निसर्ग संपन्न महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटनाच्या जोडीने महिलांना स्वावलंबी करण्यासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून ‘आई’ (AAI Yojana) योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत महिलांना विनातारण व बिनव्याजी स्वरुपाचे कर्ज दिले जाणार आहे. ही योजना फक्त महिलांसाठी असून 15 लाख रुपयांपर्यंत कर्जाची मदत महिलांना मिळणार आहे.
ही योजना नेमकी काय आहे? या योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर अटी काय आहेत? अर्ज कुठे करायचा? चला जाणून घेऊया.
ही योजना नेमकी काय आहे?
ही एक महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविणारी योजना आहे. ज्या महिला पर्यटन पूरक व्यवसाय करत आहेत किंवा करू इच्छित आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासनाने या योजनेसाठी 41 प्रकारच्या पर्यटन पूरक व्यवसायांची निवड केली आहे. त्यामुळे तुम्ही जर महिला आहात आणि पर्यटन पूरक व्यवसाय करण्याच्या तयारीत आहात, तर ही योजना तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
योजनेसाठी पात्र व्हायचंय, पण अटी काय आहेत?
- योजनेची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा असावा.
- योजनेची दुसरी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे व्यवसायामध्ये 50 टक्के व्यवस्थापकीय व अन्य कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे.
- पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे.
- लाभार्थी, पर्यटन व्यवसाय व कर्ज देणारी बँक राज्यामध्येच असली पाहिजे.
- पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक त्या सर्व परवानग्या असल्या पाहिजेत.
- कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे हप्ते वेळेत भरणे बंधनकारक आहे.
अर्ज कुठे करायचा?
यो योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि आपल्या व्यवसायाला नवीन भरारी देण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही maharashtratourism.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेद देऊन सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.