मागील काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रमाणात वेगाने वाढ झाली आहे. अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आलं आहे. पुण्यातील एक दाम्पत्य सुद्धा या सर्व प्रक्रियेतून जात होतं. कमल आणि सुरेश (बदलेली नावे) यांच्यात मागील 12 वर्षांपासून न्यायालयीन (Court News) लढाई सुरू होती. अखेर वकिलांच्या एका वाक्यामुळे या दाम्पत्याने 12 वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेऊन दोघेही एकाच दुचाकीवर बसून घरी गेले.
या दाम्पत्याचा 2005 साली विवाह झाला होता. लग्नांतर दोन वर्षांनी त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण होते. कमल या नोकरी करायच्या तर सुरेश वाणिज्य शाखेचे क्लास घ्यायचे. मुलगी झाल्यानंतर पुढचे पाच ते सहा वर्ष सर्व काही सुरळीत सुरू होतो. परंतु नंतर माशी शिंकली आणि दोघांमध्ये खटके पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे 2013 मध्ये दोघांनी एकमेकांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. पतीने क्रूर वागणुकीचा आरोप करत घटस्फोटाची मागणी केली तर, पत्नीने पतीसह सासरच्या मंडळीवर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. अशा प्रकारे त्यांनी मागील 12 वर्षांत एकमेकांविरोधात सहा दावे दाखल केले होते.
लोकअदालतीमध्ये अॅड. सुचित मुदंडा यांनी या दाम्पत्यामधील वाद मिटवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले. दोघांची समजूत काढली आणि “तुमची मुलगी आता 18 वर्षांची होणार आहे, तिच्या भविष्याचा विचार करा.” असा सल्ला अॅड. सुचित मुदंडा यांनी दाम्पत्याला दिला. त्यांच्या या वाक्याने दोघांनाही विचार करायला भाग पाडलं. मुलीच्या भविष्याखातर दोघांनीही एकमेकांच्या विरोधातील सर्व दावे मागे घेतले आणि 12 वर्ष सुरू असलेली भांडणे लोकअदालतीत संपुष्टात आली. न्यायालयाने पतीसह सासरच्या मंडळींचा निर्दोष मुक्तता केली असून पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. तसेच पत्नीने घरात राहण्याचा कायदेशीर अधिकार मिळविला. दोघांचाही घटस्फोट झाला असला, तरी ते पुन्हा एकत्र येऊ शकतील, अशा विश्वास अॅड. सुचित मुदंडा यांनी व्यक्त केला.