राजियांचा राजगड
हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि शिवकाळातील सर्वात महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजे Rajgad Fort होय. स्वराज्यावर चौफेर नजर ठेवण्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजगड हा योग्य गड होता. तोरणा गडाच्या तुलनेत राजगड हा दुर्गम असून त्याचा बोलकिल्ला तोरणा गडापेक्षा मोठा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गडावर येण्यासाठी गणिमाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागणार होता. याच सुरक्षेच्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले राजकीय केंद्र म्हणून राजगडाची निवड केली होती.
तोरणा आणि राजगड भावंडांसारखे भासतात म्हणूनच शिवरायांना मावळ भागातील हे दोन्ही गड राज्य विस्ताराच्या दृष्टीन महत्त्वाचे होते. परंतु सुरक्षिततेच्या कारणामुळे राजकीय केंद्र म्हणून राजगडाची निवड करण्यात आली होती. राजगडावरील बालेकिल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची जवळपास 1394 मीटर इतकी आहे.
राजगड आणि इतिहासाच्या पाऊलखुणा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बुलंद, कणखर, बळकट, बेलाग आणि किर्तीवंत राजगड आजही मोठ्या थाटात उभा आहे. याच राजगडाच्या थाटामुळे त्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे. त्यामुळे राजगडाचा इतिहास जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.
इतिहासात असलेल्या उल्लेखानुसार, साधारण 2000 वर्षांपूर्वी पासूनचा हा ‘मुरूमदेवाचा डोंगर’ आहे. म्हणजेच सातवाहन पूर्व कालखंडातला. या डोंगरावर ब्रम्हर्षी ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे यांच्या नाववरुन डोंगरावर ब्रम्हर्षी देवस्थानाची स्थापना झाल्याची शक्यता इतिहासकारांनी वर्तवली आहे. दरम्यान, अहिल्यानगर (अहमदनगर) निजामशाहीचा संस्थापक पहिला अहमद याने मुरूमदेव आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर डोंगराला गडाचे रुप येऊ लागले. त्या काळात गडाच्या रक्षणाची जबाबदारी गुंजण मावळातील शिलिमकर देशमुखांकडे सोपवण्यात आली होती.
निजाशाहीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पुढची 125 वर्ष गडावर कोणाताही हल्ला झाला नाही. 1625 साली मुरूमदेवावर आदिलशाहीने आपले वर्चस्व निर्माण केले. मुरूमदेवाची जबाबदारी आता आदिलशाही सदरदार हैबतखामाकडे देण्यात आली. 1630 च्या सुमारास मुरूमदेव पुन्हा आदिलशाही कडून निजामशाहीच्या ताब्यात आला. गडाच्या संरक्षणाची जबाबदारी आता शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी याच्याकडे देण्यात आली. या काळात विजापूरच्या आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने गडावर हल्ला करून गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनाजी जीवाची बाजी लावत लढला. जखमी झाल्यामुळे बालाजी नाईक शिळीमकर मुरूमदेवाच्या रक्षणासाठी धाऊन आले. या धुमश्चक्रित बालाजी नाईक सुद्धा जखमी झाले होते. बालाजी नाईक यांच्या पराक्रमाचे शहाजीराजांनी कौतुक करून त्यांचा सन्मान केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड कोणत्या वर्षी ताब्यात घेतला याच्या अचूक तारखेबद्दल इतिहासात उल्लेख नाही. परंतु सन 1646 ते 1647 च्या सुमारास शिवरायांनी तोरणा आपल्या ताब्यात घेतला होता. याच काळात तोरणा सोबत राजगड सुद्धा स्वराज्यात सामील झाला असावा. राजगडाचा विस्तार मोठा होता त्यामुळे शिवरायांनी वेगाने सुत्र हालवत गडाचे बांधकाम सुरू केले होते. राजगड तीन माच्या किंवा सोंडांमध्ये विस्तारला होता. सुरक्षेच्या दृष्टीने शिवरायांनी तिन्ही माच्यांवर भक्कम तटबंदी बांधण्याचे आदेश दिले होते.
राजगडाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शिवरायांनी त्याचे नामांतरण केले. मुरूमदेवाचा आता राजगड झाला. गडावर असणाऱ्या तीन माच्यांना अनुक्रमे सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे देण्यात आली. राजगडाच्या पायथ्याला असणाऱ्या शिरवळ जवळ खेडबारे नावाचे टुमदार गाव होते. गावाच्या हद्दीत रान फार होते. त्यामुळे भविष्याचा विचार करून शिवरायांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंब्याच्या झाडांची लागवड केली. तसेच या ठिकाणी पेठ वसवली आणि पेठेला शिवापूर असे नाव दिले.
इसवीसन 1660 मध्ये शाहिस्तेखानाने स्वराज्यावर स्वारी केली. तसेच त्याने राजगडाकडे फौज सुद्धा पाठवली होती. या काळात गडाच्या आसपास असणारी खेडी शाहिस्तेखानाच्या सैन्याने उद्ध्वस्त केली होती. परंतु त्यांनी राजगड जिंकण्याचा प्रयत्न केला नाही. यानंतर शाहिस्तेखानाचा वचपा काढण्यासाठी 6 एप्रिल 1663 रोजी शिवरायांनी शाहिस्तेखानावर हल्ला केला आणि त्याची बोट छाटून टाकली. शाहिस्तेखान थोडक्यात बचावला होता. यानंतर शिवराय पुन्हा राजगडावर दाखल झाले.
राजधानी राजगडवरून रायगडाकडे…
छत्रपती शिवाजी महाराजा आग्र्यात अडकले होते. 12 सप्टेंबर 1666 रोजी शिवराय निवडक मावळ्यांच्या सोबतीने राजगडावर दाखल झाले. त्यामुळे शिवरायांच्या अनेक ऐतिहासिक मोहिमांचा राजगड साक्षीदार आहे. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजाराम महाराजांचा राजगडावर जन्म झाला. त्याचबरोबर सिंहगड जिंकून घेण्यासाठी तानाजी मालुसरे यांना शिवरायांनी राजगडावरूनच पाठवले होते. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोणातून शिवरायांनी राजधानीचे ठिकाण राजगडावरून रायगडाकडे हलविली.
पुन्हा राजगड जिंकला…
हिंदुस्थानातील काळा दिवस उजाडला 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. संधी साधत औरंगबजेबाने आपला मोर्चा स्वराज्याकडे वळवला. 9 वर्षांनी 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आले. यानंतर मुघलांनी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच वर्षी मुघल सरदार किशोरसिंह हाडा याने राजगड जिंकून घेतला. राजगडाची जबाबदारी औरंगजेबाने अबुलखैरखान याकडे सोपवली. या काळात संभाजी महाराजांच्या मृत्यूची कोणतीही बातमी पसरली नव्हती. त्यामुळे राजगड जिंकून घेण्यासाठी मराठ्यांनी राजगडाला वेढा घातला. जिवाची पराकष्ठा करत मावळ्यांनी राजगड जिंकून घेतला.
राजगड औरंगजेबाच्या ताब्यात गेल्यामुळे मावळ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे राजगड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोहिम आखली आणि 29 मे 1707 रोजी गुणाजी सावंत यांनी पंताजी शिवदेबा यांच्या सोबतीने राजगडावर स्वारी केली. फक्त स्वारी केली नाही तर गड जिंकून घेतला आणि पुम्हा स्वराज्यात सामील झाला. पुढे पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. त्यानंतर राजगड भोर संस्थानच्या ताब्यात गेला. तेव्हा राजगडाची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकाऱ्यांनी नेमणूक करण्यात आली होती. सुवेळा माचीवर सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीवर सरनोबत पवार घराणे, संजीवनी माचीवर सरनोबत खोपडे घराणे यांची नेमणूक केली होती. त्याचबरोबर नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा सेवेत होते.
राजगडावर पाहण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत?
राजगडाचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामुळे राजगडावरील प्रत्येक वास्तुच काही वैशिष्ट्य आहे. गुंजवणे दरवाजातून गडावर आल्यानंतर पद्मावती देवीचे मंदिर लागते. इथूनच पुढे पद्मावती माची आणि पद्मावती तलाव पहायला मिळतो. पद्मावती माचीचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक लष्करी केंद्र होते. माचीवर पुरातन बांधकामाचे अनेक अवशेष आजही पाहता येतात. या माचीवर पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, रत्नशाला, हवालदारांचा वाडा, गुप्त दरवाजा, गुंजवणे दरवाजा आणि दारुगोळ्याची कोठारे आजही पाहता येतात. त्याचबरोबर माचीवर ब्राम्हण वर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे सुद्धा पहायला मिळतात.
राजगडावर असणारी दुसरी माची म्हणजे संजीवनी माची. अडीच किलोमीटरची ही माची एकूण 3 टप्प्यांमध्ये बांधली आहे. माचीच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरूज आहेत. या माचीवर अनेक पाण्याच्या टाक्या असून माचीला एकूण 19 बुरूज आहेत.
गडावर असणारी तिसरी माजी म्हणजे सुवेळा माची. राजगडाच्या पुर्वेला ही माची असल्यामुळे शिवरायांनी या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची सुद्धा तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. या माचीवर चौथरे पहायला मिळतात प्रामुख्याने हे चौथरे म्हणजे येसाजी कंक, तानाजी मालुसरे आणि शिलींबकर या सरदारांची घरे होती. सुवेळा माचीकडे जाताना कड्यात एक छिद्र निदर्शणास पडते. हे छिद्र हत्तीप्रस्त या नावाने प्रचलित आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकूण 17 बुरूज आहेत. यापैकी 7 बुरूजांना चिलखती बुरूजांचे संरक्षण आहे.
राजगडावरील सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांसह कुटुंबीयांचे वास्तव्य बालेकिल्ल्यावर होते. बालेकिल्ल्याकडे जाणार रस्ता कठीण आणि अरूंद आहे. बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर, भग्न अवस्थेतील इमारती चौथरे आणि वाड्यांचे अवशेष आढळून येतात.
या व्यतिरिक्त गडावर काळेश्वरी बुरूज, रामेश्वर मंदिर, आळू दरवाजा, पाली दरवाजा, सदर, राजवाडा, रामेश्वराचे मंदिर यांसारखी ठिकाणे आहेत. संपूर्ण राजगड पाहण्यासाठी 2 दिवस लागतात.
राजगडावरून दिसणारे गड
राजगड हे मध्यवर्थी ठिकाण असल्यामुळे सर्वत्र चौफेर नजर ठेवता यावी म्हणूनच शिवरायांनी राजगडाची सर्वात प्रथम राजधानी म्हणून निवड केली होती. राजगडावरुन तोरणा, प्रतापगड, लिंगाणा, पुरंदर, सिंहगड, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर, लोहगड आणि विसापूर हे गड पाहता येतात.
राजगडावर कसे जायचे?
राजगडावर जाण्याच्या 4 वाटा आहेत. यातील मुख्य दोन वाटांनी राडगडावर जाणे सोईस्कर आहे. पहिली वाट पाबे गावातून पाली दरवाजामार्गे गडावर जाते. ही सर्वात सोपी वाट असून यामार्गे गडावर जाण्यासाठी अंदाजे 3 तास लागू शकतात. दुसरी वाट गुंजवणे गावातून गडावर जाते. ही वाट अवघड असून या मार्गे सुद्धा गडावर जाण्यासाठी अंदाजे अडीच ते तीन तास लागू शकतात. याव्यतिरिक्त गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची, अळू दरवाज्याने राजगड, गुप्त दरवाजाने राजगड या इतर वाटा आहेत. पण शक्यतो पाली आणि गुंजवणे या दोन दरवाज्यांतून गडावर जाण्यास प्राधान्य द्यावे.
गडावर राहण्याची, जेवणाची सोय आहे का?
गडावर राहण्याची सोय आहे. मात्र पुरातत्त्व विभागने गडावर राहण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे चौकशी करूनच गडावर रहायला जावे. गडावरील पद्मावती मंदिरात 20 ते 30 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. तसेच पद्मावती माचीवर राहण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्यांची सुविधा आहे. गडावर जेवणाची कोणताही सोय नाही. तसेच मंदिराच्या समोर बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. त्यामुळे गडावर पिण्याची पाण्याची कमतरता नाही.