क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी, क्रिकेटची पंढरी म्हणून भारताचा नामोल्लेख संबंध जगभरात केला जातो. मात्र, या क्रिकेटवेड्या भारतात इतरही अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत आपल्या नावाचा डंका जगभरात वाजवला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये Pro Kabaddi League मुळे कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. याच व्यासपीठावर सर्वात पहिला डंका वाजवला तो म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार, यु मुंबा संघाचा माजी कर्णधार आणि सध्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या Anup Kumar या हरियाणाच्या खेळाडूने.
Anup Kumar Kabaddi’
Anup Kumar हे कबड्डीच्या इतिहासातील एक मोठं नाव आहे. दहा वर्षांपूर्वी प्रो कबड्डी लीगची 2014 साली सुरुवात झाली. तेव्हा क्रिकेटच्या तुलनेत कबड्डी या खेळाला पाठिंबा देणारा चाहता वर्ग फार कमी होता. मात्र, या अशा काळात कबड्डी बघायला चाहत्यांना भाग पाडले ते अनूप कुमार, राकेश शर्मा या दिग्गज खेळाडूंनी. प्रचंड चपळाई आणि बोनस घेण्याचे कौशल्य यामुळे हे खेळाडू इतर खेळाडूंपेक्षा वेगळे ठरले. देशाच प्रतिनिधीत्व करताना विश्व विजेत्या संघात दोन्ही खेळाडूंचा समावेश होता. आपल्या खेळामुळे आणि शांत स्वभावामुळे कमी वेळात मोठ्या संख्येने त्याने आपला चाहता वर्ग निर्माण केला. त्याच्या खेळाची दखल घेत भारत सरकारने अर्जुन पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्याला गौरवले आहे. चला तर जाणून घेऊया अनूप कुमारच्या वादळी जीवनाचा झंझावाती प्रवास.
प्रारंभिक जीवन
कुस्ती या खेळासाठी हरियाणाचा देशभरात नावलौकिक आहे. अनेक मातब्बर कुस्तीपटू या राज्यात घडले आणि घडतं आहेत. याच हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील पाल्रा या गावात वडील रणसींग यादव आणि आई बल्लो देवी यांच्या पोटी अनूप कुमारचा 20 नोव्हेंबर 1983 रोजी जन्म झाला. शालेय जीवनात असताना त्याचा आणि कबड्डीचा परिचय झाला. त्याने शाळांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये आपल्या शाळेचे प्रतिनिधीत्व केले आणि आपल्या खेळाचा स्तर उंचावत नेला.
CRPF मध्ये हवालदार आणि कबड्डीचा श्री गणेशा
अनूप कुमारने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले होते. देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्याने आपली मेहनत कायम ठेवली. याच दरम्यान एप्रिल 2005 रोजी अनूप कुमार CRPF मध्ये हवालदार या पदावर रुजू झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने अनूप कुमारच्या कबड्डी कारकिर्दीला बहर आला. त्यानंतर त्याने आपला सराव आणि पोलीस म्हणून सेवा यामध्ये योग्य संतुलन निर्माण करून सराव सुरू ठेवला. त्याचं फळं त्याला 2006 साली मिळाले आणि भारताच्या संघात त्याची निवड झाली. श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्याला भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची पहिली संधी मिळाली. त्यानंतर अनूप कुमारने कधीही मागे वळून पाहीले नाही. त्यांच्या कबड्डी कारकिर्दीचा आलेख सतत उंचावत गेला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी
2006 साली अनूप कुमारचे आंतरराष्ट्रीय स्तरावर आगमन झाले. त्यानंतर त्याने आपल्या शांत स्वभावाने आणि खेळाने चाहत्यांची मन जिंकली. त्यानंतर वारंवार विविध स्तरांवर त्याने भारताकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळेच कबड्डीमध्ये भारताच्या दिग्गज खेळाडूंमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आदराने केला जातो. भारताच्या कर्णधार पदाची जबाबदारी घेतल्यानंतर भारताच्या संघाने 2010 आणि 2014 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर उमटवली होती. त्याच बरोबर भारताने 2016 साली तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता.
Pro Kabaddi लीगमध्ये दणक्यात एन्ट्री
प्रो कबड्डी लीगची सुरुवात झाली अन् कबड्डी खेळणाऱ्या देशातील खेळाडूंना एक नवे व्यासपीठ मिळाले. 2014 साली प्रो कबड्डी लीगमध्ये U Mumba या संघाच्या कर्णधार पदाची मोठी जबाबदारी अनूप कुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आली. प्रो कबड्डी लीगचा पहिलाच हंगाम अनूप कुमारने गाजवला. खऱ्या अर्थाने प्रो कबड्डी लीगमुळे अनूप कुमारचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या पूर्ण हंगामात यू मुंबाचा खेळ जबरदस्त राहिला. त्यामुळे संघ अंतीम फेरीत सुद्धा पोहोचला होता. मात्र, जयपुर पिंक पँथर्स या संघाकडून त्याना अंतीम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, अनूप कुमार या लीगमधील सर्वात यशस्वी रेडर ठरला. त्याने 16 सामन्यांमध्ये 166 गुणांची कमाई केली होती.
अनूप कुमारच्या खेळाचा धडाका असाच सुरू होता. अनूप कुमारच्या नेतृत्वात यू मुंबाचा संघ 2015 साली पुन्हा एकदा मैदानात उतरला. मात्र, यावेळी यू मुंबाने धडाकेबाज कामगिरी करत विजेतेपदावर मोहर उटवली. या संपूर्ण स्पर्धेत अनूप कुमारने आपल्या खेळाने पुन्हा एकदा सर्व चाहत्यांना प्रभावित केले. त्याने 74 गुणांची कमाई करत हंगाम गाजवला. यू मुंबाचा खेळ असाच कायम राहिला आणि 2016 साली पुन्हा एकदा यू मुंबाचा संघ अंतिम फेरीत पोहचला. सलग तीन वर्ष अंतिम फेरीत पोहचणारा यू मुंबा एकमेव संघ आहे. विशेष म्हणजे तिन्ही वर्षी अनूप कुमार संघाचा कर्णधार होता.
अनूप कुमारच्या खेळाचा आलेख सतत उंचावत गेला. 2017 साली प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या सत्रात त्याने 400 रेड पॉइंट गुण पूर्ण करणारा प्रो कबड्डीमधील पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर पुढचा हंगाम त्याने जयपूर पिंक पँथर या संघाकडून खेळला. त्यानतंर 19 डिसेंबर 2018 रोजी त्याने कबड्डीमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल 15 वर्ष त्याने आपल्या खेळाच्या जोरावर कबड्डीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्याचा खेळ आणि खेळासाठी योगदान यासाठी त्याला 2012 साली अर्जून पुरस्काराने गौरवण्यात आले.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.