माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि उद्योगपती जे. आर. डी टाटा यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रतिष्ठेचा UN Population Award पटकावण्याचा मान Adv. Varsha Deshpande यांना मिळाला आहे. अॅड. वर्षा देशपांडे या लेक लाडकी योजनेच्या प्रवर्तक आणि दलित महिला विकास मंडळाच्या संस्थापिका आहेत.
अॅड. वर्षा देशपांडे यांनी लोकसंख्या आणि प्रजनन आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाबद्दलच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील 172 देशांतील कार्यकर्त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर आठ ज्युरींच्या एका समितीने वर्षा देशपांडे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. म्हणजेच अॅड. वर्षा देशपांडे यांनी अनेक दिग्गजांना मागे टाकून हा पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्काराचं सर्वात मोठं वैशिष्ट्ट्य म्हणजे तब्बल 33 वर्षांनी हा पुरस्कार भारताला मिळाला आहे.
अॅड. वर्षा देशपांडे या सातारा जिल्ह्याच्या असल्यामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा उंचावली आहे. अॅड. वर्षा देशपांडे यांनी आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये महिलांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. ग्रामीण भागात महिलांचे संघटन करून दारुबंदी चळवळीला त्यांनी चालना दिली आहे. तसेच साताऱ्यातील ‘मुक्तांगण’ या केंद्राच्या माध्यमातून त्या कायदेविषयक सल्ला देण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगावर पॅनल अॅडव्होकेट आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणी व मूल्यमापन समितीच्या त्या सदस्य आहेत.