मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांच्या आसपास अनेक गडकिल्ले शेवटच्या घटका मोजत उभे आहेत. माणसांच्या गर्दीत तरीही दुर्लक्षीत असणार्या या गडांबद्दल स्थानिक लोकांना सुद्धा माहिती नाही. असाच एक दुर्लक्षीत गड म्हणजे नवी मुंबईत असणारा Belapur Fort होय. शहराच्या अगदी जवळ असणारा हा भुईकोट किल्ला अगदीच हाकेच्या अंतरावर आहे. बऱ्याच लोकांना या गडाबद्दल माहिती नाही. याच गडाची सविस्तर माहीत सर्वांना व्हावी म्हणून हा ब्लॉग.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या अगदीच समोर हा गड आहे. आजूबाजूला दाट झाडी असल्यामुळे पटकन हा गड नजरेस येत नाही. खाडीला अगदी खेटून असणाऱ्या या गडावर शासनाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये डागडुजी करण्यात आली आहे. परंतु तरीही गडाचा काही भाग तुटलेल्या अवस्थेत आहे. जंजिऱ्याच्या सिद्धीने बेलापूरचा किल्ला बांधल्याची इतिहासात नोंद आढळून येते. चला तर म जाणून घेऊया या गडाचा सविस्तर इतिहास
बेलापूर किल्ला आणि इतिहास
बेलापूरचा किल्ला नवी मुंबईच्या अगदी खाडी शेजारी असल्यामुळे या गडाचे अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यामुळे सिद्धी, पोर्तुगीज आणि मराठ्यांसाठी हा गड व्यापाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. इतिहासात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, इ.स 1560 ते 1570 च्या दरम्यान पोर्तुगीजांनी हा सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता. त्या काळात बहुदा व्यापाऱ्याच्या उद्धेशाने सिद्धीने पनवेल खाडीच्या अगदी तोंडाजवळ असणाऱ्या एका टेकडीच्या माथ्यावर गड बांधून घेतला. त्यानंतर 12 वर्ष सिद्धीचे या गडावर वर्चस्व होते.
सिद्दीच्या वर्चस्वाला पोर्तुगिजांनी खिंडार पाडले आणि 1682 साली बेलापूर किल्ला आपल्या ताब्यात घेतला. जेव्हा बेलापूर किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर सिद्दीच्या नियंत्रणाखाली होता, तेव्हा हा सर्व परिसर शाबाज म्हणून ओळखला जात होता. पोर्तुगीजांनी बराच काळ बेलापूरच्या किल्ल्यावर सत्ता प्रस्थापित केली. परंतु 1733 साली चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांना हुसकावून लावत गडावर भगवा ध्वज फडकवला आणि गड आपल्या ताब्यात घेतला.
गड जिंकल्यानंतर चिमाजी आप्पा यांनी जवळच्या अमृतेश्वर मंदिरात बेलाच्या पानांचा हार घातल्याची इतिहासात नोंद आहे. त्यानंतर चिमाजी आप्पा यांनीच गडाचे नाव बेलापूर किल्ला असे केले. 1733 साली मराठ्यांनी गड जिंकून घेतला होता. त्यानंतर 1818 पर्यंत बेलापूरचा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने 23 जून 1817 रोजी बेलापूरचा गड जिंकून घेतला. ब्रिटिशांची तेव्हा एक पॉलिसी होती. ती म्हणजे मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असणारा कोणताही गड जिंकून घेतल्यास तो गड अर्धवट नष्टा केला जात असे. त्यानुसार बेलापूरचा किल्ला सुद्धा त्यांनी अर्धवट नष्ट केला होता.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
बेलापूरचा किल्ला हा भुईकोट स्वरुपाचा आहे. तसेच शहराच्या अगदी जवळ असल्यामुळे अगदी अर्ध्या तासात गड पाहून पूर्ण होतो. गडाच्या पायथ्याला गाडीने जाता येते. पायथा ते गड हे अगदीच 10 मिनिटांचे अंतर आहे. गडावर गेल्यानंतर इमारती सारखी एक पडलेल्या अवस्थेत वास्तू आहे. या वास्तुच्या मधोमध शिवलिंग आहे. या बुरूजाचा काही भाग पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. या वास्तूमध्ये वरती जाता येत तिथून बेलापूर खाडीचे सुंदर दृश्य आणि विस्तीर्ण समुद्र नजरेस पडतो.
तिथून पुढे गेल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये तटबंदी शासनाच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणी बसायला वगैरे चांगली जागा आहे. किल्ल्याच्या आसपास इमारती झाल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात लोकवस्ती गडाच्या आजूबाजूच्या परिसरात आहे.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्यासाठी ट्रेन आणि बसने जाता येत. ठाणे, कल्याण, डोबिंवली वरून बेलापूरला जाण्यासाठी बससेवा आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अगदी समोरच एक पोलीस चौकी आहे. पोलीस चौकीच्या बाजूने एक रस्ता उजव्या बाजूने गडाच्या दिशेने गेला आहे. जर तुम्ही ट्रेनने गडावर येणार असाल तर, बेलापूर स्टेशन किंवा सिवुड्स स्टेशनला उतरून गडावर जाऊ शकता. स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला NMMT ची बस किंवा रिक्षा मिळू शकते. शक्यतो बसने जाण्यास प्राधान्य द्या. स्टेशनवरून बेलापूर किंवा उरणला जाणारी बस पकडून महानगरपालिकेच्या बस स्टॉपवर उतरावे. बस स्टॉपवर उतरल्यानंतर बस स्टॉफ ते गड अगदी 10 ते 15 मिनिटांचे अंतर आहे.
तुम्ही जर गाडी घेऊन गडावर येणार असाल, तर नवीन अटल सेतूमार्गे सुद्धा गडावर येऊ शकता. तसेच पाम बिच रोडने गडावर येऊ शकता. दोन्ही मार्गे गडावर येणे सोईस्कर ठरू शकते.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का
गडावरा राहण्याची किंवा जेवणाची काहीही सोय नाही. गड अगदीच लहान आणि चढायला पाच मिनिटांचा आहे. त्यामुळे गड पहायला अगदी अर्धा तास पुष्कळ होतो. गडाच्या आजूबाजूला हॉटेल्स वगैरे आहेत. त्यामुळे तिथे जेवणाची सोय होऊ शकते.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.