महाराष्ट्र केसरी म्हटल की एखादा धिप्पाड तरुण तुमच्या डोळ्या समोर आला असेल. लाल मातीत रंगणाऱ्या कुस्तीवर पुरुषांच आजही अधिराज्य आहे, अस म्हटल तर चुकीचं ठरणार नाही. खाशाबा जाधव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौघुले, शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, बाला रफिक शेख, नरसिंग यादव, सिकंदर शेख इ. ही महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध कुस्तीपटुंची नावं. महाराष्ट्रातील कुस्ती न पाहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा यांची नाव सांगता येतील. पण तुम्हाला महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटूंची नावे विचारली तर सांगता येतील का? याच उत्तर हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या लोकांनाच माहित असेल.
याच पुरुषी वर्चस्वाला भेदून वयाच्या 21 व्या वर्षी पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावलाय सांगलीची लेक म्हणजे Pratiksha Bagdi (First Women Maharashtra Kesari) हिने. 2023 साली पार पडलेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद तिने पटकावत इतिहास रचला आणि कुस्तीचा एक नवीन अध्याय महाराष्ट्राच्या मातीत सुरू झाला. विशेष म्हणजे तिने अंतिम सामन्यात तिचीच मैत्रिण वैष्णवी पाटीलचा 4-10 अशा फरकांनी पराभव केला. त्यामुळे वैष्णवी पहिली महिला उप-महाराष्ट्र केसरी ठरली आहे. महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी 1961 साली मिळाला होता. मात्र पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळण्यासाठी 2023 हे साल उजाडावे लागले हे दुर्दैव. चला तर जाणून घेऊया प्रतिक्षा बागडी हिचा संपूर्ण प्रवास.
First Women Maharashtra Kesari प्रतिक्षा बागडी
पश्चिम महाराष्ट्रातील निसर्ग संपन्न जिल्हा असलेल्या सांगली जिल्ह्याची प्रतिक्षा मुळ रहिवासी आहे. प्रतिक्षाचे वडील रामदार बागडी हे जुन्या काळातील नामवंत मल्ल. त्यांनी त्यांच्या काळात अनेक दिग्गज मल्लांना अस्मान दाखवत मैदानं गाजवली. तसेच अनेक बक्षिसांवर मोहर उमटवत आपल्या नावाचा डंगा वाजवला. रामदास बागडी सध्या पोलीस दलात कार्यरत आहे. असा हाडाचा कुस्तीपटू असणाऱ्या रामदास बागडी यांच्या घरात प्रतिक्षाचा जन्म झाला. वडील नावाजलेले कुस्तीपटू होते. त्यामुळे सहाजिकच बालपणीच तिला कुस्तीच बाळकडू मिळालं.
लहान असतानाच वडील रामदास यांनी प्रतिक्षावर विशेष लक्ष देत तिला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली होती. प्रतिक्षा सुद्धा लाल मातीत रमायला लागली. प्रतिक्षाची आवड पाहून रामदास यांनी प्रतिक्षाला सांगली येथील वसंतदादा कुस्ती केंद्र येथे धडे गिरवण्यास धाडले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने प्रतिक्षाचा कुस्तीपटू म्हणून जीवन प्रवास सुरू झाला.
मुंगी एवढ्या कारकिर्दीत हत्ती एवढी कामगिरी
लहानपणापासून प्रतिक्षा कुस्तीचे धडे गिरवत आहे. विशेष म्हणजे तिला सुद्धा कुस्तीची प्रचंड आवड आहे. त्यामुळे वेगवेगळे डाव कशा पद्धतीने टाकता येतील, खेळताना डोकं शांत कसं ठेवायचं याचा एकदम बारकाईने तिने सराव केला. याचा तिला प्रत्येक सामन्यात फायदा झाला. 2023 साली जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रतिक्षाने तब्बल 12 वेळा राज्य स्पर्धेत पदक जिंकले आहे. त्याच बरोबर 22 वेळा राष्ट्रीय पातळीवर सुद्धा तिने सहभाग नोंदवला आहे. प्रतीक्षा कुस्तीपटू असली तरी तिचा अभ्यासावर फोकस जराही हिकडे तिकडे होत नाही. अभ्यासातही ती उत्तम आहे. सध्या इस्लामपूरच्या के.बी.पी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला ती शिकत आहे. अभ्यासा सोबत कुस्तीचे धडे अशी प्रतिक्षाची दुहेरी कसरत सध्या सुरू आहे.
प्रतिक्षाच्या यशाचा आलेख असाच उंचावर राहील यात तिळमात्र शंका नाही. तिच्यापाठी असणारी आई-वडिलांची साथ तिला नक्कीच यशाच्या उंचीवर घेऊन जाण्यास पुरेशी ठरेल. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या वैष्णवी पाटील हिचा संघर्ष सुद्धा प्रेरणादाई आहे. प्रतिक्षाला कुस्तीचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. मात्र त्याच्या उलट परिस्थिती वैष्णवीची होती. तिला कोणताही कुस्तीचा वारसा लाभला नाही. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला होता. वडील शेतकरी आणि व्यावसायिक आहेत. मात्र वडीलांचे कुस्तीवर विशेष प्रेम होते. त्या प्रेमा खातर वैष्णवीचे कुस्तीमध्ये पदार्पण झाले.
मुळ कल्याण-डोबिंवलीची रहिवासी असणाऱ्या वैष्णवीने आपला सराव सुरू करण्यासाठी नांदवली गाठली. वस्ताद पंढरीनाथ ढोणे बापूंच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान तालमीत तिला सराव सुरू झाला. तिने सुद्धा आपल्या लहानशा कारकिर्दीमध्ये चमकदार कामगिरी करत अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. वैष्णवीच्या नावावर वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक आणि राज्यस्तरीय स्पर्धेत तब्बल 10 पदके तिने पटकावली आहेत.
पुरुष महाराष्ट्र केसरीचे मागील पाच वर्षातील मानकरी
सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारे विजय चौधरी यांचे आव्हन मोडून काढत 2017 साली पैलवान अभिजीत काटके यांनी महाराष्ट्र् केसरीच्या किताबावर आपल्या नावाची मोहर उमटवली. त्यानंतर 2018 साली पैलवान बाला रफीक शेख, 2019 साली पैलवान हर्षवर्धन सदगीर, 2021-22 साली पैलवान पृथ्वीराज पाटील, 2022-23 साली पैलवान शिवराज राक्षे आणि 2023-24 साली पैलवान सिकंद शेख यांनी महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकावले आहे.
आता पर्यंत तीन वेळा महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद नरसिंग यादव यांनी आणि विजय चौधरी यांनी पटकावले आहे. पैलवान नरसिंग यादव यांनी 2011,2022 आणि 2013 मध्ये सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकावले होते. त्याच बरोबर पैलवान विजय चौधरी यांनी 2014,2015 आणि 2016 साली सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.