पर्यटकांच प्रमुख आकर्षण असलेल्या महाबळेश्वर (Mahableshwar News ) येथील वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये वेण्णा लेक आणि आजूबाजूचा परिसर पर्यटकांनी फुलून जातो. नौकाविहारासह घोडेस्वारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. मात्र, हीच घोडेस्वारी स्थानिकांसह पर्यटकांसाठी धोक्याची ठरत आहे. वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर धूळ, माती आणि घोड्याची लीदमिश्रित धूळ पाण्यात मिसळत असल्याने गंभीर प्रदूषण निर्माण झाले आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिका व संबंधित प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलावील, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी पांचगणी आणि महाबळेश्वरमध्ये इतर जिल्ह्यांमधून आणि राज्यांमधून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. घोडेस्वारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वेण्णा लेक परिसरात हमखास थांबतात. यामुळे, दिवसभर घोड्यांची सतत ये-जा सुरू असते. घोड्यांचे सतत घोडदौड सुरू असल्यामुळे धूळ, माती आणि घोड्याचे लिद (शेण) वेण्णा लेकच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. दैनिक्य ऐक्यने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
घोड्याच्या लीदमिश्रित धुळीमुळे आरोग्यावर काय परिणाण होतो?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, घोड्याच्या लिदामध्ये विविध प्रकारचे जंतू, जीवाणू आणि परजीवी असतात. ही लीदमिश्रित धूळ पाण्यात गेल्यास पाणी दूषित होते. आणि असं प्रदूषित पाणी पोटात गेल्यास पुढील प्रकारच्या आजारांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
- पोटदुखी, जुलाब, उलट्या
- टायफॉईड, गॅस्ट्रो, जंतुसंसर्ग
- त्वचारोग व अॅलर्जी
- लहान मुलांमध्ये व वृद्धांमध्ये संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
70 ते 75 टक्के नागरिकांना पोटाच्या आजारांचा त्रास
येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाबळेश्वर परिसरातील सुमारे 70 ते 75 टक्के नागरिकांना पोटाच्या आजारांचा त्रास जाणवत आहे. दूषित पाणी, हवेत उडणारी लीदमिश्रित धूळ आणि स्वच्छतेचा अभाव ही यामागची मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पर्यावरणावरही परिणाम
वेण्णा लेक हे महाबळेश्वरचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. मात्र वाढते प्रदूषण यामुळे पाण्यातील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे. पाण्याची गुणवत्ता खालावत असून, भविष्यात याचे गंभीर पर्यावरणीय परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
स्थानिकांची ठाम मागणी
स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वेण्णा लेक परिसरातील घोडेस्वारी तात्काळ बंद करावी किंवा ती अन्य ठिकाणी हलवावी, अशी ठाम मागणी केली आहे. “पर्यटनाच्या नावाखाली महाबळेश्वरवासीयांच्या आरोग्याशी खेळ केला जाऊ नये,” असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासन पुढील गोष्टी करू शकते!
- वेण्णा लेक परिसरात घोडेस्वारीवर निर्बंध
- स्वतंत्र घोडेस्वारी क्षेत्र निश्चित करणे
- पाणी व परिसराची नियमित स्वच्छता
- आरोग्य तपासण्या व पाण्याची गुणवत्ता चाचणी
अशा उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अन्यथा पर्यटनस्थळाची ओळख असलेले वेण्णा लेक भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
“वेण्णा तलावातील पाण्यात ईकोलाय आणि क्लोरिफॉर्म बॅक्टेरियासारखे संसर्गजन्य विषाणू सापडले आहेत. मागील काही वर्षांपासून पोटासंदर्भातील रोगांमध्ये वाढ दिसत आहे,” असं 2024 साली तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी Z 24 तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.