‘क्रिकेटचा देव’ असा शब्द उच्चारला की सर्वांच्या डोळ्या समोर Sachine Tendulkar यांचा चेहरा आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचा हा हिरा जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जातो. सचिन व्यतिरिक्त सुनील गावस्कर, झहीर खान, रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाडसह अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नावाचा डंका वाजवत आहेत. मात्र, या सर्व मात्तबर खेळाडूंच्या यादीत Krishna Satpute नावाच्या वादळाने आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडलं. टेनिस क्रिकेट विश्वावर ज्याने अधिराज्य गाजवलं, टेनिस क्रिकेटला नवीन ओळख निर्माण करून दिली, अशा कुर्डूवाडी सोलापूरच्या कृष्णा सातपूतेचा संघर्ष सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे.
ढवळस गावात जन्म ते प्रतीक 11 संघात खेळण्याची संधी
कृष्णा सातपुते याचे आयुष्य संघर्षमयी होते. भारतानं 1983 साली कपील देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला आणि त्याच वर्षी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ढवळस रेल्वे स्थानकाच्या रेल्वे क्वार्टरमध्ये कृष्णा सातपुते याचा जन्म झाला. 01/05/1983 ही कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची मुळ जन्मतारीख. कृष्णाचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यामुळे ढवळस रेल्वे स्थानकाच्या हद्दीत असणाऱ्या रेल्वे क्वार्टरमध्ये त्यांचे संपूर्ण बालपण गेले. लहान वयात कृष्णाचा स्वभाव खोडकर होता. मस्ती करणे, झाडावर चढणे, लपून बसणे, खोड्या काढणे त्यामुळे अनेक वेळा त्याने वडीलांचा सुद्धा मार खाल्ला आहे.
कृष्णाचे पहिले ते चौथी पर्यंतचे शिक्षण ढवळस गावातील शाळेत झाले. त्यानंतर वडीलांची कुर्डूवाडीमध्ये बदली झाली व पूढील शिक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशाला, कुर्डूवाडी येथे पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण के.एन.भिसे कुर्डूवाडी या महाविद्यालयात त्यांनी घेतले. या कालखंडात त्यांनी क्रिकेटवर असलेले प्रेम जराही कमी होऊ दिले नाही. शालेय जीवनात तो फार रमला नाही, कारण मैदानात चौकार आणि षटकार खेचण्यात जो आनंद त्यांना मिळत होता, तो आनंद शाळेच्या चार भिंतीमध्ये त्याला कधी मिळाला नाही. इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर बहूदा त्यांनी पुढे शिक्षण घेतले नाही.
कुर्डूवाडीमध्ये कृष्णा सातपुते याच्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कारण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्याने लहाण असतानाच मोठ्या पोरांमध्ये खेळायला सुरुवात केली होती. त्याच्या फलंदाजीचे तेव्हाही सर्वांना कौतुक होते. निर्भीड आणि धमाकेदार फटकेबाजी करत असल्यामुळे चांगल्या चांगल्या गोलंदाजांचा सुद्धा त्याने लहान वयात घाम काढला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध आणि बाप संघ म्हणून ओळख असलेल्या प्रतीक 11 संघाविरुद्ध त्याला खेळेण्याची संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोनं केलं आणि प्रतीक 11 मधील दिग्गज गोलंदाजांवर जबरदस्त प्रहार करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. खऱ्या अर्थाने कृष्णाच्या या खेळीमुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सामना झाल्यानंतर प्रतीक 11 संघाचे मालक यांनी स्वत: कृष्णाशी संपर्क साधून त्याला संघातून खेळण्यासाठी आमंत्रित केले. त्या दिवसापासून कृष्णाच्या टेनिस पर्वाला सुरुवात झाली.
एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला अन्…
एकिकडे कृष्णाच क्रिकेट कारकिर्द बहरात होती. मात्र, दुसरिकडे त्याच्या कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना कॅन्सरचे निधान झाले आणि कुटुंबाला मोठा हादरा बसला. कृष्णाने वडीलांवर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कर्ज काढून अमाप खर्च केला. परंतु त्याचे वडील वाचू शकले नाहीत. त्याचं निधन झालं. कृष्णा या दु:खातून सावरणार तोच वडीलांच्या निधनाचा आईला जबर धक्का बसला होता. त्या दु:खातून त्याची आई सावरू शकली नाही आणि वडीलांच्या पाठोपाठ आईचे सुद्धा त्याच महिन्यात निधन झाले. एकाच महिन्यात कृष्णा पोरका झाला. एकिकडे आई वडीलांच्या मृत्यूचा शोक, दुसरिकडे त्याची पत्नी गर्भवती होती त्यांचं टेंशन.
वडीलांच्या आजारपणात बराच पैसा खर्च झाला होता. त्यामुळे कर्जही खूप झाले होते. त्यामुळे त्याने वाटेल ते काम करायाला सुरुवात केली. बिगारी, रोजंदारी मजूर म्हणून सुद्धा त्याने काम केले.
संकटं चहूबाजूंनी हमला करत होती. परंतु कृष्णाने क्रिकेट खेळणे काही थांबवले नाही. एका मुलाखतीत कृष्णाने सांगीतले होते की, एक वेळ अशी आली होती. जेव्हा माझ्याकडे बायकोला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा भंगार विकून मी पैसे आणले होते. माझ्या आयुष्यातील ही पहिली आणि शेवटची चूक होती, असे त्याने तेव्हा म्हटल होतं. त्यानंतर कृष्णाने ती चूक पुन्हा कधीच केली नाही.
क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट…
क्रिकेट वेड्या कृष्णाने आपले क्रिकेटप्रेम कायम ठेवत खेळात सातत्य ठेवलं आणि पुण्यामध्ये प्रतीक 11 कडून खेळायला सुरुवात केली. याच काळात तो पुण्यातील एका कंपनीमध्ये नोकरी करू लागला. मात्र मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणारा कृष्णाला ऑफिसच्या चार भिंती कोठडी प्रमाणे भासत होत्या.
कृष्णाने पूर्ण वेळ क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतल आणि मैदान गाजवायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या खेळाचा स्तर उंचावत गेला. त्याच्या फलंदाजीने त्याने टेनीस क्रिकेटमधील मातब्बर गोलंदाजांना अक्षरश: फोडून काढले. त्याच्या फलंदाजीची क्रेझ तरुणांमध्ये निर्माण झाली. फक्त कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करू लागले. त्याने सुद्धा चाहत्यांचा हिरमोड केला नाही. अनेक शतकं अर्धशतकं ठोकून त्याने आपल्या फलंदाजीचा धडाका कायम ठेवला.
2019 मध्ये गोव्याच्या एका मोठ्या स्पर्धेत प्रतिक 11 विरुद्ध रायगड हे दोन्ही संघ फायनलमध्ये एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपले. दोन्ही बाप संघ आमने सामने आल्यामुळे चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी होती. फायनलला प्रतीक 11 संघाला जिंकण्यासाठी 8 षटकांमध्ये 88 धावा करायच्या होत्या. मात्र, प्रतीक 11 ची सलीमीची आणि मधली फळी कोसळली होती. प्रतीक 11 चे पाच गडी 17 या धावसंख्येवर बाद झाले होते. त्यामुळे सर्व भार कृष्णाच्या खांद्यावर आला होता. कृष्णाने या परिस्थितीमध्ये सुद्धा न डगमगता तुफान फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांची त्याने आतषबाजी केली आणि 1 षटक राखून प्रतीक 11 संघ विजयी झाला.
कृष्णा सातपुतेमुळे लोकांचा टेनीस क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला
इंग्लंडमध्ये झालेल्या ICC CRIO चषकामध्ये भारतविरुद्द पाकिस्तान सामन्यामध्ये त्याने भारताच्या टीमचे सारथ्य केले आहे. तसेच 2022 साली झालेल्या सहा संघांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्यावर भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, युएई, ओमान आणि कॅनडा या सहा देशांचा समावेश होता.
कृष्णा सातपुते आणि विक्रम
टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णाने भारताकडून खेळताना 23 शतके ठोकली आहेत. त्याचबरोबर देशांतर्गत टेनीस क्रिकेटमध्ये 25 हून अधिक शतकांची नोंद त्याच्या नावावर आहे. 2001 मध्ये एकाच सामन्यात 14 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम त्याने केला होता. टेनीस क्रिकेटच्या इतिहासात कृष्णाची या दमदार खेळीची नोंद झाली. एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आतापर्यंत तीन वेळा केला आहे. त्याने बक्षीस जिंकली असून त्यामध्ये 4 बाईक्सचा सुद्धा समावेश आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम फक्त कृष्णा सातपुतेच्या नावावर आहे.
कृष्णा सातपुतेने आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीत अनेक वेळा एकहाती सामने आपल्या संघांना जिंकून दिले आहेत. त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार आणि षटकार पाहण्यासाठी चाहते मैदानांमध्ये मोठ्या संख्येने तेव्हाही गर्दी करत होते आणि आजही गर्दी करत आहेत. चाहता वर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे देशभरातली विविध संघ त्याला खेळण्यासाठी आमंत्रित करतात. कर्नाटकातील कारवारमध्ये खेळत असताना त्याने 57 चेंडूंमध्ये 159 धावांची धुवाधार खेळी केली होती. त्याचा आक्रमक पवित्रा पाहून विरुद्ध टीमसह चाहते सुद्धा आवाक झाले होते.
कृष्णाने आपल्या फलंदाजीने चाहत्यांना आकर्षीत केलेच. परंतु त्याबरोबर त्याने भारतीय संघाचे दिग्गज खेळाडूंना सुद्धा आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले. सचिन रमेश तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग सारख्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंनी कृष्णाचा खेळ पाहिला आहे. तसेच त्याचे तोंड भरून कौतुक सुद्धा केले आहे. टेनीस क्रिकेटला नवीन ओळख मिळवून देण्यामध्ये नक्कीच कृष्णा सातपुते याचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्याचा खेळ पाहण्यासाठी चाहते लांब लांबून मैदानांमध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. तुम्ही कृष्णाचा सातपुते याचा खेळ पाहिला आहे. पाहिला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या खेळाडूची माहिती सर्वांना व्हावी म्हणून जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा.