छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Maratha Military Landscapes) 12 गडांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. गडांच्या संवर्धनासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या विविध संस्थांना यामुळे अधिकच बळ मिळणार आहे. मान्यता मिळाली म्हणजे काम झालं असं नाही. याचसबोत आपली सुद्धा जबाबदारी वाढली आहे. आपले गड हे मंदिरासमान आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आपलीही जबाबदारी आहे. मराठ्यांच्या या गौरवशाली ऐतिसाहिक वारशाचे संवर्धन, संरक्षण करण्यासोबतच योग्य व्यवस्थापन करणे ही राज्य आणि केंद्र सरकारसह सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे.
युनेस्कोची मान्यता मिळाल्यामुळे आता या गडांचे संवर्धन कशा पद्धतीने केले जाईल, याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ.
1. गडांचे ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या जतन
युनेस्कोची मान्यता मिळाल्यावर या गडांवर कोणताही बदल करताना आंतरराष्ट्रीय निकष पाळावे लागतात. त्यामुळे,
- तिथल्या मूळ वास्तुशैलीला धक्का न लावता दुरुस्ती केली जाईल.
- गडांवरील जुन्या भिंती, बुरुज, दरवाजे, तलाव इ. ची पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धार होईल.
- स्थानिक दगड, चुन्याचे मिश्रण आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामे केली जातील.
2. संवेदनशील परिसराचं संरक्षण
गडांच्या आसपासचा निसर्गसंपन्न परिसर म्हणजे जैवविविधतेचा खजिना आहे. म्हणूनच,
- वन्यजीव आणि स्थानिक प्रजातींचं संरक्षण केले जाईल.
- अनधिकृत बांधकामे, प्लास्टिक वापर आणि अतिक्रमण थांबवले जातील.
- गडाच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी सुविधा असतील, पण गडाच्या माथ्यावर निसर्ग व ऐतिहासिक रचना जशाच्या तशा राहतील.
3. स्थानीय लोकांच्या सहभागातून संवर्धन
- गडांच्या संवर्धनात स्थानिक ग्रामस्थांचा, स्वयंसेवी संस्थांचा, आणि अभ्यासकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.
- गडाच्या माहितीचे स्थानिक भाषांतील माहिती फलक, व्हर्च्युअल टूर, गाईड्स यांचा वापर केला जाईल.
- स्थानिकांना टूर गाईड, हस्तकला, पारंपरिक खानपान इ. माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल.
4. पर्यटन व्यवस्थापन आणि शिस्तबद्धता
- एकाचवेळी ठराविक संख्येनेच पर्यटकांना प्रवेश.
- प्लास्टिक बंदी, कचराव्यवस्थापन आणि स्वच्छता नियम सक्तीने पाळले जातील.
- गडांवरील धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना योग्य मर्यादा ठेवल्या जातील.
युनेस्कोची मान्यता म्हणजे केवळ एक शाबासकी नव्हे, तर शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याची संधी आहे. जर आपण हे गड जपले, तर पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठेवा आपण निर्माण करू शकतो. युनेस्कोच्या जागतीक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या गडांमध्ये स्वराज्याची राजधानी रायगड, किल्ले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा – आपले गड मंदिरा समान आहेत.