Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात पुणे जिल्ह्याचे महत्त्व प्रचंड होते. मध्यवर्ती ठिकाण आणि शिवरायांच वास्तव्य पुणे जिल्ह्यात असल्यामुळे जिल्ह्याचा आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. घाटमाथ्यावरून ये-जा करताना चौफेर लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी राजगड, तोरणा या गडांसह अनेक छोटेमोठे गड घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारले होते. स्वराज्याच्या उभारणीत या सर्व गडांचे विशेष योगदान आहे. या फळीतला एक गड म्हणजे Tung Fort होय.

पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून 12 किलो मिटरच्या अंतरावर तुंग गड आहे. इतर गडांप्रमाणे तुंग गडाला सुद्धा विशेष नाव देण्यात आले होते. तुंग गडाला काठीगड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तुंग गडाची समुद्र सपाटीपासून उंची 1075 मिटर इतकी असून गड तिन्ही बाजूंनी पवना जलाशयाने वेढलेला आहे. गडाच्या आजूबाजूला निसर्गचे अद्भूत दृश्य पाहता येते. गड पाहताच आपल्याला शंकूच्या आकाराच भास होता. कारण तुंग गडाची रचना शंकूच्या आकाराची असून गडावर चढताना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. त्यामुळे लोणावळ्यात असणाऱ्या एका गडाला आवर्जून भेट दिली पाहिजे. चला तर म या तुंग गडाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

तुंग आणि इतिहास

तुंग गडाची रचना पाहता गडाचा वापर बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी होत असे. गडाचा आकार फार मोठा नाही. त्यामुळे गडावर जवळपास 200 च्या आसपास सैनिक थांबू शकत असावेत. इतिहासात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, तुंग गड इसवी 1600 साली बांधण्यात आला. तुंग गडावरून लोहगड, पवना धरण, विसापूर, तिकोणा, मोरगिरी आणि मावळ परिसरातील सर्व परिसरावर चौफेर नजर ठेवता येत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असणार्‍या प्रत्येक गडाला वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. 1660 मध्ये तुंग गड आणि आजूबाजूच्या भागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेताजी पालकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. जयसिंग आणि दिलेरखानाने 6 मे 1665 साली या भागावर स्वारी केली आणि या भागात अनेक गावं जाळली, नरसंहार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या भागातील गड जिंकून घेण्यात त्याला यश आले नाही. 12 जून 1665 साली पुरंदरचा तह झाला आणि 18 जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत या परिसरावर ताबा मिळवला. मात्र, यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांताताली इतर अनेक गडांसह तुंग गड सुद्धा स्वराज्यात सामील करू घेतला. पुढे इंग्रजांनी 1818 मध्ये गडाचा ताबा मिळवला.

गडावर पहायचे काय?

गडावर पाहण्यासारख्या फार गोष्टी नाहीत. गडाचा माथा छोडा असल्यामुळे संपूर्ण गड पाहण्यासाठी एक तास पुष्कळ होतो. तुंगवाडीतून गडावर जाताना वाटेत मारूतीचे मंदिर लागते. बजरंगबलीचे दर्शन घेऊन गडाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर गोमुख रचनेचा दरवाजा आपलं लक्ष वेधून घेतो. दरवाजा ओलांडल्यानंतर गडाच्या माथ्यावर आपण पोहचतो.

गडावर गेल्यानंतर उजव्या हाताला गणपणतीचे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळून झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर एक पाण्याच खंदक तुमच्या निदर्शनास येईल. याच पाण्याच्या खंदकापासून बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे. बालेकिल्ल्यावर गेल्यानंतर गडाची रक्षणकर्त्या तुंगी देवीचे मंदिर आहे. मंदिरा समोर विशिष्ट रचनेची जमिनीत खोदलेली गुहा आपलं लक्ष वेधून घेते. गुहा छोटी असल्याने दोन ते तीन जण या गुहेमध्ये राहू शकतात. मात्र, पावसाळ्यात गुहेमध्ये राहण्याची सोय होतं नाही.

गडाचा माथा फार छोटा आहे. त्यामुळे संपूर्ण गड अवघ्या एक तासामध्ये पाहून पूर्ण होतो. त्यामुळे नवख्या ट्रेकर्ससाठी हा गड एक चांगला पर्याय ठरू शकतो.

गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या

गडावर जाण्याची एकच वाट आहे. मात्र, त्या वाटेला अनेक वाटा फुटल्या आहेत. तुंग गडावर जाण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम गडाच्या पायथ्याला असलेल्या तुंगवाडीमध्ये यावे लागणार आहे. या तुंगवाडीत येण्याच्या तीन वाटा आहेत.

ज्या भटक्यांना तिकोना ते तुंग असा रेंज ट्रेक करायचा आहे. असा दुर्गवेड्यांनी तिकोना गड पाहून झाल्यानंतर तिकोना पेठेत उतरून काळे कॉलनी रस्त्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. या मार्गे जाताना तुम्हाला ब्राम्हणोली हे गावं लागेल. या गावातून लाँचने केवरे गावात जाता येतं. ब्राम्हणोली ते केवरे गावात पानशेत जलाशयातून जाण्याचा आनंद लुटता येतो. शांत जलाशय आणि आजूबाजूला हिरवळ पाहिल्यानंतर सर्व थकवा आपोआप नाहीसा होता. केवरे गावात पोहचल्यानंतर साधारण 20 मिनिटांमध्ये आपण तुंगवाडीमध्ये पोहोचतो.

मुंबई किंवा पुणे वरून गडावर जाण्यासाठी जे कोणी येणार असताली, त्यांनी सर्व प्रथम लोणावळा स्टेशनवर पोहचावे. स्टेशनवरून भांबूर्डे किंवा आंबवणे गावात जाणारी एसटी पकडावी. हे अंतर साधारण 26 किलो मीटरचे आहे. हे अतंर पार केल्यानंतर धुसळखांब फाट्यावर तुम्हाला उतरायचे आहे. या फाट्यापासून जवळपास 8 किलो मीटरचे अंतर पायी पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही तुंगवाडीमध्ये पोहचाल.

तुंगवाडीमध्ये जाण्यासाठी बऱ्याच वेळा लाँच मिळत नाही. अशावेळी तिकोनापेठेतून दुपारी 11 वाजता एसटी महामंडळाची कामशेत-मोरवे ही गाडी पकडून तुम्हाला तुंगवाडीच्या फाट्यावर उतरावे लागणार आहे. इथे उतरल्यानंतर पाऊन तास चालत जाऊन तुम्हाला तुंगवाडीमध्ये पोहचावे लागणार आहे.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

तुंगवाडी गडाची रचना पाहता गड अगदी एक तासाला पाहूण पूर्ण होतो. त्यामुळे गडाखाली असणाऱ्या तुंगवाडीमध्ये तुमच्या जेवणाची सोय होऊ शकते. मात्र, गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. तसेच गडावर पाण्याची सुद्धा सोय नाही. त्यामुळे गडावर जाताना जेवणाची आणि पाण्याची सोय आपण आपली करावी. गडावर जाताना एक दोन मंदिरे लागतात. यापैकी मारुती रायाच्या मंदिराते अंदाजे 5 ते 7 जण आरामात राहू शकतात. तसेच तुंगवाडीमध्ये असणाऱ्या भैरोबाच्या मंदिरामध्ये 20 जणांची राहण्याची सोय होऊ शकते.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment