Vasai Fort – मराठ्यांनी अस पळवून लावलं पोर्तुगीजांना, चिमाजी आप्पांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे वसईचा किल्ला

डोंगरदऱ्यांमध्ये असणारे गड पाहण्यासाठी दर शनिवारी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये मोठ्या संख्येने तरुणाई गर्दी करते. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या गडांना भेट दिल्यावर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासात आल्याचा भास होतो. शिवरायांनी आपल्या दुरदृष्टीने गनीमांचा काटा काढण्यासाठी अशा अनेक गडांची सह्याद्रीच्या कुशीत निर्मिती केली. मात्र, याबरोबर समुद्र किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी सु्द्धा त्यांनी प्रयत्न केले होते. शिवरायांच्या विचारांनी प्रभावित होऊन समुद्र किनार्‍यांच्या संरक्षणाची अनेक गडांची बांधणी करण्यात आली त्यातला एक गड म्हणजे Vasai Fort होय.

चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे वसईचा किल्ला होय. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांची प्रादेशिक विभागणी दोन भागांमध्ये केली जाते. उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. दक्षिण कोकणाच्या तुलनेत उत्तर कोकणात पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात सागरी व्यापार केला जात होता. त्यामुळे उत्तर कोकणात असणारे मुंबई हे बेट खूप महत्त्वाचे होते. त्याच्या संरक्षणासाठी अनेक गडांची निर्मिती करण्यात आली. या सर्व गडांमध्ये वसईचा किल्ला महत्त्वाचा होता. कारण मुंबई, साष्टी, ठाणे हा सर्व परिसर आणि समुद्रकिनारा वसईच्या किल्ल्यामुळे ताब्यात ठेवता येत होता. गडाचा विस्तार फार मोठा आहे. त्यामुळे समुद्र किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी या गडाची भूमिका महत्त्वाची होती.

Vasai Fort आणि इतिहास

वसई किल्ल्याच्या इतिहासाच पुस्तक उलगडल्यावर अनेक कोडी आपोआप सुटतात. ऐतिहासिक ग्रंथांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, इ.स 1414 साली भडारी भेंगळे नावाच्या एका सरदाराने वसईचा किल्ला बांधला. वसईच्या किल्ल्याचा हा खरा सूत्रधार होता. नंतरच्या काळात परकीयांची वाईट नजर गडावर पडली आणि इ.स 1530 साली गुजरातच्या सुलतानाने वसईचा किल्ला जिंकून घेतला. पुढची चार वर्ष किल्ला गुजरातच्या सुलतानाच्या अंमलाखाली होता. व्यापाराच्या दृष्टीने किल्ला खूप महत्त्वाचा होता. त्यामुळेच पोर्तुगीजांनी इ.स 1534 साली गड आपल्या ताब्यात घेत गडाची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात केली. तब्बल दहा वर्ष या गडाचे काम सुरू होते. आजही हा गड तितक्याच मजबूत स्थितीमध्ये उभा आहे.

Ajinkyatara Fort – मराठ्यांची चौथी राजधानी किल्ले अजिंक्यतारा

मुंबई जवळ असणारा साष्टी म्हणजेच ‘सहासष्टी’ नावाचा प्रदेश. या प्रदेशावर चौफेर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला ताब्यात असणं सर्वांसाठीच महत्त्वाच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसईच्या किल्ल्याशी संबंध आढळून आला नाही. तशी नोंदही आढळून येत नाही. मात्र, इ.स 1737 साली मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पराभवाची कारण शोधून मराठ्यांनी पुन्हा एकदा इ.स 1738 साली गडावर आपला मोर्चा वळवला. बाजीराव पेशव्याने वसईचा किल्ला जिंकून आणण्याची जबाबदारी चिमाजी आप्पांच्या खांद्यावर सोपवली. चिमाजी आप्पांनी मोहिम आखली आणि 1738 साली पोर्तुगीजांनी विचारही केला नसेल अशा भागातून मराठ्यांचे सैन्य गडावर घुसवले.

चिमाजी आप्पांनी मोठी शक्कल लढवत गडाच्या दलदलीच्या भागातून पोर्तुगीजांवार आक्रमण करण्याची मोहिम आखली होती. मराठ्यांनी तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले. गाफील पोर्तुगीजांना याचीही किंचितही कल्पना नव्हती. ‘हर हर महादेव’ ची गर्जना करत मराठ्यांचे सैन्य पाहता पाहता गडात शिरले. मराठे आणि पौर्तुगीज यांच्यामध्ये दोन दिवस तुंबळ युद्ध झाले. 2 मे 1739 रोजी सुरू झालेली लढाई 4 मे 1739 रोजी संपुष्टात आली. मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकून घेतला. चिमाजी आप्पांनी मोहिम फत्ते केली. या लढाईत पोर्तुगीजांचे जवळपास 800 सैनिक मारले गेले. दारुगोळा संपेपर्यंत पोर्तुगीजांनी निकराचा लढा दिला. मात्र, दारुगोळा संपताच पोर्तुगीज शरण आले आणि त्यांनी पराभव मान्य केला. किल्ल्यावर असणाऱ्या बायका लहान मुलांना सुखरूप जाऊ दिले आणि गडावर स्वराज्याचा भगवा ध्वज डौलात फडकला.

चिमाजी आप्पांनी गड जिंकून घेतल्यानंतर गडावर विविध उपाय योजना केल्या. मात्र, 1780 साली ब्रिटिशांनी नजर गडावर पडली आणि त्यांनी गड ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. या काळात विसाजी कृष्ण लेले हे किल्लेदार पदाची जबाबदारी पार पाडत होते. इंग्रजांनी डाव टाकण्यास सुरुवात केली आणि कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. कर्नल गोडार्ड आणि कर्नल हार्टले यांनी वसईला वेढा घातला. कर्नल गोडार्डने समुद्रमार्गे आणि कर्नल हार्टले याने कल्याणवरून हल्ला करण्याचे नियोजन केले. या काळात पेशव्यांची सर्व सुत्र पुण्यातून हालत असे. त्यामुळे पुण्यातून कोणतीही कुमक किल्ल्यामध्ये पोहचू नये याची इंग्रजांनी पूर्ण खबरदारी घेतली होती.

Dategad Fort – गड जिंकला अन् शिवरायांनी नामकरण केले, पाटणच्या खोऱ्यातला एक देखणा दातेगड

नाना फडणिसांना इंग्रजांच्या आक्रमणाबद्दल समजताच त्यांनी तत्काळ आनंदराव रास्ते यांना किल्ल्यापासून 8 किमीच्या अंतरावर असलेल्या गोखराव या गावात धाडले. 23 ऑक्टोबर रोजी भवानी शिवराम, चिमाजी पानसे यांच्या फौजा तोफखाना घेऊन किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. मात्र, गडाला इंग्रजांनी चौफेर घेरले होते. त्यामुळे गडाच्या आतमध्ये काहीही घेऊन जाता येत नव्हते किंवा किल्ल्यातून बाहेरही काही आणता येत नव्हते. हळूहळू किल्ल्यावरील अन्नधान्य कमी होत गेलं आणि त्याची टंचाई भासू लागली. याच संधीचा फायदा घेत इंग्रजांनी तोफा डागायला सुरुवात केली. मराठ्यांनी कडवा प्रतिकार केला. 28 ऑक्टोबरला सुरू झालेले हे युद्ध 12 डिसेंबर पर्यंत सुरू होते. अखेर इंग्रजांना गड जिंकून घेण्यात यश आले, 12 डिसेंबरला गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडाची सध्याची अवस्था व रचना

पोर्तुगीजांनी अगदी बारकाईने गडाचे काम पूर्ण करून घेतले. गडाची भव्य रचना आणि समुद्र तटाला भिडणारा बुरूज शत्रू सैन्याला कडवी झूंज देण्यासाठी सज्ज करण्यात आला होता. किल्ल्याची रचना दशकोनी स्वरुपाची असून प्रत्येक कोपऱ्यात एक बुरूज उभारण्यात आला आहे. बुरुजांना कल्याण बुरूज, फत्ते बुरूज, कैलास बुरूज, बाहरी बुरूज आणि दर्या बुरूज अशी नावे दण्यात आली. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी असून किल्ल्याला एक प्रवेशद्वार समुद्राकडून आणि दुसरं भूभागाकडून आहे. त्याच बरोबर चोर दरवाजा सुद्धा किल्ल्यावर आहे. जलदुर्ग आणि भुदुर्ग प्रकारात मोडणारा वसईच्या किल्ला तिन्ही बाजूंनी दलदलीने व्याप्त आहे. किल्ल्याची एक बाजू सागराला थेट भिडते. गड आजही सुस्थितीत असून पाहण्यासारखा आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे

वसई किल्ला लहानांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वाना पाहता यावा असा आहे. त्यामुळे कुटुंबासह या किल्ल्याला एकदा आवर्जून भेट द्या. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ‘भूई दरवाजा’ आहे. गडातून आत प्रवेश केल्यानंतर समोरच मारुती रायाचे दर्शन होते. किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर बाणाच्या आकाराचे दहा बुरूज आहेत. या बुरूजांना पोर्तुगीजांनी त्यांच्या भाषेमध्ये नाव दिली होती. त्यांची नाव पुढील प्रमाणे रैस मागो, सेंट गोंसोले, नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रु, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा बुरूज सेंट सेबस्तियन कावलिरो या नावांनी संबोधला जात होता. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यानंतर सर्व बुरूजांची नाव बदलली होती.

Nhavigad Fort – शिवरायांच्या स्वराज्यातील एक देखणा गड

गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. चिमाजी आप्पांची भव्य समाधी किल्ला परिसरात आहे. पोर्तुगीजांनी बुरुजांना दिलेली नाव मराठ्यांनी बदलली होती. त्यानुसार बहिरी, भवानी मार्तंड, यशवंत, कैलास आणि कल्याण बुरूज अशा स्वरुपाची नाव मराठ्यांच्या माध्यमातून बुरूजांना देण्यात आल्याची नोंद आढळून येते. वसईचा किल्ला भुईकोट असला तरी खूप मोठा आहे. अनेक वास्तूंच दर्शन गडावर आपल्याला होतं. संपूर्ण किल्ला व्यवस्थित पाहण्यासाठी साधारण दीड ते दोन तास लागतात.

गडावर जायचे कसे

गडावर जाण्यासाठी तुम्हाला दादर रेल्वे स्थानकातून वसईला जाणरी ट्रेन पकडून वसई स्टेशनला उतरावे लागणार आहे. स्टेशनला उतरल्यानंतर स्टेशन ते वसई किल्ला अशा बसेस सारख्या सुरू असतात. या बस तुम्हाला थेट किल्ल्याच्या गेटवर पोहचवतात.

किल्ल्यावर राहण्याची सोय आहे का

किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही. मात्र, किल्ला परिसरात आजूबाजूला चांगले हॉटेल्स आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची सोय होऊ शकते. किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय आहे.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment