पुणे आणि मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणारा Korigad Fort सह्याद्रीच्या कुशीत बागडणाऱ्या मुलांना, तरुणांना आणि वयस्कर व्यक्तींना साध घालतं आहे. आयुष्याच्या टप्प्यावरील तिन्ही पिढींचा उल्लेख करण्याचे कारण, म्हणजे गडावर जाण्याची वाट अतिशय सहज, सरळ आणि चांगल्या दर्जाची आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील व्यक्ती गडावर अगदी सहज जाऊ शकते. पावसाळी आणि हिवाळी वातावरणात गडाचे सौंदर्य खुलून निघते. गडावर असणारी अखंड तटबंदी आणि पाण्याची टाकी पाहण्यासारखी आहेत.
मावळ प्रांतात येणारा कोरीगड हा घनगडाचा शेजारी गड आहे. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सवाष्णी घाटाच्या (सवाष्णी घाटाच्या इतिहासाची माहिती घनगडाच्या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे) माथ्यावर कोरीगड पहायला मिळतो. कोरीगडाच्या नावाचा एक इतिहास आहे. कोरीगडाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रामुख्याने कोळी लोकांच वास्तव्य होतं. कोळी लोकांच्या अनेक पोटजाती आहेत. त्यातील एक पोटजात म्हणजे कोरी. या कोरी लोकांच गडाच्या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य होतं. त्यामुळे हा गड कोरीगड या नावाने ओळखला जातो.
Korigad Fort Trek आणि इतिहास
कोरीगडाच्या इतिहासाचा उल्लेख काही ग्रंथांमध्ये करण्यात आलेला आहे. त्यानुसार, बहामनी सत्तेचा अस्त झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात असणारे अनेक गड निजामाने आपल्या ताब्यात घेतले होते. तेव्हा इ.स 1846 साली अहिल्यानगरचा (अहमदनगर) निजाम मलिक अहमद याने कोरीगड एका कोळी राजाकडून जिंकून आपल्या ताब्यात घेतल्याचा उल्लेख आढळून येतो. बहामनीच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाले तर त्याने इ.स 1347 ते 1485 या काळात यादव-शिलाहारांच्या प्रदेशावरच राज्य केल्याची नोंद आढळून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गड जिंकून घेण्यापूर्वी एका पिंपळगावच्या लुमाजी भोखर, नाईक यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या युक्ती आणि शक्तीने गड जिंकून घेतला होता. गड जिंकून घेतल्यानंतर मुसलमान सत्तेने खूष होऊन त्याचा सन्मान केला तसेच बक्षिस सुद्धा देण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या गडांसोबत कोरीगड सुद्धा जिंकून स्वराज्यात सामील केला. त्यानंतर मुघलांनी या गडावर आपले वर्चस्व काही काळ निर्माण केले होते. परंतु इ.स 1700 मध्ये कोरीगड पंत सचिवांनी जिंकून घेतल्याची नोंद आढळून येते. 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करून कोरीगड जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्यामध्ये यश आले नाही. अखेर 14 मार्च 1818 रोजी त्याने वैतागून तोफेचा गोळा दारुकोठारावर डागला आणि गड जिंकून घेतला. याचवेळी कोरीगडासोबत घनगड सुद्धा इंग्रजांनी जिंकून घेतला होता.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
गडाची चढण साधी सरळ आणि सोप्या स्वरुपाची आहे. त्यामुळे शक्य झाल्यास सर्व वयोगटातील व्यक्तींना गड सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गडावर जाण्यासाठी 280 पायऱ्या चढून मुख्य गणेश दरवाजापाशी तुम्ही पोहचता. गड चढण्यास सुरुवात केल्यानंतर एक कातळात कोरलेले पाण्याचे टाके आणि पाण्याच्या टाक्याच्या दिशेने कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पाण्याच्या टाक्या शेजारी गणपतीचे छोटे मंदिर आहे.
याच मार्गे पुढे गेल्यानंतर काही अंतरावर पुन्हा उजव्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे. पण पिण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. तसेच पाण्याच उतरण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये. पाण्यामध्ये साप आहेत. त्यामुळे खबरदारी घ्यावी. तिथून पुढे गेल्यानंतर बसण्यासाठी शासनाच्या माध्यामातून काही बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून वरती गेल्यानंतर आपण थेट गणेश दरवाजापाशी पोहचतो. हा दरवाजा गोमुखी असून दरवाजा अगदी सुस्थिती आहे. संवर्धन करणाऱ्या संस्थांमार्फत दरवाजा बसवण्यात आला आहे. तिथून वरती चालत गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो.
गडाच्या माथ्यावर पोहचताच लक्ष वेधून घेतं ते महादेवाचे मंदिर. या मंदिरामध्ये शिवलींग आहे. तसेच मंदिराच्या बाहेर चार ओतीव तोफा आहेत. याच मंदिराच्या मागे दोन मोठे तलाव आहेत. पावसाळ्यात दोन्ही तलाव 100 टक्के भरलेले असतात. (टीप – पावसाळी बेडकांनी तलावात उतरून गडाचे पावित्र्य खराब करू नये) याच मंदिराच्या डाव्या बाजूला गडदेवता कोराई देवीचे मंदिर आहे. गडावर प्रामुख्याने दोन मंदिरे, 2 पाण्याचे तलाव आणि वाड्याचे भग्न झालेले अवशेष पहायला मिळतात.
गडाच्या उत्तर व दक्षिण बाजूला दोन भव्य बुरूज आहेत. दक्षिणेकडील बुरूजास दुहेरी तटबंदी आहे. गडाचे दुसरे प्रवेशद्वार दक्षिण बाजूला असून येथून अंबवणे गावामध्ये उतरता येते. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाचा दीड किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. उत्तर टोकावर असणाऱ्या बुरुजावर स्वराज्याचा भगवा अगदी डौलात फडकताना आपलं लक्ष वेधून घेतो. संपूर्ण गड पाहण्यासाठी एक तास लागतो. गडावरून तुंग, तिकोना, नागफणीचे टोक आणि घनगड असा सर्व परिसर आपल्याला पाहता येतो.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्याच्या प्रामुख्याने दोन वाटा आहेत. एक वाट पेठशहापूर मार्गे गडावर गेली आहे. तर दुसरी वाट आंबवणे गावातून गडावर गेली आहे. दोन्ही मार्गांनी गडावर जाण्यासाठी साधारण 40 ते 45 मिनिटे लागू शकता. पेठशहापूरला जाण्यासाठी लोणावळ्यातून INS शिवाजीमार्गे आंबवणे, भांबुर्डे किंवा सहा प्रकल्पाकडे (अॅम्बी व्हॅली) जाणारी बस पकडावी लागते. पेठ शहापूर गावात उतरल्यानंतर सरळ एक वाट गडावर गेली आहे. या ठिकाणी वाहनतळ असून पार्किंगसाठी पैसे आकारले जातात.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का
गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. तसेच गडावर राहण्याची सुद्धा कोणताही सोय नाही. गडावर पाण्याची टाकी आहेत. मात्र, टाक्यांमधले पाणी पिण्यायोग्य नाही. मुक्काम करायचाच असेल तर पेठशहापूर गावातील हनुमान मंदिरामध्ये मुक्काम करता येतो. तसेच आंबवणे गावात असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये राहण्याची सोय होऊ शकते.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.