देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष सध्या केंद्रबिंदू ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तर महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने आहे. तरूण वर्गात या नेत्यांची क्रेझ पहायला मिळत आहे. उत्तम वक्ता, चाणक्य, लोकनेता अशा विविध नावांनी या नेत्यांना ओळखलं जातं. मात्र, देशाच्या राजकारणात एक असा नेता होऊन गेला. त्या नेत्याला चाणक्य, उत्कृष्ट वक्ता, डावपेच आखण्यात तरबेज आणि लोकांमध्ये मिसळणारा नेता म्हणून ओळखलं जायचं. त्याचं नावं म्हणजे Pramod Mahajan.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्या नेत्यांनी राजकारणाचा आखाडा गाजवला, अशा धुरंधर नेत्यांचा इतिहास जाणून घेणे एक मतदार म्हणून गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपली राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या नेत्यांची आठवण सर्वांना व्हावी, तरुण मतदारांना त्याची माहिती व्हावी यासाठी हा प्रपंच. भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांचा राजकीय प्रवास आणि त्यांची झालेली हत्या. यामुळे राजकीय वातावरण तेव्हा चांगलच ढवळून निघालं होतं. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
पत्रकार आणि इंग्रंजी शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात
प्रमोद महाजन यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 रोजी व्यंकटेश आणि प्रभावती व्यंकटेश महाजन यांच्या पोटी झाला. प्रमोद महाजन यांचे बालपण अंबेजोगाईत गेले. मात्र, त्यांचा महबूबनगर (तेलंगना) येथे झाला होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केले. प्रमोद महाजन यांचे सहा जणांचे कुटुंब होते. प्रमोद महाजन यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या. प्रकाश, प्रवीण, प्रज्ञा व प्रतिभा या भावंडांमध्ये प्रमोद महाजन यांचा नंबर दुसरा होता. त्यांच संपूर्ण बालपण अंबेजोगाईत गेले. अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रमोद महाजन यांचे प्राथमिक शिक्षण बीड जिल्ह्यातील योगेश्वरी विद्यालयात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले आणि रानडे इन्स्टिट्यूट फॉर जर्नलिझममध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या दरम्यान त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात कोसळला. वयाच्या 21 व्या वर्षी महाजन यांच्या वडिलांचे निधन झाले.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे दोघेही महाविद्यालयीन जीवनापासून चांगले मित्र होते. दोघांचेही शिक्षण अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात पूर्ण झाले होते. पुढे पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी प्रमोद महाजन यांनी पुणे गाठले. पदवी प्राप्त केल्यानंतर 1970 ते 171 या काळात त्यांनी तरूण भारत या मराठी वृत्तपत्रामध्ये उपसंपादक या पदावर काम केले. राजकारणाच्या आखाड्यात जाण्यापूर्वी 1971 ते 1974 या चार वर्षांच्या काळात महाजन यांनी अंबेजोगाई येथील खोलेश्वर महविद्यालात विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे दिले. याच दरम्यान 11 मार्च 1972 रोजी त्यांचे रेखा हमिने यांच्याशी लग्न झाले. प्रमोद महाजन यांना दोन मुले असून त्यांची नावं राहुल महाजन आणि पुनम महाजन अशी आहेत. 1974 साली त्यांनी सर्व सोडून पुर्णवेळ RSS प्रचारक म्हणून आपल्या नवीन कारकिर्दीचा श्री गणेशा केला.
RSS प्रचारक ते संरक्षण मंत्री
पत्रकार आणि शिक्षक म्हणून सुरुवातीला महाजन यांनी काम केले. मात्र, राजकारणाच्या बाजूने त्यांचा कल हा जास्त होता. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी त्यांनी राजकारणाची निवड केली आणि 1974 मध्ये पूर्णवेळ RSS चे प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या सक्रिय राजकारणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यांनी पहिलाच धमाका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात केला. इंदिरा गांधी यांनी तेव्हा आणीबाणीची घोषणा केली होती. त्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात प्रमोद महाजन यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी प्रमोद महाजन यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले होते. हेच प्रमोद महाजन यांचा राजकारणातलं पहिलं पाऊल ठरलं.
आणीबाणी दरम्यान केलेल्या कामगिरीमुळे त्यांचा RSS च्या निवडक कार्यकर्त्यांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर पक्षाच्या राज्य युनिटचे सरचिटणीस, अखिल भारतीय सचिव या पदांवर त्यांची वर्णी लागली. 1986 साली अखिल भारतीय जनता युवा मोर्चाचे अक्ष्यक्ष म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. याच दरम्यान त्यांनी 1984 ची लोकसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. राष्ट्रीय राजकारणात महाजन यांना जास्त रस होता. परंतु महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला तळगळात पोहचवण्याचं काम प्रमोद महाजन यांच्यासह त्यांचे बालपणीचे मित्र आणि मेहुणे गोपीनात मुंडे या जोडगोळीने केले. तसेच शिवसेना आणि भाजप यांची युती होण्यामागे या दोघांचे योगदान सर्वाधिक होते. त्यामुळेच 1995 साली राज्यात भाजप आणि शिवसेना युतीने विधानसभा निवडणूक जिंकली. शिवसेनेचे मनोज जोशी यांची मुख्यमंत्री पदावर तर गोपीनाथ मुंडे यांची उप मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आली. 1999 पर्यंत महायुती सरकारने सत्ता उपभोगली.
स्थानिक, राजकीय अथवा राष्ट्रीय पातळीवर भाजपने निवडणुकीत अनेक वेळा बाजी मारली. पक्षाच्या विजयात प्रमोद महाजन यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची केंद्रात सत्ता आली. महाजन यांच्या कामाचा धडाका पाहून तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये त्यांच्यावर संरक्षण मंत्री पदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1998 मध्ये भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली. या काळात त्यांच्यावर पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. मात्र, त्याच वर्षी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज्यसभा निवडणूक लढवली आणि जिंकले सुद्धा. त्यानंतर त्यांनी केंद्रीय राजकारणात आपल्या नावाचा ठसा उमटवायला सुरुवात केली.
जेव्हा भारतीय जनता पक्षाचे पाच वर्षांचे पूर्ण सरकार सत्तेत आले, तेव्हा माहिती तंत्रज्ञान मंत्री या पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. Shining India ही प्रमोद महाजन यांच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना. मात्र ही कल्पना यशस्वी होऊ शकली नाही. प्रमोद महाजन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले बऱ्याच वेळा त्यांना अपयशाचा सामना करावा लगाला. मात्र त्यांनी निर्णयांचा धडाका सुरूच ठेवला.
दूरसंचार मंत्री आणि शिवानी भटनागर मृत्यू प्रकरणं
प्रमोद महाजन यांच्यावर दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्यांची ही कारकीर्द वादग्रस्त ठरली. अनियमिततेचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. रिलायन्स उद्योग समूहाला उघड उघड अनुकूलता दाखवल्याचा मोठा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याच बरोबर इंडियन एक्सप्रेसच्या माजी पत्रकार शिवानी भटनागर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे प्रमोद महाजन यांचा हात असल्याचा आरोप आयपीएस अधिकारी रविकांत शर्मा यांच्या पत्नी मधु शर्मा यांनी केला होता. मात्र, मधु शर्मा पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरल्या त्यामुळे त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.
पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार
नावातच पी.एम असणारे प्रमोद महाजन यांनी राजकारणात अतुलनीय कामगिरी केली होती. केंद्रीय मंत्री पदाचा अनुभव गाठीशी होता. चतुरस्त्र नेता म्हणून देशाच्या राजकारणात त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. त्यामुळेच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव आघाडीवर होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर कोण? असा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा प्रामुख्याने लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या जोडीला प्रमोद महाजन यांचे नाव घेतले जायचे. उत्तम संघटन कौशल्य आणि वाटाघाटीच्या राजकारणात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे प्रमोद महाजन भविष्यात पंतप्रधान होणार अशी सर्वांना आशा होती.
सख्ख्या भावानेच खून केला
22 एप्रिल 2006 रोजी राज्याच्या राजकारणातील एक मोठं नाव घरातील अंतर्गत वादाचं बळी ठरलं. प्रमोद महाजान यांचा लहान भाऊ प्रवीण महाजन यांचा सोबत काही कारणांवरून वाद झाला. या वादाने भयंकर रूप धारण केले आणि प्रवीण महजान याने त्याच्या परवाना असलेल्या बंदुकीतून प्रमोद महाजन यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. महाजन यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पाडली व शरीरातील सर्व गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. प्रमोद महाजन यांच्यावर उपचार करण्यासाठी यकृत तज्ञ मोहम्मद रेला यांना लंडनहून बोलवण्यात आले होते. 13 दिवस हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 3 मे 2006 रोजी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणावर मोठी शोककळा पसरली होती. 4 मे 2006 रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्मशानभूमीत प्रमोद महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
“देशाने एक कुशल संघटक, उत्तम वक्ता आणि तरुणांचा एक आक्रमक प्रतिनिधी गमावला आहे.” असं म्हणत प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.