प्रोफेशनल व्यवसायिक करार करणारी पहिली भारतीय, भारतीय फुटबॉलची आदर्श, भारताची Goal Machine अशा अनेक नावांनी आपल्या नावासह देशाचा जगभरात डंका वाजवणारी BALA DEVI कोण आहे? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण क्रिकेटवेड्या भारतात इतर खेळांना म्हणावा तसा चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाही. हॉकी, फुटबॉल सारख्या खेळांमध्ये खेळाडू आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करून देशाची मान उंचावतात. मात्र, त्यांची फारशी दखल घेतली जात नाही.
शनिवारी 19 ऑक्टोबर 2024 रोजी बाला देवीने इतिहास रचला आणि संपूर्ण भारतात सोशल मीडियासह बातम्यांवर तिच्याच नावाची चर्चा सुरू झाली. बाला देवीने नेपाळमध्ये सुरू असलेल्या 2024 च्या SAFF महिला चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीतील 50 वा गोल केला आणि भारतीय फुटबॉलच्या इतिहासात याची सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. बाला देवी 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिचा संपूर्ण जीवन प्रवास या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
वडिलांच स्वप्न सत्यात उतरवलं | Bala Devi
क्रिकेटवेड्या भारतात इतर खेळांमध्ये आवड निर्माण करणे फार कठीण. आवड निर्माण करून एखाद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांमध्ये दमदार कामगिरी करणारे अनेक खेळाडू आपल्या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यात अयशस्वी ठरले. किंबहुना त्यांना म्हणावा तसा पाठिंबा भेटला नाही. असंच काहीस बाला देवी हिच्या वडिलांसोबत झालं. त्यांनाही फुटबॉलची प्रचंड आवड होती. मात्र परिस्थिती अभावी त्यांना फार काही चांगले करता आले नाही. बाला देवीने वडिलांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचा एक प्रकारे दृढ निश्चय बालपणीच केला होता.
2 फेब्रुवारी 1990 रोजी मणिपूर राज्यातील लिलोंग गावामध्ये नगंगोम बाला देवी हिचा जन्म झाला. वडिलांकडून प्रेरणा घेत बाला देवीने आपल्या आवडीच्या फुटबॉल या खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली. बाला देवीच्या आवडीला कुटुंबीयांनी सुद्धा पाठिंबा दिला. कुटुंबीयांचा पाठिंबा आणि बाला देवीने घेतलेली मेहनत यामुळे स्थानिक स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी करायला सुरुवात केली. आपल्या खेळामुळे तिने सर्वांना प्रभावित केल आणि 2002 मध्ये आसाममध्ये झालेल्या अंडर-19 महिला चॅम्पियनशिपमध्ये मणिपूरकडून तिने सहभाग नोंदवला. या संपूर्ण स्पर्धेत तिने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत आयोजकांना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडले. तिच्या सर्वोत्कृष्ट खेळामुळे तिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. तिने आपल्या खेळाचा धडाका कायम ठेवला आणि लोगापठ दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2003 साली पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट पुरस्कारावर मोहर उमटवली.
मणिपूरमध्ये बाला देवीचा चाहता वर्ग वाढू लागला होता. आपल्या खेळाने तिने सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळेच 17 वर्षांखालील सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कारही तिने मिळवला. अखेर बाला देवीला तिच्या मेहनतीच फळ मिळाले आणि वयाच्या 15 व्या वर्षी 2005 साली भारताच्या राष्ट्रीय महिला फुटबॉल संघात निवड झाली. 2005 पासून बाला देवीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. तेव्हापासून बाला देवीने पुन्हा मागे वळून पाहीले नाही. 2006 आणि 2007 मध्ये 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाचेही प्रतिनिधीत्व तिने केल.
पहिल्या SAFF Women’s Championship चे 2010 साली आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताच्या संघात बाला देवीचाही समावेश होता. या स्पर्धेत तिने अतुलनीय कामगिरी केली. भूतानविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात 5 गोल करत तीने भुतानला दिवसा तारे दाखवले होते. हा सामना भारताने 18-0 अशा फरकाने जिंकला होता. या स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये बाला देवीने 8 गोल केले होते. विशेष म्हणजे नेपाळचा 1-0 असा पराभव करून भारत चॅम्पियन ठरला होता.
धक्कादायक बाब म्हणजे 2012 साली झालेल्या SAFF चॅम्पियनशिपसाठी भारताच्या संघात बाला देवीला स्थान देण्यात आले नाही. ही स्पर्धा भारताने जिंकली मात्र बाला देवीच्या नसल्यामुळे काही प्रमाणात चाहत्यांचा हिरमोड झाला. परंतु 2014 मध्ये तिची संघात निवड झाली आणि दमदार कामगिरी करत आपल्या खेळाचा धडाका कायम ठेवला. स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये बाला देवीने 11 गोल करत विरुद्ध संघाला अस्मान दाखवले. उपांत्य फेरीत एक आणि अंतिम सामन्यात नेपाळविरुद्ध बाला देवीने चार गोल करत भारताने 6-0 अशा फरकाने विजय मिळवला. अशा पद्धतीने भारताने नेपाळचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा SAFF चॅम्पियनशिपवर कब्जा केला.
Rohit Sharma Biography – बोरिवली ते Team India, यशस्वी कर्णधाराची यशस्वी कारकीर्द
बाला देवीने केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे तिला 2014 या वर्षांतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अखिल भारतीय फुटबॉल संघातर्फे पुरस्कार देण्यात आला. तिच्या खेळाचा धडाका सुरूच होता. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी 2015 साली सुद्धा तिचा वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. बाला देवीने उत्कृष्ट कामगिरी आणि खेळातील सातत्यामुळे 2016 साली तिची भारताची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. कर्णधार म्हणून SAFF Women’s Championship 2016 ही तिची पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेत सुद्धा भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत स्पर्धा जिंकली. कर्णधार म्हणून बाला देवीसाठी हा पहिलाच मोठा विजय होता.
Manipur Police Sport’s Club ते युरोपच्या Rangers Football Club पर्यंत गगनभरारी
आंतरराष्ट्रीय स्तरावर धमाका करण्यापूर्वी बाला देवीने स्थानिक पातळीवर आपल्या नावाचा डंका वाजवला होता. सुरुवातीला मणिपूरच्या वरिष्ठ महिला संघाचे तिने नेतृत्व केले आणि 2014 साली महिला फुटबॉल चॅम्पियनशिप सुद्धा संघाने जिंकली. 2010 नंतर मणिपूरच्या संघाने पहिल्यांदाच स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2014 साली बाला देवीची New Radiant मालदीवमधील फुटबॉल क्लब सोबत करार केला. या संघामध्ये भारताच्या ओइनम बम्बेन देवी आणि लाको फुटी भुतिया या महिला खेळाडूंचा सुद्धा समावेश होता.
Indians Women League 2016-17 मध्ये बाला देवीने पात्रता फेरीत मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लबसोबत उत्कृष्ट खेळ केला. मात्र, अंतिम फेरीत Eastern Sporting Union कडून खेळली. त्यानंतर 2017-18 मध्ये झालेल्या Indians Women League मध्ये तिने KRYPHSA हा क्लब जॉईन केला होता. मात्र, 2018-19 मध्ये बाला देवी पुन्हा तिचा मुळ क्लब मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लब कडून खेळली. 2019 साली तिच्या नावाची चर्चा देशभरात झाली. मणिपूर पोलीस क्लब कडून खेळताना IWL मध्ये फक्त 7 सामन्यांमध्ये 26 गोल करण्याचा भीम पराक्रम केला होता.
बाला देवीने 2020 मध्ये Scottish Women’s Premier League साठी प्रसिद्ध फुटबॉल क्लब Rangers Football Cup सोबत 18 महिन्यांचा करार केला. 2022 साली झालेल्या या स्पर्धेत रेंजर्स एफसी कडून खेळताना 85 व्या मिनिटाला तिने मदरवेल एफसीविरुद्ध गोल केला आणि इतिहास रचला. भारताकडून प्रोफेशनल लीगमध्ये गोल करणारी ती पहिला भारतीय महिला खेळाडू ठरली. त्याबरोबर या सामन्या रेंजर्स एफ सी ने मदरवेल एफ सी चा 9-0 अशा फरकाने पराभव केला. मात्र, पायाच्या दुखापतीमुळे ती उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकली नाही. अखेर तिला माघार घ्यावी लागली. 2023 साली बाला देवीने पुन्हा एकदा भारताच्या IWL मध्ये पुनरागमन केले आणि ओडिशा WFC सोबत करार केला.
पोलीस निरीक्षक बाला देवी
अर्ध व्यवसायिक फुटबॉलपटू म्हणून बाला देवी आपला खेळ जोपासत आहेत. त्याचबरोबर त्या देशसेवेत असून मणीपूरमध्ये पोलीस निरीक्षक (Inspector) या पदावर कार्यरत आहेत. फुटबॉल म्हटले की सुनील छेत्री यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतीच फुटबॉलला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यामध्ये सुनील छेत्री यांचा मोठा वाटा आहे. त्याच्या जोडीने आता बाला देवी यांचे नाव सुद्धा आदराने नक्कीच घ्यावं लागेल. भारतीय महिला संघाकडून खेळताना बाला देवीने 58 सामन्यांमध्ये 52 गोल केले आहेत.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.