दुष्काळ, महापूर, शेतमालाला भाव न मिळणे या सारख्या घटनांमुळे मागील काही वर्षांमध्ये देशभरातली शेतकर्यांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारकडून मदतीती शेतकर्यांना अपेक्षा आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकर्यांनी घेतलेले 90 लाखांचे कर्ज स्वत:हून फेडले आहे. त्यामुळे गावातील शेतकरी आता कर्जमुक्त झाले आहेत.
गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील जिरा गावामध्ये ही शेतकर्यांच्या हिताची घटना घडली आहे. जिरा गावातील शेतकर्यांच्या नावावर फसवी कर्जे वाढल्याने शेतकर्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. मात्र, शेतकर्यांना याची कल्पनाच नव्हती. कर्जाचा बोजा वाढल्यामुळे शेतकर्यांना सरकारी मदत, सरकारी योजनांचा लाभ आणि कर्ज मिळत नव्हतं. 1995 सालापासून हा सर्व सेवा सहकारी मंडळाबाबतचा वाद सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकर्यांची मोठी कोंडी होत होती. जिरा गावचे रहिवासी आणि व्यावसायिक बाबूभाई जिरावाला यांच्या आई या सर्व प्रकारामुळे व्यथित झाल्या होत्या.
शेतकर्यांवर असणार्या कर्जामुळे जमिनीचे विभाजन करणे शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या आईला गावातील शेतकर्यांचे कर्ज फेडायचे होते आणि त्यासाठी तिला तिचे दागिने विकायचे होते. आईची इच्छा आम्ही दोन्ही भावांनी मिळून पूर्ण केल्याचे बाबूभाई जिरावाला यांनी सांगीतले. गावातील शेतकर्यांवर एकूण 89 लाख 89 हजार 209 रूपयांचे कर्ज होते. आम्ही ते कर्ज फेडले आणि कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र सर्व शेतकर्यांना वाटले. हीच आमच्या आईसाठी खरी श्रद्धांजली असल्याचे बाबूभाई म्हणाले.