Naldurg Fort – नर-मादी धबधब्यासाठी प्रसिद्ध असणारा नळदुर्ग एकदा आवर्जून पहायला हवा

पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वावरताना मावळ्यांनी शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गड निर्माण केले. काही ठरावीक गड सोडले तर बऱ्यापैकी गडांना घनदाट झाडीने विळखा घातलेला आहे. बिबट्या, रानडुक्कर, तरस, आजगर, धामण इत्यादी हिंस्त्र प्राण्यांचा या गडांच्या परिसरामध्ये वावर आहे. परंतु याचे उलट चित्र आपल्याला मराठवाडा हद्दीत असणार्‍या गडांवर पहायला मिळते. घनदाट झाडीची या भागामध्ये कमतरता असली तरी या भागातील गड हे व्यापाराच्या दृष्टिने महत्त्वाचे होते. प्राचीन काळी युरोपसोबत भारतातून मोठ्या प्रमाणात व्यापार केला जात असे. या व्यापाराचं मुख्य केंद्र हे मराठवाडा होतं. व्यापार सुरळीत चालावा म्हणून हा मार्ग संरक्षित करण्यासाठी Naldurg Fort ची निर्मिती करण्यात आली.

प्राचीन काळामध्ये दक्षिण भारतातून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. हा व्यापारी मार्गाचे मराठवाडा हे मुख्य केंद्र होतं. त्यामुळे हा मार्ग सुरक्षित ठेवणे व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे मराठवाड्यात अनेक गडांची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने परंडा, औसा, उदगीर, रामदुर्ग आणि Naldurg Fort या गडांचा समावेश होतो. या गडावर असणारे नर-मादी धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दुर्गप्रेमी गडावर गर्दी करत असतात. या गडावर करण्यात आलेले पाण्याचे व्यवस्थापन हा एक अभ्यासाचा विषय आहे. त्या काळात कोणतीही आधुनिक साधनं उपलब्ध नसताना पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करणे हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे नळदुर्ग गडाला एकदा तरी आवर्जून भेट दिली पाहिजे.

Naldurg Fort आणि इतिहास

पौराणिक काळातील नळ आणि दमयंतीशी नळदुर्ग गडाचा इतिहास जोडला जातो. मात्र गडाचे बांधकाम कोणी केले याबद्दल ठोस माहिती उपलब्ध होत नाही. इ.स 1606 मध्ये प्रसिद्ध झालेल्या तारीख-इ-फिरिश्ता या ग्रंथांमध्ये हा गड ‘नळ’ या राजाने बांधल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नळ राजाच्या नाववरून गडाचे नाव नळदुर्ग झाले असावे. नळदुर्ग गडावर अनेक राजसत्तांनी आपले वर्चस्व निर्माण करत सत्ता उपभोगली. या राजसत्तांमध्ये प्रामुख्याने बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, निजाम, मराठे आणि सर्वात शेवटी इंग्रजांचा समावेश आहे. बदामी चालुक्यांच्या काळात नळदुर्गाचा उल्लेख ‘नलवाडी विषय’ असा करण्यात आला होता. तर, आदिलशाही राजवटीमध्ये गडाचे नाव ‘शाहदुर्ग’ असे करण्यात आले होते.

नळदुर्ग गडाविषयी अनेक इतिहासकारांनी अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे. विविध ऐतिहासिक ग्रंथांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, नळदुर्ग गडाचे अगदी सुरुवातीचे बांधकाम चौदाव्या शतकात बहामनी सुलतानांच्या काळात करण्यात आले होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे गडाचे बांधकाम करताना गडाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. कारण बहामनी काळात मातीच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर अलाउद्दीन बहमनी द्वितीय आणि मुहम्मदशाह बहमनी तृतीय यांच्या काळामध्ये नळदुर्ग गडाचा उल्लेख आढळून येतो. मुहम्मदशाह बहमनी तृतीयच्या काळात महमूदन गवानने साम्राज्याचे आठ प्रांत पाडले होते. त्यानंतर त्याने नळदुर्ग दस्तूर दिनारकडे सोपविला होता.

नळदुर्ग हा आदिलशाही व निजामशाही यांच्या सीमेवर होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आदिलशाहीने गड ताब्यात असताना गडावर अतिरिक्त बांधकाम करत गडाची सुरक्षा वाढवण्याला प्राधान्य दिले होते. त्यानंतरच्या काळात गडावरील हालचालींना वेग आल्याचे पहायला मिळते. आदिलशाही व कुतुबाशाहीमध्ये शांतता नांदावी या हेतून इब्राहिम आदिलशाह व गोवाळकोंड्याचा मुहम्मद कुली कुतुबशाहाची बहीण मलिका जहान यांचा विवाहसोहळा नळदुर्ग गडावर मोठ्या थाटमाटात पार पडला होता. नळदुर्ग गडावर विजापूरच्या आदिलशाहीने जवळपास 1559 पासून ते 1676 पर्यंत एकहाती राज्य केले. त्यामुळे नळदुर्ग आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आदिलशाहीने आपले हातपाय चांगल्या पद्धतीने पसरले होते. एक प्रकारे आपले वर्चस्व निर्माण करण्यात त्यांना यश आले होते.

विजापूरच्या आदिलशाहीला 1676 साली मुघलांनी दणका दिला. त्यांची एकहाती सत्ता उलथून लावली आणि गड जिंकून घेतला. जेव्हा मुघलांनी गड जिंकून घेतला, तेव्हा गड पाहून औरंगजेबाला सुद्धा सुखद धक्का बसला होता. नळदुर्ग किल्ला हा दक्षिणेतील उत्कृष्ट गडांपैकी एक गड असल्याचे उद्गार त्याने काढले होते. 1676 ते 1724 या कालखंडामध्ये नळदुर्गावर मुघलांची सत्ता होती. मात्र त्यांच्या या सत्तेला मीर कमरुद्दीन याने सुरुंग लावला आणि सत्ता उलथून लावली. 1724 साली मीर कमरुद्दीने उर्फ ‘निजाम-उल्-मुल्क’ याने 1724 साली दक्षिणेमध्ये आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली. त्यामुळे नळदुर्ग आपोपआप निजामाच्या ताब्यात गेला.

आदिलशाही, मुघल आणि निजामशाही नंतर मराठ्यांनी नळदुर्गच्या दिशेने आपली मोहिम आखली आणि 1758 साली पेशव्यांनी सिंदखेडच्या तहात नळदुर्ग जिंकून घेतला. त्यानंतर बरेच वर्ष पेशव्यांचे गडावर वर्चस्व होते. त्या काळात इंग्रजांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. 1853 साली East India Company आणि निजाम यांच्यात एक तह झाला. या तहानुसार वऱ्हाड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना तोडून देण्यात आले. निजाम इंग्राजांना प्रत्यक्षरित्या पाठिंबा देत होता. जेव्हा 1857 चा प्रसिद्ध उठाव झाला, तेव्हा सुद्धा निजामाने इंग्रजांना पाठिंबा दिला होता. इंग्रजांची हुजेरेगिरी केल्यामुळे नळदुर्ग आणि रायचूर हे जिल्हे निजामास परत देण्यात आल होते.

इ.स 1818 साली महाराष्ट्रातील अनेक गड इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेत गडांची नासधूस केली होती. मात्र, नळदुर्ग गडाला याचा फटका बसला नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला परंतु गड अजूनही निजामाच्या ताब्यात होता. त्यामुळे 1948 साली भारत सरकराने निजामाविरुद्ध लष्करी बळाचा वापर करत नळदुर्ग या गडासह मराठवाडा भारतात समाविष्ट करून घेतला.

नळदुर्ग गडाची सध्याची अवस्था

नळदुर्ग किल्ला हा मध्ययुगीन दुर्गस्थापत्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये शासनाच्या माध्यामातून गडावर चांगल्या पद्धतीने काम करत गडाची देखरेख ठेवली आहे. त्यामुळे गड सुस्थितीत असून मोठ्या संख्येने पर्यटक गडाला भेट देण्यासाठी येत असतात. गडावर पर्यटकांना फिरण्यासाठी इलेक्ट्रीक गाडीची सोय करण्यात आली आहे. तसचे धरणाच्या जलाशयात बोटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात असणाऱ्या या गडाला एकदा आवर्जून भेट द्याच.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

महाराष्ट्रातील इतर गडांच्या तुलनेत नळदुर्ग गडाची व्यवस्था उत्तमरित्या करण्यात आली आहे. त्यामुळे गडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. गडावर प्रवेश करताना दोन उंच बुरूज लक्ष वेधून घेतात. दोन बुरुजांच्या मधून गडामध्ये गेल्यानंतर नागमोडी वळणाचा रस्ता तुम्हाला गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी घेऊन जाईल. गडावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू आहेत. जसे की पाणी महाल, नौबुरुज (नऊ), उपळी बुरूज, जामा मशीद, बारादरी, अंबरखाना, रंग महारन, हुलमुख दरवाजा, हमामखाना इ. प्रमुख वास्तू आपल्याला गडावर पाहता येतात.

नळदुर्ग गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाला तिन्ही बाजूंनी बोरी नैदीचे नैसर्गिक कवच लाभले आहे. तसेच गडाची तटबंदी अतिशय मजबूत स्वरुपाची असून त्यात अनेक बुरूज उभारण्यात आले आहेत. स्थापत्यशास्त्राच उत्तम नमुना पाहण्यासाठी तुम्हाला दक्षिण तटबंदीवर असणाऱ्या नौबुरुजावर जावं लागले. ही एक दोन मजली इमारत असून नौबुरुज या नावने ओळखली जाते. या बुरुजाचा व्यास 108 फूट उंच आण त्याचा व्यास जवळपास 40 फूटांच्या आसपास आहे.

 

न्यायनिवाडा करण्यासाठी गडावर निजाम कोर्ट किंवा मुन्सिफ कोर्ट सुद्धा आहे. तसेच राणीमहालाच्या बाजूला ‘बारादरी’ या वास्तुतून बोरी नदीचे देखणे सौंदर्य पाहता येते. नळदुर्गावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे उपळ्या किंवा उपळी या नावाचे बुरूज होय. याची उंची 150 फूट उंच व व्यास 64 फूट इतका आहे. या बुरुजाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या मधोमध असणाऱ्या या बुरुजातून गडाच्या चारही प्रवेशद्वारांवर नजर ठेवता येते. तसेच बुरुजावर तीन तोफा ठेवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून बुरुजावर जाण्यासाठी 77 पायऱ्या चढाव्या लागतात.

नर-मादी धबधबा

 

नळदुर्ग गडाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी महाल होय. बोर नदीवर उभारण्यात आलेली ही वास्तु मध्ययुगीन दुर्गस्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहे. इब्राहीम आदिलशाह (दुसरा) याच्या काळात मीर मुहमद इमादीन या वास्तुशास्त्रज्ञाने या वास्तूचा आराखडा तयार केल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी नर व मादी हे कृत्रिम धबधबे आहेत. पावसाळी वातवरणामध्ये हे प्रवाहीत झालेले धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. ऐतिहासिक ग्रंथांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार पाणी महाल ही वास्तू 1613 साली बांधण्यात आली आहे.

गडावर जायचे कसे

 

धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यामध्ये नळदुर्ग आहे. गडावर जाण्यासाठी तुम्हाला तुळजापूर तालुक्यामध्ये यावं लागणार आहे. तिथून एसटी महामंडळाच्या बसने तुम्ही गडाच्या दिशेने जाऊ शकता.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment