मागच्या ब्लॉगमध्ये आपण चंदेरी गडाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. गगनाला भिडणारा चंदेरी दुरूनच आपल्याला आकर्षीत करतो. सुळक्या प्रमाणे त्या गडाची रचना आहे. चंदेरी पेक्षाही अवघड नव्हे तर, महाराष्ट्रातील सर्वात अवघड चढाई असलेल्या गड कोणता असं कोणी विचारलं तर हमखास भैरवगड-मोरोशी/Bhairavgad Fort या गडाचा उल्लेख केला जातो. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत असलेल्या डाईक रचनेनुसार या भैरवगडाची रचना आहे.
आपल्या सर्वांनाच शालेय जीवनात इतिहासापेक्षा भूगोल हा विषय जास्त आवडायचा. सह्याद्री, पर्वत, हिमालय, ज्वालामुखी, नद्या इ. यांच्याबद्दल सर्वांनी वाचलं असणारच. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट नक्की माहित असणार ती म्हणजे सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसाने झाली आहे. गरम लाव्हारस जेव्हा थंड होत गेला, तेव्हा विशिष्ट प्रकारच्या बेसॉल्ट खडकांनी वेगवेगळ्या आकाराच रुप धारण केलं. भूगर्भाशास्त्राच्या परिभाषेत या रचनेला डाईक असे म्हणतात. अशीच सेम डाईक रचना आपल्याला भैरवगडावर पहायला मिळते. विशेष बाब म्हणजे भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच एका डाईकवर असून बेसॉल्ट खडकाच्या 400 फूट उंच सरळ भिंतीवर बनलेला आहे.
भैरवगड आणि इतिहास
भैरवगडाच्या इतिहासाबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध होत नाही. परंतु गडाची रचना, गडावर जाण्याची वाट या सर्व गोष्टींचा विचार करता गडाचा वापर टेहळणीसाठी किंवा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.
भैरवगडावर पाहण्यासारखे काय आहे
भैरवगडावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असणे किंवा गिर्यारोहणात तरबेज असणाऱ्या व्यक्ती तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे. भैरवगडाच्या माचीवर आपल्याला कोणतेही अवशेष आढळून येत नाहीत. याच माचीवरून पुढे गेल्यानंतर आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याला येऊन पोहचतो. या ठिकाणी पाण्याच टाकं आहे. पाण्याच्या टाक्याच्या उजव्या बाजूला कातळात कोरलेली आयताकृती गुहा आपलं लक्ष वेधून घेते.
गुहा पाहिल्यानंतर गुहेत जाण्याचा मोह तुम्हाला आम्हाला नक्कीच होईल. मात्र, गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. गिर्यारोहणाची कोणतीही सामग्री तुमच्या जवळ नसेल, तर गुहेत काय गडावर येण्याच धाडस सुद्धा करू नका. गुहा पाहून झाल्यानंतर थोड पुढे चालत गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला पोहचतो. या ठिकाणी सुद्धा 50 फुट उंचीवर कातळात कोरलेली एक गुहा आपलं लक्ष वेधून घेते. या गुहेत जाण्यासाठी सुद्धा गिर्यारोहण सामग्रीची गरज आहे. थेट चालत आपण गुहेत जाऊ शकत नाही.
आता पर्यंत दोन गुहांचे आपल्याला दर्शन झालं. बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला आल्यानंतर पूर्व टोकाला वळसा घालून थोड पुढे गेल्यानंतर आपल्याला बालेकिल्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पहायला मिळतात. बालेकिल्ल्यावर जाण्याचा खरा थर्रार इथूनच सुरू होतो. मोरोशीचा भैरवगड थरकाप उडवणारा का आहे. याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर होते.
छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन बालेकिल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. कातळात कोरलेल्या 50 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपण एका गुहेपाशी पोहचतो. या गुहेची रचना इतर गुहांपेक्षा थोडी वेगळी आहे. या गुहेत जाण्यासाठी सरपरटण्याची कला तुमच्या अंगी असणे गरजेचे आहे. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे ही गुहा चारही बाजूंनी बंद आहे. गुहेच्या वरती एका आयताकृती आकाराची खिडकी असावी अशी रचना पहायला मिळते. इथूनच वरती बालेकिल्ल्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे.
गुहेमध्ये थोडी विश्रांती आपण घेऊ शकतो. इथून बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अगदी खडतर स्वरुपाचा आहे. कारण वरती जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. इथून दोर लावूनच गडावर जावं लागतं. कोणत्याही सुरक्षा उपकरणांचा वापर न करता गडावर जाऊ नका. कारण या पायऱ्यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. हा टप्पा पार केल्यानंतर आपण गडावर पोहचतो. बालेकिल्ल्यावर पोहचल्यानंतर पाहण्यासारखं असं गडावर काही नाही. गडावरून पश्चिमेच्या दिशने नजर मारल्यास आपल्याला नाणेघाटाचे टोक व पूर्वेला हरीश्चंद्रगडाचे दर्शन होतं.
गडावर जायचे कसे
गडावर जाण्यासाठी आपल्या सर्व प्रथम मुंबई-कल्याण-मुरबाड या मार्गावरून माळशेज घाटाच्या पायथ्याला असणारे मोरोशी या गावात जायचं आहे. मोरोशी गावातून गडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग पठारावर मिळतात. पहिला मार्ग हा मोरोशी गावातून माळशेजच्या दिशेने जाताना आपल्याला एक चेकपोस्ट आणि एक ढाबा लागतो. या ढाब्याच्या विरुद्ध बाजूने गेल्यानंतर उजव्या बाजूने एक पायवाट जंगलात जाते. इथून पुढे जाताना आपल्याला एक ओढा, टेकडी पार केल्यानंतर आपण पठारावर पोहचतो. याच ठिकाणी दुसरी वाट येऊन मिळते.
पठारावर येणारी दुसरी वाट मोरोशी गावातून माळशेजच्या दिशेने जाते आपल्याला जी पोलीस चेकपोस्ट लागते. तिथून पुढे उजव्या बाजूला एक वनखात्याचा बोर्ड लागतो. त्या बोर्डवर ‘किल्ले भैरमगड गुंफा मार्ग, वनविभाग ठाणे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला आहे. येथून एक वाट शेतातून गडावर गेली आहे. हि वाट पुढे जाऊन पठारावर मिळते. पठाराव दोन्ही वाटा एकाच ठिकाणी मिळतात. दोन्ही वाटांनी गडावर जाण्यासाठी अंदाजे 1 ते 2 तास लागू शकतात.
गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का?
गड अतिशय दुर्गम स्वरुपाचा असल्यामुळे इतर गडांवर आपल्याला ज्या सुविधा स्थानिक गावकऱ्यांच्या माध्यमातून मिळतात. त्या या गडावर मिळत नाहीत. त्यामुळे गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. जेवणाची सोय तुमची तुम्हालाच करावी लागणार आहे. त्याच बरोबर गडावर राहण्याची सुद्धा कोणतीही सोय नाही. रहायचं असेलच तर मोरोशी गावात राहण्याची सोय होऊ शकते. तसेच गडावर पाण्याची टाकी आहेत. मात्र पाणी पिण्यायोग्य आहे का नाही? या बद्दल खात्री नाही. त्यामुळे शक्यतो सोबत जाताना मुबलक प्रमाणात पाणी गडावर घेऊन जावे.
टीप – गडावर जाण्याची वाट अतिशय कठीण स्वरुपाची आहे. त्यामुळे गिर्यारोहणासाठी लागणारी सर्व सामग्री सोबत असावी. तसेच जाणकार व्यक्तींसोबतच गडावर जाण्याला प्राधान्य द्यावे.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.