Ghangad Fort – महिला कैद्यांना या गडावर कैद केलं होत, वाचा या अपरिचित गडाचा इतिहास…

शिवकाळात पुणे हे स्वराज्याचे मुख्य केंद्रबिंदु होते. छत्रपती शिवाजी महाराजांसह राजघराण्यातील सर्वांचे वास्तव्य पुण्यामध्येच होते. त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूचा परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवरायांनी अनेक गडांची निर्मिती केली, तसेच काही गड जिंकून स्वराज्यात सामील केले. पुणे जिल्ह्यात आढळणारा Ghangad Fort असा काही मोजक्या गडांपैकी एक. निजामशाही, आदिलशाही मराठे पुन्हा आदिलशाही असा थरार या गडाने अनुभवला. मुळशीच्या पश्चिमेला असणाऱ्या ‘कोरसबारस’या मावळात घनगड किल्ला अगदी थाटात उभा आहे.

गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा घनगडा समु्द्रसपाटीपासून 2566 फूट उंचीवर आहे. घनगड तसा पुण्यापासून बराच लांब आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना या गडाबद्दल माहिती नाही. ‘येकोल्याचा किल्ला’ या नावाने सुद्धा घनगडाला ओळखलं जातं. गडावर चढताना काही ठिकाणी कसरत करावी लागते. एक दोन पॅच सोडले तर घनगड चढण्यासाठी फारच सोप्पा गड आहे. नवख्या ट्रेकर्सनेही आवर्जून घनगड सर केला पाहिजे. चला तर म वेळ न दवडता घनगडाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

घनगड आणि इतिहास

घनगडाचा इतिहास रोमांचकारी आहे. मात्र, घनगड नेमका बांधला कोणी या बद्दल इतिहासात उल्लेख आढळून येत नाही. परंतु घनगडाचा सर्वप्रथम उल्लेख निजामशाहीच्या काळात आढळून आला आहे. अहिल्यानगरच्या (नगर) कोळी सामंतांच्या ताब्यात हा गड होता. त्यांच्याकडून निजामशाहीकडे गड आल्याची इतिहासात नोंद आहे. निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर आदिलाशाही सरदार ढमाले देशमुख यांनी गडावर आपला ताबा निर्माण केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य विस्तार करण्याची मोहिम सुरू केली, तेव्हा आदिलशाही सरदार ढमाले देशमुख यांना स्वराज्यात सामील करून घेण्यात त्यांना यश आले.

इसवी सन 1647 साली ढमाले देशमुख स्वराज्यात सामील झाले. त्यामुळे घनगड सुद्धा आपोआप स्वराज्यात दाखल झाला. त्यानंतर 1665 पर्यंत घनगड स्वराज्यात होता. मात्र, पुरंदरचा तह झाला आणि इतर गडांसाबोत घनगड सुद्धा मुघलांच्या ताब्यात गेला. पुढच्या पाचच वर्षांमध्ये 1670-71 च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी घनगड पुन्हा स्वराज्यात आणला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर घनगडावर मुघलांनी कब्जा केला होता. त्यानंतर मराठे आणि पुन्हा मुघल असा प्रवास गडाने अनुभवला.

इतिहासात करण्यात आलेल्या नोंदीनुसार, इसवी सन 1700 मध्ये घनगड शंकराजी नारायण सचिवांच्या ताब्यात होता. परंतु, छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि मुघलांनी घनगडावर हिरवा झेंडा फडकवला. मात्र, मुघलांचा हिरवा झेंडा गडावर जास्त दिवस टिकू शकला नाही. पंतसचिवांनी आदेश दिले आणि कान्होजी आंग्रे यांनी तत्काळ आदेशांची अंमलबजावणी करत कोरीगड, तिकोना, राजमाची तुंग, लोहगड आणि घनगड जिंकून गडांवर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावला.

  1. Chanderi fort – गगनाला भिडणारा चंदेरी, एक थरकाप उडवणारा गड

  2. Rajgad Fort – राजांचा राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी; एकदा पहाच

बारभाई प्रकरण घडले तेव्हा राघोबा दादांना मदत कराणाऱ्या सखाराम हरी गुप्ते यांना घनगडावर कैदेत ठेवले होते. फितुरीप्रकरणी सखाराम हरी गुप्ते यांना कडक बंदोबस्तामध्ये गडावर कैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, 1779 च्या दरम्यान कैदेमध्ये असतानाच सखाराम हरी गुप्ते यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना या बद्दल जराही कल्पना नव्हती. गुप्ते यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी घनगाडाच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र वाटेतच तेलबैला जवळ असणाऱ्या घाटात पतीच्या मृत्यूच्या बातमी त्यांना समजली. पतीचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडताच धक्क्याने त्यांचाही मृत्यू झाला. घाटात त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्या घाटाला तेव्हापासून ‘सवाष्णी घाट’ किंवा ‘सतीचा घाट’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

घनगडाच्या इतिहासात कैद्यांना ठेवण्यासाठी गडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्याच्या अनेक नोंदी आढळून येतात. 1777 ते 1783 च्या काळात राजकैद्यांसोबत अनेक महिला कैद्यांना गडावर कैदेत ठेवण्यात आले होते. तसा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळून येतो. पेशवाईच्या शेवटच्या काळात घनगडाचा ताबा बाळाजी कुंभार यांच्या ताब्यात होता. मात्र, इतर गडांप्रमाणे 1888 साली घनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. कर्नल प्रॉथर याने लढाई न करता अगदी सहज घनगड जिंकून घेतला.

गडावर गेल्यानंतर पहायचे काय?

नवख्या ट्रेकर्ससाठी घनगड हा उत्तम गड आहे. काही ठिकाणी गड चडण्यासाठी थोडी कसरत करावी लागते. पंरतु सहकाऱ्यांच्या जोडीने अगदी सहज गड चढून होतो. गडावर जाताना वाटेत शिव मंदिराचे अवशेष, शिवपिंड, नंदी, वीरगळ व काही तोफगोळे दिसतात. मुख्या पायवानेटेने चालत गेल्यानंतर गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या डाव्या बाजूच्या भिंतीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. त्यामुळे शिलालेख आवर्जून पहा. त्याच बरोबर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला गारजाई देवी व इतर देवांच्या मुर्त्यांचे दर्शन होईल.

गारजाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुढे एक प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारासमोर आपल्याला कातळात कोरलेली एक गुहा लागते. या गुहेमध्ये अंदाजे 4 ते 5 जण आरामात राहू शकतात. या प्रवेशद्वाराच्या शेजारी एका भलामोठ दगड कातळातून निसटून खाली आला आहे. या निसटलेल्या दगडामुळे इथे एक नैसर्गिक कमान तयार झाली आहे. मोठ्या खिडकीत आपण बसलो आहोत, असा भास या ठिकाणी होतो. इथून पुढे गडावर जाणारा एक अवघड पॅच आहे. मात्र या ठिकाणी लोखंडी शिडी लावण्यात आली आहे. त्यामुळे हा अवघड पॅच सोपा झाला आहे.

गडावर जाताना अनेक छोट्या मोठ्या गुहा लागतात तसेत पाण्याची टाकं आपली लक्ष वेधून घेतात. गडाचा माथा मात्र इतर गडांच्या तुलनेत छोटा आहे. त्यामुळे गड पाहण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गडावर असणाऱ्या झेंड्याच्या आजूबाजूला काही वास्तुंचे अवशेष आपल्याला पहायला मिळतात. घनगडावरून चौफेर नजर फिरवल्यास आपल्याला सुधागड, तैलबैला, सरसगड या गडांचे दर्शन होते. या गडांव्यतिरिक्त सवाष्णीचा घाट, भोरप्याची माळ आणि नाणदांड घाट या कोकणातील घाटवाट सुद्धा लक्ष वेधून घेतात.

गडावर जाण्यासाठी कोणत्या गावात जायचं

घनगडावर जाण्यासाठी एक वाट असून ती एकोले या गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून गडावर गेली आहे. एकोले गाव पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या ट्रेकर्ससाठी घनगड मध्यवर्ती आहे. शक्यतो घनगडावर जाण्यासाठी स्वत:ची गाडी असेल तर उत्तम कारण एकोले गावात जाण्यासाठी खाजगी वाहतूक नाही. तुम्हाला जर एसटी बसने घनगडावर जायये असेल. तर, सर्व प्रथम तुम्हाला लोणावळ्यातून भांबुर्डे या गावी जावं लागले. हे अंतर 32 किलोमीटरचे आहे. भांभुर्डे गावात उतरल्यानंतर एकोले गावात चालत जाण्यासाठी 15 मिनिटे लागतात. खाजगी वाहनाने गडावर जायचे असेल तर एकोले गावात गाडी घेऊन जाता येतं. गावामध्ये गाडी लावण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध आहे.

गडावर जेवण्याची राहण्याची सोय आहे का?

इतर गडाच्या तुलनेत या गडावर येणाऱ्या भटक्यांची संख्या कमी आहे. तसेच बऱ्याच जणांना हा गड माहिती नाही. त्यामुळे गडावर जेवणाची कसलीही सोय नाही. गडावर पाण्याची असंख्य टाकी आहेत. त्यामुळे पाण्याची सोय गडावर होऊ शकते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून गडावर जाताना मुबलक स्वरुपात पाणी घेऊन जावे. घनगडावर जाताना गुहा आणि गारजाई देवीचे मंदिर लागते. या गुहेमध्ये 5-6 जण आणि मंदिरामध्ये साधारण 10 लोक आरामात राहू शकतात. एकोले गावातून गडावर जाण्यासाठी साधारण एक तास लागू शकतो.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment