छत्रपती Shivaji Maharaj यांचे सर्वाधिक वास्तव्य पुणे जिल्ह्यात होते. शिवरायांच बालपण लाल महालात गेल्यामुळे आणि राजधानी राजगड असल्यामुळे सुरुवातीला स्वराज्याचा सर्व कारभार पुण्यातून हाकला जाई. त्यामुळे पुणे आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी महाराजांनी विशेष काळजी घेतली होती. पुण्यातील बऱ्यापैकी सर्वच गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ घालवला आहे. विशेष लक्ष देऊन त्यांनी गडांची निर्मिती केली होती. व्यापार सुरळीत व्हावा यासाठी शिवरायांनी विशेष काळजी घेतली होती. त्या अनुषंगाने घाट मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी छोटेमोठे अनेक गड निर्माण केले. त्यातीलच एक गडांची जोडगोळी म्हणजे Visapur Fort आणि लोहगड होय.

मुंबई-पुणे या महामार्गाच्या अगदीच शेजारी असणाऱ्या विसापूर गडाची तटबंदी महामार्गावरून अगदी सहजच नजरेस पडते. त्यामुळे या गडावर जाण्याचा मोह टाळता येत नाही. लोणावळ्याच्या कुशीत असलेला हा गड पावसाळी वातावरणात दुर्गप्रेमींना आकर्षीत करतो. मावळ तालुक्यात मोडणारा हा Visapur Fort खंडाळा म्हणजेच बोर घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. लोहगड आणि विसापूर या दोन गडांवर बोर घाटाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी होती. त्यामुळे मुंबई आणि पुणे या मुख्य शहरांच्या अगदी जवळ असणार्या या गडांना एकदा नक्कीच भेट द्यायला पाहिजे.
Visapur Fort आणि इतिहास
विसापूर गडाचा इतिहासामध्ये फारसा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे गड बांधला कोणी याची ठोस माहिती उपलब्ध होत नाही. मात्र, लोहगडाच्या इतिहासात डोकावल्यास गडाच्या इतिहासाबद्दल अंदाज लावला जाऊ शकतो. म्हणजेच लोहगड बराच काळ आदिलशहाच्या आधिपत्याखाली होती. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही गड शेजारी-शेजारी आहेत. त्यामुळे लोहगडाच्या सोबतीने विसापूरवर सुद्धा आदिलशहाचे वर्चस्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा विडा हाती घेतला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गडांवर स्वराज्याचा भगवा फडकवण्यात आला. याच दरम्यान शिवरायांनी मावळ्यांच्या सोबतीने कल्याण आणि भिवंडी हा सर्व परिसर 1657 साली स्वराज्यात सामील करून घेतला. याच काळात लोहगडाच्या सोबतीने विसापूर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्याची इतिहासात नोंद आहे. शिवरायांनी लोहगडाची डागडूजी करण्याचे आदेश दिले होते. तसेच विसापूरची डागडूजी करण्याचे आदेशही दिले असावेत अशी शक्यता आहे.
इ.स 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला आणि स्वराज्यातील अनेक गड मुघलांच्या स्वाधीन करावे लागले. या गडांमध्ये लोहगडासह विसापूरचा सुद्धा समावेश होता. मराठ्यांनी योग्य संधीची वाट पाहत 13 मे 1670 साली दोन्ही गड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले. त्यानंतर लोहगड मराठ्यांच्या ताब्यात होता. मधल्या काळात 1682 साली शहाबुद्दीन याने लोहगडावर स्वारी केली होती. त्याने केलेल्या हल्ल्यात अनेक माणसं मारली गेलीत. त्यामुळे त्याच्या हलल्यात वाचलेल्यांनी विसापूरला आश्रय घेतला होता. मात्र, शहाबुद्दीने याने लोहगड किंवा विसापूर जिंकला होता का नाही याबद्दल ठोस माहिती उपलब्ध होत नाही. 3 मार्च 1818 रोजी जनरल प्रॉथर याने विसापूर गडावर आक्रमण केले व गड जिंकून घेतला. विसापूर ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 मार्च 1818 रोजी प्रॉथर या इंग्रज अधिकाऱ्याने लोहगड सुद्धा जिंकून घेतला.
गडाची सध्याची अवस्था
गिरिदूर्ग प्रकाराच मोडणारा विसापूर समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर आहे. गडावर चडण्याची श्रेणी मध्यम स्वरुपाची आहे. पावसाळी वातवरणात गडाचे सौंदर्य चांगलचे खुलून उठते. त्यामुळे या काळात मोठ्या संख्यने दुर्गप्रेमी गडावर हजेरी लावतात. गडाला भव्य तटबंधी असून महामार्गावरूनच ती नजरेच पडते. त्यामुळे गड सुस्थितीत आहे असंच म्हणावं लागले.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
गडाच्या सुंदरतेमध्ये भर घालणार्या पायऱ्या गडावर जाताना एक वेगळाच अनुभव देऊन जातात. पायऱ्या सुस्थितीत असून पावसाळी वातावरणात या पायऱ्यांना नदीचे स्वरूप आलेले पहायला मिळते. गडावर जाताना हनुमंताचे मंदिर लागते. मंदिराच्या बाजूलाच दोन गुहा लक्ष वेधून घेतात. या गुहा बऱ्यापैकी मोठ्या असून पावसाळा सोडला तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या गुहेमध्ये 30 ते 40 जण आरामात राहू शकतात. गडावर एक मोठं जातं असून गडाची भव्य तटबंदी पाहण्यासारखी आहे. गडाचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण गड पाहण्यासाठी साधारण अर्धा ते एक तास लागू शकतो.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्याचा सर्वात सोईस्कर मार्ग म्हणजे लोणावळ्यात असणारे मळवली रेल्वे स्थानक. मुंबई-पुण्यावरून येणारे दुर्गप्रेमी मळवली स्थानकात उतरून महामार्गाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या विसापूरच्या दिशेने जाऊ शकतात. तसेच वैयक्तिक गाडी घेऊन येणारे दुर्गप्रेमी जुन्या मुंबई-पुणे रोडने गडावर येऊ शकतात. या रोडने आल्यास तुम्ही एकविरा देवीच्या मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या इथे पोहचाल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एकविरा देवीच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला एक रस्ता मळवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेला आहे. त्या रस्त्याने स्टेशनच्या दिशेने जायचे आहे. हाच रस्ता तुम्हाला विसापूरच्या दिशेने घेऊन जाईल. महामार्गाच्या वर छोटासा ब्रीज असून हा ब्रीज मळवली स्थानकाच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या गावाला थेट जोडला गेला आहे. भाजे या गावातून गडावर जाण्यासाठी साधारण अडीच ते तीन तास लागतात.
Lohagad Fort – बोर घाटाचा रक्षणकर्ता; ‘या’ कुटुंबाचा दिला होता नरबळी, कारण जाणून व्हाल थक्क
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का
गडावर दोन गुहा असून पावसाळी वातावरण सोडले तर 30 ते 40 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. तसेच गडावर पाण्याची काही टाकी आहेत. मात्र, ते पाणी पिण्यायोग्य आहे का नाही याबाबत खात्री नाही. त्यामुळे गडावर जाताना पिण्याचे पाणी सोबत घेऊन जावे. तसेच गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे आपली सोय आपणच करावी.
हे ही लक्षात ठेवा
1) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
2) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
3) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
4) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला, मित्रांना शेअर करा.