विधानसभा निवडणुकीच्या या धामधुमीत वाई-खंडाळा-महाबळेश्वर या मतदारसंघाचे चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केलेल्या Prataprao Bhosale यांची आवर्जून आठवण काढावी लागेल. आपल्या कामाचा आणि कर्तृत्वाचा ठसा त्यांनी राज्याच्या राजकारणात चांगलाच उमटवला होता. त्यामुळेच सरपंच पदापासून ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत उंच उडी मारण्यात त्यांना यश आले. तसेच तीन वेळा सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही प्रतापराव भोसले यांनी प्रतिनिधीत्व केले. महाराष्ट्रातील मुरब्बी राजकारणी, कुशल संघटक असा प्रतापराव भोसले यांचा उल्लेख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदराने करतात.
कृष्णेच्या तीरावर वसलेलं वाई शहर, महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर आणि मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला खेटून असलेला खंडाळा. या मतदारसंघाची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगताना पहायला मिळते. या मतदारसंघाने अनेक राजकारणी, अभिनेते, व्यवसायिक, अधिकारी, जवान आणि पत्रकार महाराष्ट्राला दिले. त्याच फळीतले एक तगडे राजकारणी म्हणजे प्रतापराव भोसले. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) निकालाचे औचित्य साधत प्रतापराव भोसले यांची यशस्वी कारकीर्द सर्वांना माहिती व्हावी म्हणून हा विशेष ब्लॉग.
प्रतापराव भोसले यांचे प्रारंभिक जीवन
प्रतापराव भोसले यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1934 साली वाई तालुक्यातील कृष्णेच्या तीरावर असणार्या कृषी समृद्ध अशा भुईंज या गावात झाला. प्रतापरावांचा प्रगतशील शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता. त्यामुळे जन्मत:च त्यांची आणि धरणी मातेची नाळ एक प्रकारे जोडली गेली होती. शेतकरी कुटुंब असल्यामुळे शेतीतले बारकावे अगदी बालवयापासूनच त्यांना समजायला सुरुवात झाली होती. मातीत रमणारे प्रतापराव शाळेच्या चार भिंतींमध्ये मात्र कधी रमले नाहीत. शाळा अर्धवट सोडून त्यांनी शेतीची कस धरली आणि वडीलांच्या जोडीने नांगर हाती घेत शेती सुरू केली.
उत्तम वक्ता असलेले प्रतापराव हाडाचे शतेकरी. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. तसेच तरुण वयात वेळोवेळी विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला होता. नेतृत्वगुण प्रतापराव भोसले यांच्यामध्ये ठासून भरले होते. वयाच्या तिशीत असताना खऱ्या अर्थाने प्रतापरावांच्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा झाला असं म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. प्रतापरावांमध्ये असणारी चपळता, चटकन निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या राजकारणात मुरलेल्या नेत्यालाही मागे टाकणारी होती. त्यामुळे त्यांची भुईंच गावच्या सरपंचपदी निवड झाली होती. सरपंच पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी जवळपास 1967 पर्यंत सरपंच पद, पंचायच समिती सभापती अशी विविध पदे भुषवली. तरुण वयात सरपंच पद मिळाल्यामुळे पंचक्रोशीत भाऊंच्या नावाची जोरदार चर्चा होती.
Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद
प्रतापरावांच लोकांमध्ये मिसळणे, समस्या जाणून घेणं, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी असणारी त्यांची तळमळ सर्वांनीची पाहिली होती. त्यामुळे पंचक्रोशीतील तरुण वर्गात त्यांची क्रेझ निर्माण झाली होती. याचे फळ त्यांना 1967 साली मिळाले, कारण पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढण्याची मोठी संधी त्यांना मिळाली. वयाच्या 33 व्या वर्षी वाई-खंडाळा मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. पायाला भिंगरी लागल्यागत त्यांनी प्रचार केला आणि विजयी सुद्धा झाले. ही निवडणूक वाई-खंडाळा मतदारंसघासाठी आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण चार वेळा आमदार राहिलेल्या दादासाहेब खाशेराव जगताप यांचा प्रतापरावांनी पराभव केला होता.
प्रतापरावांनी पहिल्यांदा 1967 साली वाई-खंडाळा मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी जोमाने काम करत फक्त भुईंज नव्हे तर वाई आणि खंडाळा या दोन्ही तालुक्यांमध्ये जोरदार कामांचा सपाटा लावला होता. त्यामुळे पुढचे चार टर्म आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली.
राज्यमंत्री ते खासदार
1978 साली राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुलोद आघाडीचा ऐतिहासिक प्रयोग करत सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला. यावेळी शरद पवारांच्या सोबतीला काही मोजकी मंडळी होती. यामध्ये प्रतापराव भोसले यांचा सुद्धा समावेश होता. पुलोद सरकारमध्ये पहिल्यांदाच प्रतापरावांना राज्यमंत्रीपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. सत्तर व ऐंशींच्या दशकात भाऊंनी ग्रामीण भाग पिंजून काढला आणि ग्रामीण भागातील समस्या जाणून घेतल्या. फक्त समस्या जाणून घेण्याचा देखावा त्यांनी केला नाही तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी नवनवीन योजना राबवत विचारांना कृतीची जोड दिली.
RR PATIL – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आर आर आबांचे नाव चर्चेत, वाचा सविस्तर…
राज्यमंत्री असताना प्रतापराव भोसले यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या काळातच सातारा जिल्ह्यातील कृषी औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण ठरलेले धोम व काण्हेर हे प्रकल्प पूर्ण झाले. त्याच बरोबर धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी चोख पार पाडली. त्यानंतर 1983 साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. 1984 साली प्रतापराव भोसले यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अप्रत्यक्षपणे लोकसभेचा दरवाजा त्यांच्यासाठी खुला झाला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा मतदारसंघ आणि यशवंतराव चव्हाण असे समीकरण तयार झाले होते. 1984 साली लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, दुर्दैवाने 25 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतरावांचा मृत्यू झाला. त्यामुळे डमी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रतापराव भोसले यांना काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले. विशेष म्हणजे प्रतापराव काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. यशवंतराव चव्हाणांचा वारसा प्रतापरावांनी पुढचे तीन टर्म कायम ठेवला. 1984, 1989 आणि 1991 अशी तीन टर्म प्रतापराव भोसले खासदार म्हणून सातारा मतदारसंघातून निवडून गेले.
प्रतापराव भोसले ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा स्पष्ट मताचे होते. स्वत: हाडाचे शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव होती. याचमुळे खासदारांच्या ‘किसान फोरम’चे नेतृत्व आपोआप त्यांच्याकडे गेले होते. देशातील अनेक खासदारांचा या किसान फोरमध्ये समावेश करण्यात आला होता. कृषी धोरणे ठरविताना सरकारवर दबाव आणण्यासाठी कृषी फोरम महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असे.
अन् महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडली
प्रतापराव भोसले यांच्या कामाचा आलेख संतत उंचावत गेला. त्यांच्या कामाचा धडाका पाहून 1997 साली काँग्रेस नेतृत्तवाने प्रतापरावांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. विशेष म्हणजे या काळात केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार होते. त्यामुळे एकप्रकारे काळ संघर्षाचा होता. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. 1999 मध्ये शरद पवारांनी पुन्हा एकदा सर्वांनाच मोठा धप्पा देत वेगळा मार्ग निवडला. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष स्थापन केला. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत विधानसभेतील प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला. या काळात प्रतापरावांच्या अनुभवाची चुणूक महाराष्ट्राला आली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रतापराव भोसले यांनी समविचारी पक्षांची मूठ बांधत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले.
भाऊंचे शैक्षणिक कार्य
प्रतापराव भोसले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कृषी, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार सारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. स्वातंत्र्य सैनिक आणि सातारा जिल्ह्याचे नेते किसनवीर आबा यांच्या विचारांनी प्रतापराव भोसले प्रभावित होते. त्यामुळे आबांनी स्थापन केलेल्या वाईतील जनता शिक्षण संस्था व भुईंज येथील सहकारी साखर कारखान्याच्या कमाकाजाकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष दिले होते. त्यामुळे जनता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भाऊंनी निस्वार्थपणे पार पाडली.
Pramod Mahajan – देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव; भावानेच केला खून, काय घडलं होतं तेव्हा?
किसनवीर आबा यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रतापराव भोसले यांनी साखर कारखान्याला त्यांचे नाव दिले. याव्यतिरिक्त केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांनी वाई येथे सुरू केलेल्या आणि पुढे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विस्तारीत केलेल्या प्रज्ञापाठशाळेच्या कामकाजात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. फक्त राजकारणच नव्हे तर शैक्षणिक आणि सामाजिक कामात सुद्धा प्रतापराव भोसले यांनी उल्लेखणी कामगिरी केली. आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली. साताऱ्याच्या कुशीत वाढलेल्या प्रतापरावांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मात्र, ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व म्हणून आजही त्यांच्या नावाच उल्लेख आदराने केला जातो.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.