Nag Panchami Story in Marathi हिंदू धर्मात नागपंचमी हा सर्पदेवतेची पूजा करण्याचा पवित्र दिवस आहे. हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. तसेच नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा पूर्वापार प्रचलित आहे. या कथेनुसार नागपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असं मानलं जातं.
पुराणानुसार एकदा एक शेतकरी होता. तो प्रामाणिक पणे आपली शेती करायाचा. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. नुकताच श्रावण महिना सुरू झाला होता आणि नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी नेहमीप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला आणि नांगरणी करू लागला. यावेळी शेत नांगरताना वारूळात जी नागांची पिल्ल होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती मेली. काही वेळाने नागीण तिथं आली. मात्र तिला आपल वारूळ आणि आपली पिल्ल दिसली नाहीत. त्यामुळे ती तिच्या पिल्लांना शोधू लागली. तेव्हा तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. या शेतकऱ्याच्या नांगराने तिची पिल्लं मेल्याचे तिला समजलं.
त्यामुळे तिला प्रचंड राग आला आणि तिने शेतकऱ्याचा बदला घेण्याचे ठरवले. नागीण शेतकऱ्याच्या घरी गेली. त्याच्या मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्या सर्पदंशाने सर्वजण मेले. मात्र शेतकऱ्याची एक मुलगी जीवंत होती आणि ती परदेशात राहत होती. त्यामुळे नागीणीने परदेशी जाऊन तिला मारायचे ठरवलं. पण नागीण जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीच्या घरी पोहोचली तेव्हा ती पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढून नागाची पूजा करत होती. तिने नागाला दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. ही पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली.
शेतकऱ्याची मुलगी अगदी भाव भक्तीने आपली पूजा करत आहे. हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं आपण ठरवले, ते फार चुकीचे आहे. असा विचार करून नागीणीने सगळी घटना शेतकऱ्याच्या मुलीला सांगितले. तेव्हा मुलीला वाईट वाटले. तिने नागीणीकडे आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. अशी कथा नागपंचमीची पौराणिक कथा म्हणून प्रसिद्ध आहे.
नागपंचमी पूजा कशी करावी
१. सकाळी स्नान करून पूजा स्थळी साफसफाई करा.
२. नागदेवतेचे चित्र किंवा मूर्ती लावा (किंवा घराच्या प्रवेशद्वारावर नागाचे चित्र रेखा).
३. दूध, फुलं, अक्षता, हार, दूर्वा अर्पण करा.
४. नाग पंचमीचे व्रत कथा वाचा किंवा ऐका.
५. “ॐ नमो भगवते वासुकेशाय” किंवा “ॐ सर्पाय नमः” असा जप करा.
६. सर्पदोष निवारणाची प्रार्थना करा.
७. सांजेस पूजा झाल्यावर स्त्रियांनी ओवाळणी करून घराच्या दरवाज्यांवर नागाचे चित्र काढा