Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

महाराष्ट्राच्या कडे कपाऱ्यांमध्ये अभेद्य आणि ढगांना भिडणारे काही मोजकेच गड आहेत. अशा गडांवर जाण्यासाठी काळीज वाघाचं पाहिजे. ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी अंगातील भीती नाहीशी करण्यासाठी सहकाऱ्यांसोबत आवर्जून अशा गडांना भेट दिली पाहिजे. योगायोगाने आपल्या महाराष्ट्रात असे काही मोजके गड आहेत. तोरणा, गोरखकड, भैरवगड आणि Chanderi Fort हे त्यातली काही नावं. आयुष्याच्या या रंगमंचावर जगताना सह्याद्रीत भटकणाऱ्यांनी या गडांना आवर्जून एकदा तरी भेट दिली पाहिजे. या ब्लॉगमध्ये आपण चंदेरी या गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

चांदण्या ढगामध्ये लुकलुकताना आपल्याला नेहमी आकर्षीत करतात. त्याच प्रमाणे चंदेरी गड सुद्धा जसजस गडाच्या जवळ जाऊ, तसतस आपल्याला आकर्षीत करतो. गडावर जाण्याची वाट अगदी थरकाप उडवणारी आहे. मात्र, गडावर गेल्यानंतर महाराजांची भेट होते आणि सर्व थकवा नाहीसा होतो. बदलापूरच्या डोंगररांगेत म्हैसमाळ, नवरी, पेब, माथेरान, नाखिंड आणि चंदेरी या डोंगररांगा आपल्याला पहायला मिळतात. या डोंगररांगेमध्ये ढगांमध्ये गुडूप झाल्याचा भास व्हावा असा एक प्रचंड सुळका आपलं लक्ष वेधून घेतो. हा सुळका म्हणजेच ‘चंदेरी’ होय.

चंदेरी आणि इतिहास

चंदेरी गडाच्या इतिहासा बद्दल फारशी माहिती उपलब्ध होत नाही. मात्र, गडाची रचना आणि गडावर जाण्याची अवघड वाट पाहता लष्करी चौकी म्हणून गडाचा वापर केला जात असावा. गडावर जाताना गुहा लागते या गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेत तटबंदी आहे. गड असल्याची ही एकमेव खूण आपल्याला गडावर पहायला मिळते. त्याच बरोबर काही इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखानुसार, इसवी सन 1665 साली मे महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि रायरी पर्यंतचा सर्व मुलुख आपल्या ताब्यात घेतला होता. तेव्हाच चेंदरी गड सुद्धा स्वराज्यात दाखल झाला असावा.

Jangli Jaigad – घनदाट जंगलाने वेढलेला, काळजाचा थरकाप उडवणारा जंगली जयगड

गडावर कसलेही अवशेष आढळून येत नाहीत. गडाचा विस्तार अगदीच चिंचोळ्या स्वरुपाचा आहे. दोन्ही बाजूंना खोल दरी आणि मधून वाट अशा पद्धतीची गडाची रचना आहे. त्याच बरोबर गडावर जाण्याची वाट अत्यंत अवघड आहे. पावसाळी वातावरणात गडावर जाणे शक्यतो टाळावे. गडाची ही सर्व रचना पाहता गडाचा वापर लष्करी चौकी म्हणून केला जात असावा असा अंदाज जाणकार व्यक्त करतात. काही जाणाकारांच्या मते 7 ऑक्टोबर 1957 रोजी चंदेरी गडाच्या सुळक्यावर संघटित प्रस्तारोहणाचा प्रारंभ झाला.

गडाची भौगोलिक रचना

गडाची भौगोलिक रचना अतिशय वेगळी आणि अनोख्या स्वरुपाची आहे. गडाकडे नीट पाहीलं तर गडाचा सुळका ढगांना भेदून आरपार जाण्याची कसरत करत असल्याचा भास होतो. गडावर जाणाऱ्या पायऱ्या कातळात कोरलेल्या आहेत. तर काही ठिकाणी पायऱ्या अगदीच धुसर स्वरुपाच्या आहेत. तुम्ही कलावंतीण गडावर जर गेला असाल, तर या गडावर जाणाऱ्या पायऱ्या सुद्धा काहीशा तशाच स्वरुपाच्या आहेत. हिवाळी वातावरणात गडावर आवर्जून गेले पाहिजे. मात्र पावसाळी आणि उन्हाळी वातावरणात गडावर जाताना नक्कीच काळजी घेतली पाहिजे.

गडावर बघण्यासारखं काय आहे

गडावर जाताना काही पाहण्या सारख्या गोष्टी आहेत. गडावर जाताना आपल्याला एक गुहा लागते. गुहा चांगली प्रशस्त आहे. या गुहेमध्ये काही जण आरामात विश्रांती घेऊ शकतात. या ठिकाणी महाराजांची मुर्ती, शिव पिंड आहे. त्याच बरोबर गडावर पाण्याची काही टाकी आहेत. गुहे पासून पुढे गेल्यानंतर गडावर जाण्यासाठी वाट आहे.

गडाच्या अगदी टॉपला गेल्यानंतर वरून दिसणारे दृष्य स्वर्गात आल्याची शाश्वती देते. वरती आल्यानंतर समोरच एका टोकावर छत्रपती शिवाजी महाराजांची देखणी मुर्ती आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. तसेच या ठिकाणी जाण्याची वाट अगदीच छोटी आहे. दोन्ही बाजूंना खोल दरी आणि मधून ही वाट गेली आहे. एका वेळेस एकच व्यक्ती इथून येऊ अथवा जाऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी मस्ती करू नये तसेच ज्यांना चक्कर किंवा अन्य काही त्रास आहे अशा व्यक्तींना इथे जाण्याची रिस्क घेऊ नये.

सुळक्यावरून उगवतीला आपल्याला पेब, प्रबळची डोंगर रांग आणि माथेरान सारखे अनेक डोंगर दिसतात. तर मावळत्या दिशेने सिद्धगड, पेठचा किल्ला, गोरक्षगड, आणि भिमाशंकरचे पठार नजरेस पडते. पावसाळ्यात गडाचे सौंदर्य अगदी अप्सरे प्रमाणे खुलून उठते. परंतु जास्त पाऊस असेल तर गडावर जाऊ नये. नवख्या ट्रेकर्सनी एकटं गडावर जाणं टाळावं.

गडावर पोहचायचं कस

चंदेरी गडावर जाण्याच्या दोन वाटा आहेत. एक वाट पनवेल तालुक्यातील तामसई गावातून गडावर जाते. तर दुसरी वाट चिंचवली या बदलापूरमधील गावातून गडावर जाते. चिंचवली गाव हे रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ आहे. वांगणी रेल्वे स्थानकावर उतल्यानंतर चालत किंवा वाहनाने गावात जाता येत. मात्र, या मार्गे गडावर जाताना तामसई मार्गे गडावर जाण्यासाठी लागणार्‍या वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. गडावर जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो. गडावर जाताना ठिकठिकाणी दगडांवर खुणा केलेल्या आहेत. बदलापूरहून येणारी वाट आणि तामसई गावातून गडावर जाणारी वाट थोड चालून वरती गेल्यानंतर एका टेकडापशी मिळते.

गडावर जाण्यासाठी अंदाजे 1 ते 2 तास लागू शकतात. गडावर जाण्याची वाट घनदाट जंगलातून जाते. त्यामुळे नवख्या ट्रेकर्सनी गडावर जाताना वाटाड्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. तसेच एकट्याने ट्रेक करणे टाळावे.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

गड अगदी उंच आणि अभेद्य आहे. त्यामुळे गडावर स्थानिक गावांमधील लोकं सुद्धा जास्त फिरकत नाहीत. त्यामुळे गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. मात्र, गडावर असणाऱ्या गुहेमध्ये अंदाजे 10 ते 12 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मात्र, गडावर पाण्याची काही टाकी आहेत. मात्र, ते पाणी कितपत पिण्यायोग्य आहे, याचा अंदाज नाही. त्यामुळे पाणी प्यायच झालच तर ते उकळून प्यावे किंवा सोबत जाताना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी घेऊन जावे.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.

जय शिवराय


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment