मागील काही वर्षांमध्ये देशभरात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटना कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. लहान लेकरं, तरुण मुली आणि वयस्कर महिला सुद्धा या नराधमांच्या कचाट्यातून सुटत नाहीयेत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडत आहेत. अशा वेळी महिलांना त्रास देणाऱ्यांना नरकाचा रस्ता दाखवणाऱ्या Bapu Biru Vategaonkar यांची हमखास आठवण येते. त्यांच्या सारखा कृष्णेचा वाघ पुन्हा कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा काठाच्या संपूर्ण पट्ट्यात आपल्या नावाची दहशत पसरवून लाखो महिलांचा आधार असणार्या बापू बिरू यांचा जीवनप्रवास नक्कीच समाजाला दिशा देणारा ठरला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधील लोकांना बापू बिरू यांच्या बद्दल विचारलं तर ते आदराने त्यांचे नाव घेतात. एका हाकेवर बापू बिरू मदतीला धावून जात होते. त्यामुळे कृष्णेचा वाघ म्हणून त्यांचा उल्लेख आजही तितक्याच आदराने केला जातो. जेव्हा त्यांना पकडण्यासाठी मोठी रक्कम बक्षीस स्वरुपात ठेवण्यात आली होती, तेव्हा या भागातील एकाही व्यक्तीने कधी गद्दारी केली नाही. लोकांमध्ये राहून लोकांसाठी जगणारा, अशी ओळख बापू बिरू यांची होती. मात्र, आज सोशल मीडियाच्या या दुनियेत बऱ्याच जणांना त्यांच्या बद्दल माहिती नाही. त्यामुळेच आया बहिणींना त्रास देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या या कृष्णेचा वाघाची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कुस्तीपटू आणि पहिला खून
बापूंचा जन्म हा गरीब कुटुंबातला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या बोरगांव या गावात त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे गावच्या मातीशी त्यांची नाळ जन्मताच जोडली गेली होती. लहानपणी त्यांना कुस्तीची फार आवड होती. अंगाने धष्टपुष्ट असलेल्या बापूंनी त्यांच्या काळात अनेक मैदान गाजवली. भविष्यात याच कुस्तीचा त्यांना बराच फायदा झाला. मात्र, त्यांनी कधीही आपल्या ताकदीचा गैर वापर केला नाही. शाळेचं कधीही त्यांनी तोंड पाहीलं नाही. आईवडील सांगतील ते काम करणे, व्यायाम करणे असा नियमित दिनक्रम सुरू असायचा.
एखाद्या महिलेला कोणी त्रास दिला किंवा तिची कोणी छेड काढली तर, बापूंना प्रचंड राग यायचा. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जायची. महिलांना मातेचा दर्जा देणार्या बापूंना महिलांवर होत असलेला अत्याचार सहन व्हायचा नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या हाती शस्त्र घेतले आणि एक प्रकारे नराधमांना वटणीवर आणण्याची मोहिम सुरू केली. याचा पहिला बळी ठरला तो म्हणजे रंगा शिंदे. रंगा शिंदे हा गावातील गोर-गरीबांना वारंवार त्रास देत होता. तसेच महिलांची छेड काढत होता.
गणेशोत्सवानिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. याच दरम्यान रंगा शिंदे याने गावातील महिलांना त्रास देण्याचा जणू सपाटाच सुरू केला होता. मात्र, एक दिवस त्याने कहरच केला. गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्व गाव त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. याच दरम्यान रंगा शिंदे याने महिलांमध्ये जाऊन धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. महिला घाबरल्या आणि त्यांनी पळापळ सुरू केली. बापूंना हे दृश्य पाहून प्रचंड राग आला आणि दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी रंगा शिंदेचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना 1966 साली घडली होती. त्यानंतर तब्बल 25 वर्ष बापू पोलिसांच्या हाती लागले नाही.
रंगाचा भाऊ आनंद शिंदे याने सुद्धा भावाच्या पावलावर पाऊल ठेवतं महिलांची छेड आणि गावकऱ्यांना त्रास देणे सुरू केले. तसेच भावाचा बदल घेण्यासाठी बापू बिरू यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. योग्य संधी साधत बापू बिरू यांनी आनंद शिंदेचा खून केला आणि त्याला सुद्धा रंगाच्या जोडीला नरकात धाडलं.
खून केल्यामुळे पोलीस बापूंना गुन्हेगार समजत होते. मात्र, गावकऱ्यांच्या मनात त्यांच्या बद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. खून केल्यानंतर बराच काळ बापू सह्याद्रीच्या कुशीत लपून बसले होते. त्यांना गावकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. विशेष बाब म्हणजे रंगा शिंदेचा जेव्हा खून करण्यात आला, तेव्हा गावात पुरणपोळीचे जेवण करण्यात आलं होते.
12 खून आणि गावगुंडांचा खातमा
बापू बिरू यांनी एकप्रकारे अन्यायाविरुद्ध दंड थोपटले होते. त्यांच्या डिक्शनरीत थेट मृत्यू या एकाच शिक्षेची नोंद होती. रंगा शिंदे आणि आनंद शिंदे यांचा खून केल्यामुळे त्यांचा मामा पेटून उठला होता. याची माहिती बापूंना मिळताच त्यांनी गोळ्या घालून त्याचा सुद्धा खून केला. तीन तीन खून करूनही बापू तब्बल 25 वर्ष पोलिसांच्या हाती लागले नाही. याचे कारण म्हणजे गावकऱ्यांचा त्यांना पाठिंबा होता. तीन खून केल्यामुळे समाजात त्यांची दहशत निर्माण झाली होती. तसेच त्यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी सुद्धा कोणी तयार होत नसे. गावकरी त्यांना जेवण पुरवत असत.
-
Pramod Mahajan – देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव; भावानेच केला खून, काय घडलं होतं तेव्हा?
-
Vithal Kamat – हॉटेलमध्ये स्वत: कूक ते यशस्वी उद्योजक, मराठी माणसाचा अटकेपार झेंडा
कृष्णा-वारणाच्या खोऱ्यात बापू बिरूंची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक तरुण बापूंच्या तालमीत जायला लागले. जवळपास 30 ते 40 जणांची टोळी त्यांनी तयार केली होती. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवणे हेच त्यांचे काम होते. मात्र, काही तरुणांनी बापूंच्या नावाचा वापर करत समाजात दहशत निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. बापूंना ही गोष्ट समजताच बापूंनी त्यांचा सुद्धा खून केला. जवळपास 12 खून केल्याची कबुली स्वत: बापूंनी दिली होती. यामध्ये त्यांच्या मुलाचा सुद्धा समावेश होता. बापूंचा मुलगा तानाजी वाटेगावर यांनी एका महिलेचे अपहरण केले होते. ही गोष्ट कळताच बापूंनी गोळ्या घालून त्याला ठार केले होते.
25 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागले
ग्रामीण भागामध्ये बापू बिरू यांच्या नावाचा दरारा होता. गावकऱ्यांसाठी बापू एक प्रकारे समाजातील घाण साफ करत होते. त्यामुळे गावकऱ्यांचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे पोलीस येण्याची बातमी बापूंना आधीच समजत असे. अशा पद्धतीने त्यांनी जवळपास 25 वर्ष पोलिसांना गुंगारा दिला. अखेर 1990 मध्ये तत्कालीन पोलीस निरक्षक मदन पाटील यांनी त्यांना जेरबंद केले. यानंतर बापूंनी जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या साथीदाऱ्यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी पोलीस यशस्वी ठरले. बापूंना रंगा शिंदे यांच्या खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
मांसाहार आणि व्यसनाचा त्याग केला
पोलिसांच्या फौजा जेव्हा बापू बिरूंच्या शोधात होत्या. मात्र, सह्याद्रीच्या घनदाट जंगलात त्यांचा शोध घेणे तितके सोपे नव्हते. या काळात बापू बिरू त्यांच्या सहकाऱ्यांसह एकदा बहे-बोरगाव इथे असणाऱ्या रामलिंग बेटावर गेले होते. दर्शनासाठी गेले असता स्वामी जोगळेकर महाराजांची भेट झाली. यावेळी महाराजांनी बापूंना मांसाहार आणि व्यसन सोडण्याचा सल्ला दिला. खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून बापूंच्या अध्यात्मिक जीवनाला सुरुवात झाली असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. तेव्हापासून बापूंनी व्यसन आणि मांसाहाराचा पूर्णपणे त्याग केला.
जेव्हा त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. त्या काळात त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीमध्ये आणखी वाढ झाली. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर त्यांनी अध्यात्मिक वृत्तीच्या सोबतीने प्रवचन देण्यास सुरुवात केली. प्रवचनाच्या माध्यामातून त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातील घनटाक्रमाबद्दल माहित देत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
बापू बिरू यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी आणि महिलांच्या संरक्षणासाठी त्यागलं. त्यामुळे तब्बल 25 वर्ष ते पोलिसांच्या तावडीतून मुक्त राहू शकले. कृष्णेच्या या वाघाचं 16 जानेवारी 2018 रोजी इस्लामपुरमधील एका हॉस्पीटलमध्ये वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.