स्वराज्याच्या पहिल्या लढाईचा साक्षीदार होण्याचे भाग्य Subhanmangal Fort ला लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुभानमंगळ गडाचे ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुणे-सातारा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नीरा नदीच्या काठी अखेरच्या घटका मोजत सुभानमंगळ हा भुईकोड गड उभा आहे. गडाची अवस्था अत्यंत दयनीय असून एका बाजूचा बुरूज पूर्णपणे ढासळलेला आहे.
सुभानमंगळ आणि इतिहास
पुणे जिल्ह्यातील शिरवळमध्ये नीरा नदीच्या किनारी सुभानमंगळ गड आहे. गडावरून नीरा नदीचे विहंगम दृश्य दिसते. इतिहासाच्या पानांमध्ये शिरवळचा उल्लेख धार्मिक स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. अनेक मंदिरे आपल्याला या भागामध्ये पहायला मिळतात. इतिहासात केलेल्या उल्लेखानुसार, नीरा नदी जवळ असणाऱ्या चित्रबेट नावाच्या टेकडीवर सुभानमंगळ गडाचे बांधकाम झाल्याची नोंद सापडते. प्रामुख्याने 1470 साली गडाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि इसवी सन 1515 मध्ये गड बांधून पूर्ण झाला.
गडाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनेक अंमलदारांच्या अधिपत्याखाली हा गड होता. 1516-37 या सुरुवातीच्या काळामध्ये महम्मद इसलामखान, त्यानंतर 1538-64 या काळात वली महमदखान, 1565-71 या काळात शाह अहमद, 1572-9 या काळात बहादुरखान, 1590-1630 या काळात शामिरखान, 1604-21 या काळात हैबतखान आणि 1622-36 या काळात दाऊदखान या अमंलदारांनी सुभानमंगळ गडावर सत्ता उपभोगली. दरम्यानच्या काळात 1621 मध्ये रायाराय यांनी गडाचा ताबा मिळवल्याची नोंद आढळून येते.
सुभानमंगळ गडाच्या इतिहासात 1648 हे वर्ष ऐतिहासिक आणि महत्त्वाचे ठरले. अनेक घडामोडी या एका वर्षामध्ये घडल्या. शहाजी महाराजांना आदिलशहाचा वजीर मुस्थफाखानाने बेसावध गाठून कैद केले होते. त्यानंतर आदिलशहाने आपला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशेन वळवला आणि महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी आपले हुकूमी सरदार फत्तेहखान, फाजलखान, अशफकखान यांना शिवरायांच्या मागावर पाठवले. आदिलशहाने शिवरायांना कोंडीत पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याच अनुषंगाने रोहिडा खोऱ्यातील केदारजी खोपडे याला फतेहखानाच्या तुकडीत सामील होण्याची फर्मान पाठवण्यात आले होते.
आदिलशहाने स्वराज्यावर एकप्रकारे घाव घातला होता. या काळात शिवरायांनी स्वराज्याचा म्हणावा तसा विस्तार केला नव्हता. त्यामुळे स्वराज्याचा आकार लहान होता. याच संधीचा फायदा फत्तेखानाला घेता येऊ नये म्हणून शिवरायांनी नियोजन केले आणि स्वराज्याच्या सीमेवर असणाऱ्या पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचाच्या परिसराची युद्धक्षेत्र म्हणून निवड केली. शिवरायाचं बुद्धीचातूर्य या ठिकाणी दिसून आले. फत्तेखान जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरवर होते.
शिवरायांना कोंडीत पकडण्यासाठी त्याने पुरंदरच्या जवळ बेलसरला आपली छावणी टाकली आणि ठाण मांडून बसला. याच दरम्यान त्याने आपला सरदार बाळाही हैबतरावाला शिरवळचा गड जिंकून घेण्यासाठी पाठवले. महाराजांनी यावेळी युक्तीचा वापर करत सैन्यबळ कमी असल्यामुळे गड अगदी सहज फत्तेखानाच्या स्वाधीन केला. अगदी सहज सुभानमंगळ जिंकल्यामुळे हैबतराव आनंदात होता आणि बेफिकीर सुद्धा. हैबतरावाचा आनंद एक रात्र सुद्धा टिकू शकला नाही.
दुसऱ्याच दिवशी पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांनी कावजी मल्हार खासनीस या सरदाराला सुभानमंगळ घेण्यासाठी धाडले. कावजी मल्हार खासनीस यांनी थेट गडाचा तड फोडून गडावर प्रवेश केला आणि गाफील हैबतरावार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हैबतरावाला प्रतिकार करता आला नाही आणि मराठ्यांना सुभानमंगळ गडावर भगवा फडकवला. इतिहासात करण्यात आलेल्या उल्लेखानुसार 1672 साली सुभानमंगळ स्वराज्यात दाखल झाला.
गडावर पाहण्यासारखे काय आहे
सुभानमंगल गड भुईकोट आहे. तसेच गडाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. त्यामुळे गडावर अवशेष बघायला मिळत नाहीत. गड असल्याची एकमेव निशाणी म्हणजे गडावर असणारा बुरूज. तोही अर्धा ढासळलेला आहे. याच बुरुजाच्या जवळ दुर्गा देवीचे छोटे मंदिर आहे. तसेच स्वराज्याचा भगवा ध्वज सुद्धा आहे. याच ठिकाणी दोन वीरगळी सुद्धा पाहण्यासारख्या आहेत. गडावरून नीरा नदीचे सुंदर दृश्य नजरेस पडते. गडावर पाहण्यासारखे काही नसले तरी, गडाच्या आसपासच्या परिसरात अनेक मंदिरे पाहण्यासारखी आहेत. या मंदिरांमध्ये प्रामुख्याने केदारेश्वराचे मंदिर, अंबिका देवीचे मंदिर, भैरवनाथाचे मंदिर, मंडाईदेवीचे मंदिर आणि रामेश्वराचे मंदिर आहे.
गडावर जाणार कसे
पुण्याहून कराड किंवा सातारला जाणारी कोणतीही एसटी पकडावी व शिरवळ बस स्थानकावर उतरावे. शिरवळला उतल्यानंतर केदारेश्वराचे मंदिर आहे. ब्राम्हण गल्लीतून गडावर जाणारी वाट आहे. गडाच्या समोरच मुलींचा शाळा आहे.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का
गडा एक प्रकारे शिरवळ गावातच आहे. त्यामुळे शिरवळमध्ये अनेक हॉटेल वगैरे आहेत. त्या ठिकाणी जेवणाची आणि राहण्याची सोय होऊ शकते.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.