छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्ह्यातील भोर संस्थानचे वैभव म्हणजे सुधागड (Sudhagad Fort) किल्ला. सुधागड किल्ला पूर्वी भोरपगड या नावाने प्रचलित होता. इसवी सन 1657-58 मध्ये भोरपगड (सुधागड) स्वराज्यात दाखल झाला. गड स्वराज्यात दाखल झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाचे नाव सुधागड ठेवले. घनदाट जंगल आणि विस्तीर्ण पठाराने व्यापलेला हा गड तिन्ही ऋतुमध्ये भटकंती करण्यासाठी योग्य आहे.
गडाचा इतिहास
गडाच्या परिसरात असणारी ठाणाळे लेणी, ही 2200 वर्षांपूर्वीची असल्याची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे हा किल्ला फार प्राचीन असल्याची खात्री होते. इतिहासात डोकावले तर, माहिती मिळते की भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख येथे आढळतात. पुढे जाऊन याच ऋषींनी गडावर भोराई देवीची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657-58 च्या काळात आदिलशाही मुलुखाला पाणी पाजत मुलुख जिंकून घेतला. त्याच वेळी सुधागड किल्ला सुद्धा स्वराज्यात अगदी थाटात सामील झाला. गड स्वराज्यात दाखल होण्यापूर्वी नारो मुकुंद सबनीस यांच्याकडे गडाचा ताबा होता. परंतु जेव्हा शिवरायांनी गड ताब्यात घेतला तेव्हा गडाचे नामांतर भोरपवरून सुधागड असे केले. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीसाठी सुधागड किल्ल्याचा सुद्धा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता.
गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ या गावाची सुद्धा इतिहासात नोंद आहे. पातशाहपूर या नावाचा अपभ्रंश म्हणजे पाच्छापूर होय. या गावामध्येच छत्रपती संभाजी राजे व ओरंगजेबाजा बंडखोर मुलगा अबकर यांची भेट झाली होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य द्रोह करणाऱ्या अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपण पौर्णिमेच्या दिवशी सुधागड परिसरातील परली गावात हत्तीच्या पायी दिले होते.
गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था
गिरीदुर्ग प्रकारात मोडत असणारा हा सुधागड पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेलगत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गडाची समुद्रसपाटीपासून उंची 590 मीटर असून चढाईची श्रेणी मध्यम स्वरूपाची आहे. पावसाळ्यामध्ये गडावर निसर्गाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. विविध संस्थांच्या माध्यमातून गडावर डागडुजी करण्यासाठी मोहीम सुरू आहेत. काही ठीकाणी थोडी फार पडजड झालेली पाहायला मिळते. परंतु गडाचा घेरा मोठा असल्यामुळे विस्तीर्ण पठारावर मोकळी हवा आणि गडाचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते.
गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या आहेत?
गडावर जाण्याच्या मुख्य दोन वाटा आहेत. एक वाट ठाकूरवाडी मार्गे तर, दुसरी वाट ही धोंडसे या गावातून सुधागडावर गेली आहे.
ठाकुरवाडी किंवा दर्यागाव मार्गे सुधागड –
पालीपासून भिराकडे जाणाऱ्या 8 कि.मी च्या अंतरावर पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर गावातून पुढे ठाकुरवाडी हे गाव वसलेले आहे. ठाकुरवाडी हे गाव दर्यागाव या नावाने सुद्धा प्रचलित आहे. दर्यागावातून पायवाटेने गडावर जाण्याची वाट सोपी असून दोन तासांमध्ये आपण गडावर पोहोचतो. तसेच या मार्गे गडावर जाताना एक लोखंडी शिडी लागते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या ठिकाणाहून दिसणारे दृश्य पाहण्यासारखे असते. त्याचबरोबर पाच्छापूर या गावातून सुद्धा एक वाट गडावर जाते. पुढे जाऊन दोन्ही वाटा एका घळीपाशी मिळतात. या घळीतून वरती गेल्यानंतर एका पडक्या दरवाज्यातून आपला खऱ्या अर्थाने गडावर प्रवेश होतो. तिथून 15 मिनिट वरती चालत गेल्यानंतर गडमाथ्यावर पोहोचता येते.
धोंडसे मार्गे सुधागड –
पालीहून धोंडसे गावात पोहचून आपल्याला दगडी पायऱ्यांच्या मार्गाने गडावर पोहोचता येते. या गावातून गडावर जाणारी वाट ही घनदाट जंगलातून जाते. प्रामुख्याने या मार्गे गडावर जाण्यासाठी अंदाजे अडीच ते तीन तासांचा अवधी लागतो. या मार्गे गडावर गेल्यानंतर सुस्थितीमध्ये असलेल्या गोमुख आकाराच्या महादरवाजातून आपला गडावर प्रवेश होतो. या महादरावाजापासून काहीच अंतरावर भोराई देवीचे मंदीर पाहायला मिळते.
तुम्ही जर ठाकुरवाडी/दर्यागाव मार्गे गडावर आला असाल, तर गडाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या गोमुख आकाराच्या महादरवाजातून गड उतरू शकता. या मार्गे तुम्ही धोंडसे या गावामध्ये पोहोचाल. गडावरील दोन्ही मार्गे तुम्ही उतरू अथवा चढू शकता.
गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे
सुधागड हा विस्तीर्ण पठारांनी व्यापलेला गड आहे.गडवार पाण्याचे अनेक तलाव आढळून येतात. गडावरील काही भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकाराच्या ओषधी वनस्पती आढळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर पंत सचिवांचा वाडा, भोराई देवीचे आणि हनुमानाचे मंदिर सुद्धा गडावर पाहायला मिळते. पंत सचिवांच्या वाड्याच्या बाजूला भोरेश्वराचे मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या आजबाजूला मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवसेष आणि विरगळी पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त गडावर बांधीव टाकी, कातळात कोरलेली टाकी, पूर्वेकडील आणि पाच्छापूर कडील बुरुज, चोर वाट, गोमुख असलेले टाके, टकमक टोक किंवा बोलते कडे, विशाल कोठारे, शिव मंदिर, भोराई देवीचे मंदिर, महादरवाजा आणि आसपासचा परिसर, पच्छिमेकडील पठार इत्यादी गोष्टी गडावर पाहण्यासारख्या आहेत.
गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय आहे का?
गडावर जेवणाची सोय नाही. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला जेवणाची सोय करावी लागणार आहे. त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी वाड्या पासून जवळच तीन टाकी आहेत. गडावर पाण्याची टाकी आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून पिण्याला प्राधान्य द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तलावातील पाणी पिऊ नये.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
आवर्जून वाचावे असे काही
1) Peb fort information in Marathi; कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला
2) कमळगड किल्ला
3) रायरेश्वर किल्ला