याला दर्शन होते. तसेच विहिरीच्या छताकडील भागाला हत्ती कातळात कोरलेला पहायला मिळतो.

याव्यतिरिक्त गडावर काही पाण्याच्या टाक्या आहेत. गडावरून दिसणारा नजारा डोळ्यांच पारणं फेडणारा ठरतो. गडावरून चौफेर नजर फिरवल्यास आपल्याला गुणवंतगड, वसंतगड हे गड पाहता येतात.

गडावर जायचे कसे

दातेगडावर जाण्यासाठी प्रामुख्याने तीन मार्गांनी गडावर जाता येते. पाटणमध्ये आल्यानंतर गडाच्या पायथ्याला असणाऱ्या कवडेवाडी या गावातून गडावर जाता येते. या वाटने गडावर जाण्यासाठी साधारण 30 मिनिटे लागतात. त्यानंतर गडावर जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर असणारे उंब्रज हे गाव. उंब्रजमध्ये आल्यानंतर चिपळूनला जाणारा रस्ता पकडावा. याचा मार्गे पुढे गेल्यानंतर पाटण आणि पाटणहून टोळेवाडी दातेगडाच्या पायथ्याच्या गावात आपण पोहोचतो. तसेच गडावर जाण्याचा तिसरा मार्ग म्हणजे दातेगड गाव. या गावात जाण्यासाठी पाटण-सातारा मार्गावरील घेरा दातेगड या गावात तुम्हाला पोहचाव लागेल. या गावातून सुद्धा गडावर जाण्याचा रस्ता आहे.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

सहसा महाराष्ट्रातील अनेक गडांवर राहण्याची सोय नाही. काही ठरावीक गड याला अपवाद आहेत. मात्र, दातेगडावर राहण्याची कोणताही सोय नाही. टेंट टाकून गडावर राहता येऊ शकते. पण ते धोक्याचे ठरू शकते. त्याच बरोबर गडावर जेवणाची सुद्धा कोणती सोय नाही. जेवणाची सोय तुम्हाला पायथ्याला असणाऱ्या गावांमध्ये किंवा पाटणमध्ये होऊ शकते. गडावर पाण्याची टाकी आहेत. मात्र, टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे गडावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. खबरदारीचा उपाय म्हणून गडावर जाताना पिण्याचे पाणी खाण्याची सोय आपली आपणच करावी.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment