Ratangad Fort – आता मी मरणार… भर जंगलात एक दोन नव्हे तर तीन वेळा वाट चुकलो, बिबट्याचा सहवास; आम्ही अनुभवलेला थरारक रतनगड

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर

Ratangad Fort कळसूबाई डोंगररांगेत आणि प्रवरा नदीच्या उगमस्थानावर अगदी थाटात उभा असलेला गिरीदूर्ग. मधल्या काळात कारवीचा बहर आल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गप्रेमी, सह्याद्रीप्रेमी दरवर्षी रतनगडाला भेट देत असतात. त्यात आम्ही सुद्धा नंबर लावला आणि आमचा सात जणांचा ग्रुप मुंबईहून रतनगडाच्या दिशेने मार्गस्थ झाला. सह्याद्री जितका देखणा आहे तितकाच रौद्र आहे, याचा अनुभव आम्हाला या संपूर्ण प्रवासात आला. वेगावर स्वार होणारा ड्रायव्हर, गडावर जाताना एक नव्हे तर तीन वेळा वाट चुकलो, बिबट्याचा सहवास लाभला आणि एक रोमांचकारी आणि थरकाप उडवणार आमचा ट्रेक संध्याकाळच्या सुमारास समाप्त झाला. चला आमच्या या रोमांचकारी ट्रेकसोबत गडाची सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊ.

जीव मुठीत घेऊन प्रवासाला सुरुवात

नवीन वर्षाची (2025) दणक्यात सुरुवात करायची या हेतूने डिसेंबर 2024 मध्ये आम्ही रतनगडावर जायचं नियोजन केलं. जमवाजमव झाली आणि सात जण येण्यास तयार झाले. गाडी बुक करण्यात आली आणि कल्याणहून रात्री 12 च्या दरम्यान माळशेज घाटातून आमचा प्रवास रतनगडाच्या दिशेने सुरू झाला. रात्रभर गाडीत आराम करायचा आणि पहाटे पहाटे गडावर जाण्यासाठी निघायचं नियोजन केलं. परंतु आम्ही ज्या गाडीतून प्रवास करत होतो, त्या गाडीचा चालक भलताच वेगावर स्वार झाला होता. तरकारी चालवणारा हा पठ्ठ्या अर्टिगा सुद्धा तशीच आणि त्याच वेगात चालवत होता. बहुदा गाडीत माणसं नसून माल असावा, असा त्याचा समज झाला असावा. त्यामुळे अक्षरश: जीव मुठीत घेऊनच आम्ही सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान रतनगडाच्या पायथ्याला असलेल्या रतनवाडी गावात पोहोचलो.

रतनवाडी गावातून प्रस्थान

रतनवाडी हे रतनगडाच्या पायथ्याला असलेलं गाव आहे. या गावात अमृतेश्वराच महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच बांधकाम पाहण्यासारखं आहे. साधारण 1200 वर्षांपूर्वी यादवांनी हे मंदिर बांधल्याची नोंद इतिहासात सापडते. त्याचबरोबर पेशवे काळातही या मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. अगदी पहाटेच गडाखाली पोहोचल्यामुळे मंदिरात दर्शन घेतलं, नाष्टा केला आणि गडाच्या दिशेने अगदी जोशात आम्ही मार्गस्थ झालो. गडावर जाणारी वाट गावातूनच गेली आहे. परंतु गावातून थोडं पुढे गेल्यानंतर अनेक वाटा फुटलेल्या आहेत. त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता आहे. आमचंही तेच झालं आणि आम्ही चुकीच्या वाटेने गडावर निघालो. बराच वेळ चाललो, एका डोंगराहून दुसऱ्या डोंगरावर गेलो पण वाट संपत नव्हती आणि गड काही जवळ येत नव्हता. वाटा निर्माण करत म्हसरांड तोडतं आम्ही एका जागी येऊन थांबलो. आता समोर रतनगड दिसत होता परंतु तिथे जायच कसं हे काही समजत नव्हतं.

ड्रोनने आधार दिला

आमच्या ग्रुपमध्ये एकजण ड्रोन स्पेशलिस्ट होता. त्यामुळे वाट चुकल्यानंतर आम्ही ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि ड्रोन आकाशात झेपावला. ड्रोनने आम्ही वाट शोधली खरी पण ती सुद्धा थोडी चुकीचीच निघाली. ड्रोनच्या मदतीने शोधलेल्या वाटेने पुन्हा प्रवास सुरू झाला. काही अंतर पुढे गेल्यानंतर वाट निर्माण करून गडावर जाण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. मी आणि माझा मित्र आम्हाला थोडाफार अनुभव असल्यामुळे गडावर आम्ही जाणार याची आम्हाला खात्री होती. परंतु सोबत दोन मुली होत्या. एक माझी बहिण आणि दुसरी तिची मैत्रिण. तिच्या मैत्रिणीचा आमच्यासोबतचा हा पहिलाच ट्रेक होता. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही वाट निर्माण करून गडावर जाण्याचा निर्णय घेतला.

आता मी मरणार…

ज्या वाटेने आम्ही गडावर जाण्याचा निर्णय घेतला होता. खरतर ती वाट नव्हतीच. परंतु आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आमचा एक खडतर प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला आणि अगदीच खडा डोंगर चढून आम्ही एका टप्प्यावर आलो. तिथून आम्हाला गडावर जाण्याची वाट दिसली. लोखंडी रॉडची रेलिंग दिसली आणि आमच्या जीवात जीव आला. परंतु संघर्ष अजून संपला नव्हता. आम्हाला जिथून ती लोखंडी रेलिंग दिसली तिथून त्या रेलिंगपर्यंत अंतर फक्त 50 मीटरच्या दरम्यान असेल. परंतु हे 50 मीटरच अंतर निसरड आणि थोडं धोकादायक होतं. पाय ठेवायला धड जागा नव्हती आणि पाय ठेवला तर पाय सटकत होता. त्यामुळे हा टप्पा आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात अवघड टप्पा होता. आमच्या ग्रुपमधील काही जण खूपच घाबरले होते कारण परिस्थिती तशीच होती. मी, माझी बहिण आणि आणखी दोघं आम्हाला सवय असल्यामुळे आम्ही मुख्य पायवाटेवर कसेबसे पोहोचलो. पण अन्य तिघांचे मात्र चांगलेच हाल झाले. त्यात माझ्या बहिणीची मैत्रीण पूर्णपणे घाबरली होती. “मी आता मरणार…” हे वाक्य जवळपास दोन ते तीन वेळा ती बोलली. पण तस काही झालं नाही आणि आम्ही सर्वजण सुखरूप मोठी कसरत करून मुख्य पायवाटेवर आलो. आतापर्यंतचा या प्रवासात सह्याद्रीने आम्हाला खूप काही शिकवलं कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची आमच्या क्षमतेची जणू सह्याद्रीने परीक्षाच घेतली.

गडाच्या दिशेने प्रवास सुरू

मुख्य पायवाटेवर आल्यानंतर एका जागेवर थांबून आम्ही क्षणभर विश्रांती घेतली. त्यानंतर चांगल्या मळलेल्या वाटेने आम्ही गडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. रतनगड व खुट्टा सुळका यांच्या मधून जाणाऱ्या वाटेने आम्ही गडावर जात होतो. या वाटेने जाताना उजव्या बाजूला खोल दरी आणि डाव्या बाजूला 90 अंशात सरळ उभा असलेला कडा होता. थंडगार वारा अनुभवत आम्ही 50 ते 60 कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी वर चढलो आणि अखेर चार तासांनी गडावर पोहोचलो. साधारणपणे गडावर जाण्यासाठी गडाच्या पायथ्याहून दोन तास लागतात परंतु वाट चुकल्यामुळे आम्हाला चार तास लागले.

नेढ्यामध्ये घेतली विश्रांती

गडावर पोहोचल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला. गड पाहत पाहत आम्ही गडाचं मुख्य आकर्षण असलेल्या नेढ्यामध्ये पोहोचलो. निसर्गाचा चमत्कार असणाऱ्या या नेढ्यामध्ये थंडगार हवेचा मारा आम्ही हसत हसत अंगावर घेतला आणि सर्वजण निवांत आडवे झालो. या ठिकाणी एक काका लिंबू सरबत विकत होते. आम्हाला सुद्धा प्रचंड तहान लागली होती. त्यामुळे सर्वच लिंबू सरबतावर तुटून पडलो आणि जवळपास 10 ते 15 ग्लास लिंबू सरबत प्यायलो. 30 ते 45 मिनिटांची विश्रांती घेतल्यानंतर आता मात्र योग्य मार्गाने गडावरून खाली उतरण्याच आम्ही निर्णय घेतला. आता तुम्हाला वाटलं असेल की गड पाहून आम्ही निवांत गडाखाली पोहोचलो असेल, तर तसं अजिबात नाही. संघर्ष अजून बाकी होता.

परतीचा प्रवास आणि पुन्हा एकदा रस्ता भरकटलो

गड न्याहाळात आम्ही आता योग्य मार्गाने गडावरून खाली उतरणार होतो. त्यामुळे आता कोणालाही टेंशन नव्हतं. सर्वजण गड पाहत होते, फोटो काढत होते. सर्व काही सुरळीत सुरू होतं. आम्ही ज्या वाटेने गडावरून उतरणार होतो. त्याच वाटेवरून गडावर येताना पहिला दरवाजा लागतो या दरवाजावर गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गडावर भग्नावस्थेत असलेले गोल बुरूज, पाण्याची दोन ते तीन टाकी, काही इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. गड उतरताना आमच्यातले दोन अतिउत्साही सदस्य दोघेच आमच्या पुढे गेले. शिडी उतरून आम्ही खाली आलो आणि आता थोडं चालल्यानंतर आम्हाला डाव्या बाजूने रतनवाडीच्या दिशेने जायंत होतं. परंतु आमच्या अतिउत्साही सदस्यांनी रतनवाडीच्या दिशेने न जाता थेट उजव्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला आणि हे दोघेही हरिश्चंद्रगडाच्या दिशेने चालायला लागले. त्यांना वाटलं की आपण आता लवकर गडाखाली पोहोचणार पण ते चुकीच्या वाटेने जात होते. आम्ही मात्र त्यांच्या मागून योग्य मार्गाने अर्धा गड खाली उतरला. आमच्या पुढे गेलेले दोन सदस्य कुठेही दिसत नसल्यामुळे आम्हाला थोडी शंका आली की हे वाट चुकले असावे. त्यांना फोन केला असता आम्ही योग्य मार्गाने जात असल्याच त्यांनी सांगितलं. साधारण 5 च्या दरम्यान आम्ही जवळपास 90 टक्के गड उतरलो आणि काहीच अंतरावर आम्हाला रतनवाडी दिसत होती.

आमच्या पुढे गेलेल्या सदस्यांना फोन केला असता ते वाट चुकल्याच आम्हाला समजलं आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली. कारण अंधार पडायला अवघा एक तास बाकी होता. संपूर्ण परिसर आमच्यासाठी नवीन होता. त्यात मोबाईलला रेंज नव्हती. आता करायचा काय? असा प्रश्न पडला. संपूर्ण जंगलात बेंबीच्या देठापासून आम्ही त्यांना आवाज देत होतो, पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत काही पोहोचत नव्हता. वाट चुकल्याच त्यांना समजताच ते सुद्धा ज्या वाटेने खाली गेले होते, त्याच वाटेने पुन्हा वरती आले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. आवाज देऊन देऊन आमचा घसा कोरडा झाला होता. जवळपास एक तासांनी त्यांचा आवाज आम्हाला जंगलातून आला आणि आमचा जीव भांड्यात पडला. नंतर आमच्या आवाजाच्या दिशेने ते खाली आले आणि संध्याकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान त्यांची भेट झाली.

नर आणि मादी बिबट्याच सहवास

चुकलेल्या सदस्यांची भेट झाल्यानंतर जराही न थांबता आम्ही गावाच्या दिशेने निघालो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. मोबाईलच्या टॉर्चवर आम्ही गावाच्या दिशेने भराभरा पावलं टाकत निघालो आणि पुन्हा एकदा वाट चुकलो. मुख्य वाटेने जायच सोडून अंधार पडल्यामुळे आम्ही नदीत उतरलो. नदीत उतरल्यानंतर दोनवेळा फटाकड्यांचे बार उडाले. आम्हाला तेव्हा काहीच वाटलं नाही. कोणाचातरी वाढदिवस असा म्हणून फटाके फोडत असतील असा आम्ही समज केला आणि मुख्य वाटेने चालू लागलो. गाव दिसलं आणि गावात माणसांचा आरओरडा जाणवू लागला. एका घरापाशी पोहोचला असता माणसांनी आम्हाला थांबायला सांगितल कारण आत्ताच नर आणि मादी बिबट्या याच वाटेने पुढे गेल्याच ते म्हणाले. त्या क्षणाला आम्ही खूप घाबरलो. काही वेळ आम्हाला थांबायला सांगितल आणि शेवटी गावातील काही नागरिकांच्या मदतीने आम्ही आमच्या गाडीपाशी पोहोचलो. जेव्हा फटाकडे वाजले होते तेव्हा अंधार पडला होता आणि आम्ही तेव्हा नदीमध्ये होतो. आम्हाला गाडीजवळ आल्यानंतर समजलं की बिबट्यांना घाबरवण्यासाठी फटाकडे फोडण्यात आले होते.

अशा पद्धतीने आम्ही 2024 या वर्षाचा रोमांचकारी शेवट केला. या प्रवासात आम्ही बऱ्याच वेळा चुकलो परंतु त्यातून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकलो सुद्धा.