Minister Makrand Patil- पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट; तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा – मकरंद पाटील

राज्यात पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे. हवामान विभागने दिलेल्या अंदाजानुसर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. उभं पीक आडवं झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतात पाणी गेल्याने शेतीला नदीचे स्वरुप आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील (Minister Makrand Patil) यांनी दिले आहेत. 

“राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत. 

“भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्तक रहावे. शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावा, अशा सुचना मकरंद जाधव-पाटील यांनी दिल्या आहेत.

(स्त्रोत – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य शासन)

error: Content is protected !!