महाबळेश्वर (Mahabaleshwar News) तालुक्यातील तापोळा रस्त्यावर चिखली परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकीवरून आपल्या गावी निघालेल्या पती पत्नीवर माकडाने झडप मारली आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघाता पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवळी गावातील आनंद सखाराम जाधव (50) हे पत्नीसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास महाबळेश्वर शहरातून पत्नीसमवेत दुचाकीने तापोळा रस्त्याने आपल्या गावी निघाले होते. याच दरम्यान चिखली परिसरात आले असता त्यांच्या दुचाकीवर माकडाने झडप मारली त्यामुळे आनंद जाधव यांचा दुचाकीवर ताबा सुटला व ते पत्नीसह रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले असता उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी अपघातात गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.