सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भटकंती करणाऱ्या भटक्यांना Bhairavagad Fort म्हटले की, रायगड जिल्ह्यात असणारा अतिविराट, काळजाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हमखास आठवत असणार. परंतु महाराष्ट्रात फक्त एकच भैरवगड नाही. महाराष्ट्राच्या डोंगरदर्यांमध्ये एकूण 6 भैरवगड आहेत. प्रत्येक गडाचे आपापले वैशिष्ट्य आहे. या सर्वांमध्ये मोरोशीचा भैरवगड हा जास्त प्रचलित असून सह्याद्रीत भटकणाऱ्या दुर्गवेड्याचे मोरोशीचा भैरवगड सर करण्याचे स्वप्न असते. मात्र, आजच्या ब्लॉगमध्ये आपण साताऱ्यात असणाऱ्या भैरवगडा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
साताऱ्यातील पाटणच्या खोऱ्यात भैरवगड अगदी थाटात उभा आहे. पाटणपासून अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर भैरवगडाचे आपल्याला दर्शन होते. या गडाचे विशेष वर्णन इंग्रंज अधिकारी जेम्स ग्रँट डफ यांनी 1863 साली मरणोत्तर प्रकाशीत करण्यात ‘History Of Mahrattas’ या पुस्तकात केले आहे. चला तर म जाणून घेऊ या साताऱ्याच्या भैरवगडाचा इतिहास
भैरवगड आणि इतिहास
भैरवगडाच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु हा गड पन्हाळ्याच्या राजांनी बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर मराठ्यांनी या गडाचा वापर टेहळणीसाठी केला असावा असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते का नाही किंवा या गडाला शिवरायांनी भेट दिली होती का नाही, याबद्दल इतिहासात कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. ज्या प्रमाणे 1818 साली स्वराज्यात सर्व दुर्ग इंग्रजांच्या ताब्यात गेला, तेव्हा भैरवगड सुद्धा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.
भैरवगडाचा परिसर वर्ष 2012 पासून ‘अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या परिसरात फारशी लोकं आढळून येत नाहीत. या परिसराची अभयारण्य म्हणून घोषणा होण्यापूर्वी भैरवगाडाच्या परिसरात मोठ्या संख्येने लोकवस्ती होती. मात्र हा कोयनानगरचा परिसर प्राण्यांसाठी राखीव करण्यात आला आणि या ठिकाणी असणाऱ्या गावांचे स्थलांतर करण्यात आले. या गडाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गड हा घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे निसर्गाचे अद्भूत दृश्य या गडावर ट्रेक करताना आपल्याला पहायला मिळू शकते. गडाच्या परिसरात हिंस्त्र प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एकटं गडावर जाणं धोकादायक ठरू शकते.
गडावर पाहण्यासारखी ठिकाणे
भैरवगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गडावर खूप मोठे मंदिर आहे. विशेष बाब म्हणजे हे मंदिर सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीने बांधलेले आहे. मंदिरात श्री वाघजाई देवी आणि इतर देवींच्या मुर्ती आहेत. मंदिराचे बांधकाम अगदी सुबक असून सुंदर नक्षीकाम मंदिरावर आढळून येते. या मंदिराच्या अगदी समोरच शिव मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम चांगल्या दर्जाचे असल्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात क्षणभर विश्रांतीसाठी ही जागा स्वर्गाहून कमी नाही. मंदिराच्या उजव्या बाजूला शिवरायांचा छोटा पुतळा बसवण्यात आला आहे.
शिव मंदिरापासून एक वाट आपल्याला गडाच्या बुरुजावर घेऊन जाते. याच मार्गे पुढे गेल्यावर आपल्याला गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष पहायला मिळतात. याच ठिकाणाहून डावीकडे गेल्यावर गडाच्या मागच्या बाजूला पाण्याचे दोन जलसाठे पाहता येतात. या भागात प्राण्यांची संख्या जास्त असल्यामुळे सदर पाणी हे प्राण्यांकडून वापरलं जात. त्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही. गडावरून आपल्याला कोयनाचे घनदाट जंगल दिसते. या ठिकाणाहून सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर पसरलेली हिरवी चादर पाहून डोळ्यांचे पारणे फिटून जाते.
गडाचा माथा फार मोठा नाही. त्यामुळे एका दिवसाचा हा ट्रेक आहे. तसेच गडावर फार काही पाहण्यासारखे नाही. त्यामुळे अगदी 2 तासात संपूर्ण गड पाहून पूर्ण होतो. मंदिराच्या बाजूला कोकणातील गोवळ पाती या गावात जाणारी वाट आहे. या वाटेने खाली गेल्यानंतर अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर एक चौकोनी आकाराची विहिर आहे. या विहिरीत बारमाही पाणी असते.
गडावर पोहचण्याच्या वाटा
भैरवगड हा घनटाट जंगलामध्ये वसला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना या गडाबद्दल फारशी माहिती नाही. या गडावर जाण्याच्या प्रामुख्याने चार वाटा आहेत. एक वाट हेळवाकची रामघळ मार्गे गडावर जाते. दुसरी वाट गव्हारे गावातून गडावर जाते. तिसरी वाट गोवळ पाती मार्गे आणि चौथी वाट दुर्गवाडी मार्गे आपल्याला गडावर घेऊन जाते.
kenjalgad fort – वाईचा केंजळगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नामकरण केले होते
पहिला मार्ग म्हणजे हेळवाकची रामघर मार्गे. या मार्गे गडावरून जाण्यासाठी कोकणातील चिपळून आणि साताऱ्याती कराड या दोन मार्गांच्या दरम्यान कुंभार्ली घाट आहे. चिपळून वरून कराडला येताना घाट उतरल्यानंतर कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर हेळवाक गाव आहे. हेळवाक गावात उतरल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे मेंढेघरमार्गे कोंढावळा धनगरवाडा. या धनगरवाड्याच्या इथे आल्यानंतर डावीकडी एक रस्ता रामघळ या ठिकाणी जातो. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे रामघळ रामदास स्वामींच या ठिकाणी वास्तव्य होते. तसेच याच रामघळीत रामदास स्वामींना ‘आनंदवन भुवनी’ हे काव्य सुचले होते, असे सांगितले जाते. या रामघळीच्या इथून रस्ता भैरवगडाच्या दिशेने गेला आहे. परंतु, या मार्गावरून गडावर जाण्यासाठी 5 ते 6 तास लागू शकतात. तसेच संपूर्ण वाट ही घनदाट जंगलातून गेली आहे. त्यामुळे वाटाड्या सोबत असेल तरच या मार्गे गडावर जावे.
गडावर जाणारा दुसरा मार्गा म्हणजे चिपळून तालुक्यातील दुर्गवाडी गाव. या गावात जाण्यासाठी चिपळून वरून डेरवण मार्गे दुर्गेवाडी असे 1 तासाचे अंतर पार करून गडाच्या पायथ्याला पोहचता येतं. या गावातून गडावर जाण्यासाठी 3 ते 3.30 तास लागतात.
गडावर जाण्यासाठी अन्य दोन मार्ग म्हणजे एक मार्ग गव्हारे गावातून गडावर गेला आहे. तल दुसरा मार्ग गोवळ पाती मार्गे गडावर गेला आहे. दोन्ही मार्गांवरून गडावर जाण्यासाठी साधारन साडेतीन तास लागतात. गोवळ पाती मार्गे गडावर जाताना एक फायदा होतो. तो म्हणजे या मार्गे गडावर जाण्यासाठी गावकऱ्यांनी चांगल्या पायऱ्या बांधल्या आहेत.
(टीप – पावासाळा सोडल्यास वनखात्याची लेखी परवानगी घेऊन इतर ऋतुंमध्ये हेळवाक मार्गे भैरवगड, गव्हारे पाथरपुंज मार्गे भैरवगड जीप घेऊन जाता येतं. हा मार्ग कच्चा असल्यामुळे हलकी वाहन घेऊन जाणं टाळावं)
गडावर राहण्याची जेवणाची व पाण्याची सोय आहे का?
भैरवगडावर चांगल्या स्थितीत मंदिर आहे. त्यामुळे मंदिरात साधारण 100 जण आरामत राहू शकतात. परंतु भैरवगड अभयारण्य घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे वनखात्याची रितसर परवानगी घेऊन गडावर रहायला जावे. अन्यथा दंड स्वरुपात मोठा फटका बसू शकतो. तसेच गडावर पाण्याची टाकी आहेत. परंतु त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे पिण्याची आणि जेवनाची सोय आपापली करावी.
गडावर जाण्यापूर्वी या सुचना महत्त्वाच्या आहेत.
भैरवगडाच्या आजुबाजूचा परिसर ‘टायगर रिझर्व्ह’ म्हणून 2012 साली घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी वनखात्याची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच जर कोणहीही या अभयारण्यात चोरून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर, संबंधित व्यक्तीला 50,000 रुपये दंड आणि 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
भैरवगड पूर्णपणे जंगलात वसलेला गड आहे. त्यामुळे गडावर जाण्याच्या वाट घनदाट जंगलांनी व्यापलेल्या आहेत. त्यामुळे शक्यतो गडावर जाताना फुल पँट घालूनच गडावर जावे. तसेच पावसाळी वातावरणात जळूंची संख्या फार असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोबत मीठ व हळद घेऊन जावे.
सर्वात महत्त्वाची सुचना
आपला गड आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडाचे पावित्र्य राखा गडावर कचरा करून देऊ नका आणि करू नका.
जय शिवराय
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.