लेख – रूईच्या पानावर गौराई; वयगांव गावची ऐतिहासिक आणि पर्यावरणपूरक परंपरा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<<

महाराष्ट्रात साजरा होणारा प्रत्येक सण धुमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला जातो. सण फक्त साजराच केला जात नाही तर पूर्वापार सुरू असलेल्या परंपरा सुद्धा तितक्याच आवडीने जपल्या जातात आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येक सणाची एक वेगळी ओळख आणि वैशिष्ट्य आहे. असाच आपल्या सर्वांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव होय. घरोघरी गणपती बाप्पाच वाजत-गाजत स्वागत केलं जात, त्याचबरोबर गौराईचे (Gaurai) सुद्धा तितक्याच उत्साहात आगमन केलं जात. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये गौराईच्या पूजा वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वयगांव या गावामध्ये रूईच्या पानावर गौराई बसवण्याची अनोखी आणि पर्यावरणाला पुरक अशी ऐतिहासिक परंपरा आहे.

गौराईच्या आगमनाची ही अनोखी परंपरा साधारणपणे 200 ते 250 वर्षांपूर्वीची असल्याची माहिती वयगांव गावचे माजी सरपंच अशोक तुकाराम वाडकर यांनी दिली. ही परंपरा केवळ धार्मिक आस्थेपूर्ती मर्यादित नाही तर, या परंपरेमध्ये पर्यावरणपूरकता, स्त्रियांचा सामूहिक सहभाग आणि परंपरेची इतिहासाशी असलेलनी नाळ, अशा अनेक पैलूंचा समावेश होतो. 

रूईच्या पानावरच गौराईचे आगमन का झाले?

पूर्वीच्या काळात गौराईच्या प्रतिमा, मूर्ती किंवा मुखवटे सहज उपलब्ध नव्हते. त्यामुळे गौराईच आगमन करायचं कसं? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाच उत्तर म्हणजे गावातील काही महिलांनी मिळून आपल्या कल्पनाशक्तीचा वापर केला आणि रानात उगवणाऱ्या रुईच्या पानाला गौराईचे स्वरूप दिले. तव्यावर आलेली काजळी वापरून रुईच्या पानावर गौराईचे तोंड, डोळे, नाक रेखाटले जात असे. त्यानंतर त्या गौराईला एका सुपामध्ये बसवून पूजन केले जाई. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गौराई पूर्णपणे पर्यावरणपूरक होती. कोणतेही प्लॅस्टिक, रंगीत रसायन किंवा अपव्यय न करता, गावात सहज मिळणाऱ्या गोष्टींनी गौराई साकारली जायची. 

पाटीलकी आणि गौराई पूजनाचा इतिहास

गावातील पाटीलकी असलेल्या घरामध्ये गौराई पूजन करण्याची परंपरा होती. गौराई पूजन हा स्त्रियांचा खास सण मानला जातो. सुरुवातीला 5 ते 50 सुवासिनी एकत्र येऊन पाटीलवाड्यात ववसा घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी जमायच्या. हे केवळ धार्मिक कार्य नव्हते, तर गावातील महिलांच्या एकत्र येण्याचा, संवाद साधण्याचा आणि आपुलकी वाढवण्याचा एक महत्त्वाचा क्षण ठरायचा. संपूर्ण वर्षभराताल गौराई आगमनाचे हे काही दिवस महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असायचे. गौराई पूजनामुळे स्त्रियांना एकत्रितपणे सामाजिक व धार्मिक जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळायची. महिलांमध्ये एकोपा वाढायचा आणि विचारांची देवाणघेवाण व्हायची. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडलेली नाळ

रूईच्या पानावर गौराई पूजन करण्याच्या परंपरेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ती शिवरायांच्या काळाशी जोडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात “मोकासा” ही प्रथा होती. युद्धामध्ये पराक्रम करणाऱ्या योद्ध्याला शिवरायांकडून मानाची वस्त्रे दिली जात असत. त्यालाच “मोकासा” असे म्हटले जायचे. याच “मोकासा”चे रुपांतर पुढे मोकाशी असं झाल्याची माहिती अशोक तुकाराम वाडकर यांनी दिली. त्यामुळे रूईच्या पानावर विराजमान होणारी ही गौराई मोकास आवाडाची गौराई म्हणून ओळखली जाते. 

इतिहासात पुरंदरच्या लढाईदरम्यान अर्जोजी यादव (अर्जून बाबा) यांनी दाखवलेल्या शौर्याची नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मानाची वस्त्र (मोकासा) देऊन त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला होता. अर्जोजी यादव यांचे वयगांवमध्ये छोटे स्मारक सुद्धा आहे. अशा वीरांच्या कुटुंबांतील स्त्रिया गौराई पूजनात सामील होत असत. त्यामुळे या परंपरेत धार्मिकता, शौर्याचा वारसा आणि समाजाची एकजुटता या सगळ्यांचा संगम दिसतो. 

काळानुरूप झालेले बदल

रूईच्या पानावर गौराई बसवण्याची परंपरा जरी प्राचीन असली तरी, काळानुरूप तिच्या स्वरूपात अमुलाग्र बदल होत गेले. 

  1. 1980 नंतर – गौराईच्या रूपाला आधुनिक स्पर्श देण्यात आला. रुईच्या पानावरच नाही तर लाकडाच्या आधाराने गौराईला साडी परिधान करून बसवण्यात येऊ लागले.
  2. 1990-95 दरम्यान – गौराईसाठी खास स्टॅन्ड तयार करण्यात आले.
  3. पंकज सणस या तरुणाने रुईच्या पानावर सुंदर चेहरा रंगवून गौराईचे रूप अधिक आकर्षक बनवले.

या बदलांमुळे गौराई पूजन अधिक व्यवस्थित आणि आकर्षक पद्धतीने होऊ लागले, पण त्याचवेळी मूळ परंपरेचा गाभा जपला गेला. 

अन् सार्वजनिक गौरी फंडाची सुरुवात झाली

परंपरेला टिकवण्यासाठी आणि सामूहिक स्वरूप देण्यासाठी गावात सार्वजनिक गौरी फंड सुरू करण्यात आला.

  • सुरुवातीला 1995 ते 1998 च्या दरम्यान 10 रुपयांचा फंड आकारला गेला. 
  • पुढे ही रक्कम वाढवत 50 आणि 100 रुपये करण्यात आली.
  • आज सुमारे 130 च्या आसपास सभासद या परंपरेशी जोडले गेले आहेत.

हा फंड फक्त पैसे साठवण्यापूर्ता मर्यादित नसून गावातील एकतेचे आणि परंपरेप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक ठरला. 

आधुनिकतेकडे सुरू असलेली वाटचाल

आजच्या काळात परंपरेला आधुनिकतेचे रूप देण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही रुईच्या पानावर गौराई बसवण्याची प्रथा टिकून आहे. यातून एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे परंपरा आणि आधुनिकता हातात हात घालून चालू शकतात. एका बाजूला जुन्या पद्धतीची ओळख जपली जाते आणि दुसऱ्या बाजूला काळानुसार बदल स्वीकारले जातात. या सर्व प्रक्रियेत पूर्वापार सुरू असलेल्या परंपरेला जराही धक्का लागू दिला जात नाही. 

वारशाचे जतन आणि महिलांची महत्त्वाची भूमिका

या परंपरेचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे महिलांचा सहभाग.

  1. सुरुवातीच्या काळातील महिलांनी ही परंपरा सुरू केली.
  2. मधल्या काळातल्या महिलांनी तो वारसा जपला.
  3. आणि आजच्या पिढीतील महिलांनी या परंपरेला आधुनिकतेचे रूप दिले.

महिलांचा हा सहभाग दाखवतो की, गौराई पूजन हे केवळ धार्मिक कार्य नसून स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने गौरीभवनामध्ये महिला जमतात गौराईच पूजन केलं जातं आणि झिम्मा आणि फुगडी हे पारंपरिक खेळ खेळत सण साजरा केला जातो. 

परंपरेचे सामाजिक व पर्यावरणीय महत्त्व

  1. रुईच्या पानावर गौराई बसवण्याची परंपरा म्हणजे पर्यावरणपूरकतेचा संदेश.
  2. गावातील एकत्रितता आणि महिलांची सक्रिय भूमिका म्हणजे सामाजिक ऐक्य.
  3. शिवरायांच्या काळाशी जोडलेली नाळ म्हणजे ऐतिहासिक अभिमान.

या सगळ्या पैलूंमुळे ही परंपरा केवळ धार्मिक न राहता संस्कृती, इतिहास, पर्यावरण आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक बनली आहे.

वयगांव गावातील रुईच्या पानावर गौराई बसवण्याची परंपरा आज जवळपास दोनशे वर्षांचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे चालली आहे. या परंपरेचे सौंदर्य म्हणजे साधेपणा, पर्यावरणपूरकता आणि स्त्रियांचा सामूहिक सहभाग. कालांतराने जरी गौराईच्या रूपात बदल झाले तरी परंपरेचा आत्मा मात्र तसाच जपला गेला आहे.