रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या आसपास आणि माथेरानच्या डोंगररांगांमध्ये असंख्य गडकिल्ले थाटात वसले आहेत. या सर्व गडांचे आपापले वैशिष्ट्य आहे. काही गडांची नावे ही गडावरील देवीच्या नावाने पडली आहेत, तर काही गडांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नावं दिले आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्या मुंबई-पुण्यातील भटक्यांचे आवडते ठिकाण म्हणजे कर्जत. कारण कर्जतमधून वेगवेगळ्या गडांवर जाणाऱ्या असंख्य वाटा पाहायला मिळतात. याच कर्जतजवळ Sondai Fort हा एक छोटा आणि अपरिचित किल्ला आहे. या गडावर जाण्याच्या मुख्य दोन वाटा असल्या, तरी सोंडेवाडी मार्गे गडावर जाताना मोरबे धरणाचा विस्तीर्ण जलाशय नजरेस पडतो. नवख्या ट्रेकर्ससाठी सोंडाई गड एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
सोंडाई गडाचा इतिहास पाहिला, तर इतिहासामध्ये गडाबद्दल विशेष नोंद आढळून येत नाही. परंतु गडाचा विस्तार पाहता या गडाचा उपयोग टेहाळणीसाठी होत असावा अशी शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला भेट दिली होती का नाही, याबद्दलची नोंद सुद्धा इतिहासामध्ये आढळून येत नाही. त्यामुळेच या गडाचा वापर फक्त टेहाळणीसाठी होत असावा. गडाचा विस्तार पाहता मावळ्यांच्या पदस्पर्शाने हा गड नक्कीच पावन झाला असावा. तसेच गडावर सोंडाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळे देवीच्या नावावरून गडाचे नाव सोंडाई असे पडले.
गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था
सोंडाई गड गिरीदुर्ग प्रकारात मोडत असून प्रामुख्याने मध्यम श्रेणीचा हा गड आहे. 365 मीटर उंचीवर असलेला हा गड नवख्या भटक्यांसाठी सोईस्कर ठरू शकतो. गडावर जाण्याची वाट चांगली आहे. गडावर सोंडाई देवीचे मंदिर आहे. तसेच सोंडेवाडी गावातील ग्रामस्थांनी गडावर जाण्यासाठी दोन शिड्या लावल्या आहेत. त्यामुळे गडावर चढण्याचा मार्ग तसा सोप्पा आहे. गडाची अवस्था सुद्धा चांगली आहे. सह्याद्रीमध्ये फिरण्याची आवड असणाऱ्या मुंबईमधील भटक्यांसाठी हा गड साईस्कर म्हणावा असा आहे.
गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या आहेत?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या या गडावर जाण्याच्या प्रामुख्याने दोन वाटा आहेत. एक वाट सोंडेवाडी मार्गे गडावर जाते, तर दुसरी वाट वावर्ले मार्गे गडावर जाते.
सोंडेवाडी मार्गे सोंडाई –
कर्जत रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर येथून रिक्षाने 9 किमी अंतरावर असणाऱ्या सोंडेवाडी या गावामध्ये जाता येते. रिक्षाने सोंडेवाडीला जाण्यासाठी अंदाजे 300 ते 400 रुपये आकारले जातात. जर तुम्हाला रिक्षाने जायचे नसेल, तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही गडावर पोहचू शकता. कर्जत स्थानकावर उतरल्यानंतर कर्जत-चौक या मार्गावर धावणाऱ्या सहा आसनी रिक्षा किंवा एसटी महामंडळाच्या बसचा पर्याया तुमच्या जवळ आहे. एसटीने किंवा सहा आसनी रिक्षाने तुम्ही प्रवास करणार असाल, तर 6 किलो मिटरवर असणाऱ्या बोरगाव फाट्यावर तुम्हाला उतरावे लागेल. येथून पायवाटेने मोरबे धरणाच्या जलाशयाच्या बाजूने तुम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचाल. बोरगाव फाटा ते सोंडेवाडी हे 4 किलोमीटरचे अंतर आहे. सोंडेवाडी या गावामध्ये आल्यावर गावातून गडावर पोहचण्यासाठी एक ते दीड तास लागतो.
वावर्ले मार्गे सोंडेाई –
वावर्ले मार्गे गडावर जाणारी वाट ही थोडी किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे सोंडेवाडी मार्गे सोंडाई गडावर जाण्यास तुम्ही प्राधान्य द्यावे.
गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गर्द दुख्यांमध्ये हरवलेला हा गड पाहणे म्हणजे एक पर्वणीच. कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि कातळात खोदलेली पाण्याची टाकं गडावर पाहायला मिळतात. या टाक्यांमध्ये वर्षाचे बाराही महिने पाणी असते. गडवर आल्यानंतर तुमची नजर सोंडाईपेक्षा उंच असलेल्या एका डोंगरावर खिळल्या शिवाय राहणार नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सोंडाई पेक्षा उंच डोंगर गोवारी किंवा गव्हारी या नावाने प्रचलित आहे. गडावर आल्यानंतर गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी शिडी लावण्यात आली आहे. गडाच्या माथ्यावर सोंडाई देवीच मंदिर असल्यामुळे चप्पल किंवा बुट घालून वरती जाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे कृपया मंदिर परिसरात आपली पादत्राने घालून जाऊ नये. गडावर काही पाण्याची टाकी पाहालया मिळतात. तसेच गडाच्या माथ्यावरून माथेरानचा विस्तीर्ण डोंगर, मोरबे धरणाचे अल्हाददायक सौंदर्य, वावर्ले धरणाचा सुंदर नजारा आणि आजूबाजूचा बेलाग सह्याद्री नजरेस पडतो.
गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय आहे का?
गडावर जेवणाची सोय नाही. गडावर पाण्याची टाकी आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय गडावर होऊ शकते. पंरतु जेवणाची सोय तुमची तुम्हाला करावी लागणार आहे. गडाखाली असणाळ्या सोंडेवाडी या गावामध्ये जेवणाची सोय होऊ शकते. मात्र उन्हाळ्यामध्ये गडावर पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्यतो आपल्या सोबत पाण्याची बॉटल ठेवावी.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
आवर्जून वाचावे असे काही
1) Sudhagad Fort; या गडाचा विचार शिवरायांनी राजधानीसाठी केला होता
2) Peb fort information in Marathi; कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला
3) Top 10 Forts in Maharashtra in Marathi ; मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे किल्ले