Baramati Accident अपघातांच्या मन सुन्न करणाऱ्या घटना वाचण्यात आल्या की काळीज पिळवटून निघतं. अपघात होऊन संबंधित चालकाला शिक्षा होते. परंतु त्याच्या चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याचं काय? पुण्यातील बारामतीमध्ये झालेल्या एका अपघाताने सर्वांना जबर धक्का बसला आहे. अवघ्या 24 तासांत आनंदात असणारं कुटूंब पूर्त कोलमडून गेलं आहे. अपघातात पोटचा मुलगा गमावला, दोन नातींचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि या धक्क्याने आजोबांचेही निधन झाले. या अपघातामुळे आचार्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी (27 जुलै 2025) दोन्ही मुलींना घेऊन ओंकार आचार्य घराच्या दिशेन निघाले होते. बारामती तालुक्यातील महात्मा फुले चौकात आले असता सकाळी अकराच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या हायवा डम्परने ओंकार यांच्या दुचाकीला ओव्हरटेक केला. त्यामुळे ओंकार यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते गाडीसह डम्परखाली गेले. या अपघाता ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुली मुधरा (4 वर्ष) आणि सई (10 वर्ष) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी आनंदात असणारं आचार्य कुटुंब अवघ्या काही तासांत शोकसागरात बुडालं. पोटचा पोरगा आणि दोन नातींचा मृत्यू झाल्याने आचार्य कुटुंबाला जबर धक्का बसला होता. हा धक्का त्यांचे आजोबा राजेंद्र आचार्य सहन करू शकले नाहीत. आणि त्यांचे सोमवारी (28 जुलै 2025) पहाटे दु:खद निधन झालं. अवघ्या 24 तासांत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने आचार्य कुटुंबावर काय परिस्थिती ओढावली असेल, याचा विचारही करू शकत नाही.