कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे 2019 पासून आमदार असणारे प्रमोद रतन पाटील उर्फ Raju Patil यांचा Maharashtra Assembly Election 2024 मध्ये पराभव झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे ते एकमेव आमदार होते. त्यांचाही पराभव झाल्यामुळे मनसेला विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे पक्षाचे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उभे असणार्या राजू पाटील यांच्या जागेवर सर्वाधिक विश्वास होता. परंतु विधानसभेचा कल विरोधात गेल्यामुळे मनसेची पाटी कोरीच राहिली.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजेश मोरे यांचा 1 लाख 41 हजार 164 मतांनी विजय झाला. राजू पाटील यांना एकूण 74 हजार 768 मतं पडली आणि त्यांचा 66 हजार 396 मतांनी पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, हेच चित्र 2019 च्या विधानसभा निवडणूकीत वेगळे होते. राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीणमधून दणदणीत विजय साजरा केला होता. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते अशी त्यांची ओळख आहे.
प्रारंभिक जीवन
राजू पाटील यांचा जन्म 26 सप्टेंबर 1973 रोजी झाला. राजू पाटील यांना राजकीय वारसा लाभला असं म्हटल तर चुकीचं ठरणार नाही. कारण राजू पाटील यांचे वडील रतनबुवा पाटील प्रीमियर कंपनीमध्ये ज्येष्ठ कामगार नेते होते. वडील कामगार नेते असल्यामुळे राजकारणातल्या छोट्या छोट्या गोष्टींची राजू पाटील यांना लहान असतानाच माहिती व्हायला सुरुवात झाली होती. राजू पाटील यांचा मोठा भाऊ रमेश पाटील हे सुद्धा राजकारणात सक्रिय होते. त्या काळात ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य होते.
राजकीय वाटचालीस सुरुवात
वडील आणि भावाचा राजकीय वारसा राजू पाटील यांनी पुढे चालवण्याचा निर्धार केला आणि 2010 साली खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात झाली. 2010 साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मनसेच्या 29 जागा जिंकून आल्या. या 29 जागा जिंकून आणण्यामागे राजू पाटील यांची मोठी मेहनत होती. या निवडणुकीत राजू पाटील पडद्या मागचे खरे सुत्रधार ठरले. त्यानंतरही त्यांच्या कामाचा धडाका सुरूच राहिला.
Gopinath Munde – महाराष्ट्राचा लोकनेता, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत
दरम्यान, 2009 साली ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणूक जाहीर झाली. राजू पाटील यांनी ही संधी हेरत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि कामाला सुरुवात केली. विशेष म्हणजे या निवडणुकीत राजू पाटील बिनविरोध निवडून आले. 2009 ते 2012 अशी चार वर्ष त्यांनी ठाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. बोलका स्वभाव, सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाण, पक्षाशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. अगदी कमी कालावधीमध्ये राजू पाटील यांनी ठाणे आणि कल्याणसह आजूबाजूच्या शहरांमध्ये गाव खेड्यांमध्ये मनसेचा चांगला विस्तार केला.
कामगार सेना सचिव ते आमदार
राजू पाटील यांच्या कामाचा धडाका पाहून राज ठाकरे चांगलेच प्रभावित झाले. त्यामुळे मनसेच्या कामगार संघटनेच्या सचिव पदाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. ही जबाबदारीही राजू पाटील यांनी उत्तमरित्या पार पाडली. त्यानंतर मराठवाडा संपर्कप्रमुखाची जबाबदारी सुद्धा त्यांनी पार पाडली. कल्याण ग्रामीण मतदारसंघात स्वत:ची आणि पक्षाची एक वेगळी छाप पाडण्यात ते यशस्वी ठरले होते. त्यामुळे 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेने राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
राजू पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला. दिवस रात्र मेहनत घेतली आणि 2019 च्या विधानसभेचा मनसेचा पहिला आमदार होण्याचा बहुमान पटकावला. राजू पाटील यांनी या निवडणूकीत शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा पराभव केला होता. विशेष बाब म्हणजे राजू पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकून येणारे एकमेव आमदार होते. राजू पाटील यांनी आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवली. अनेक वेळा सभागृहात आवाज उठवला आपले मुद्दे ठामपणे मांडले. त्यामुळे राजू पाटील यांचा आक्रमक चेहरा सभागृहाला पहायला मिळाला.
शिवसेना विरुद्ध मनसे
राजू पाटील यांची आमदार म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेना आणि मनसे असा राजकीय संघर्ष पहायला मिळाला. विविध मुद्यांवरून राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडाले, एकमेकांवर जोरदार टीका सुद्धा करण्यात दोघांनी मागे पुढे पाहीले नाही. त्यामुळे मनसेचा प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात होते. मात्र, दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. या नंतरच्या काळात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध मुद्यांवरून भेटीगाठी वाढत गेल्या. त्यामुळे नंतरच्या काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातला वाद हळुहळु कमी होत गेला. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे दोन्ही पक्षांमधले वैर संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
2024 विधानसभा निवडणूक
लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन प्रचार केला होता. श्रीकांत शिंदे यांना विजयी करण्यासाठी राजू पाटील आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. याची परतफेड विधानसभा निवडणुकीत होईल अशी मनसेच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिला. त्यामुळे राजू पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का होता.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राजेश मोरे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच त्यांच्या प्रचारासाठी स्वत: खासदार श्रीकांत शिंदे मैदानात उतरले, राजेश मोरे यांचा जोरदार प्रचार केला आणि राजेश मोरे यांना विजयी सुद्धा केले. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. तसेच राजू पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कामही केले होते. त्यामुळे शिवसेनेने राजू पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा करायला नव्हता पाहिजे, अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांमध्ये रंगताना पहायला मिळाली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणे ही राज ठाकरे यांची चुक होती का? तुम्हाला काय वाटत कमेंटमध्ये नक्की सांगा.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.