Know Your Rights
ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत घातल्याचे अनेक व्हिडीओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा पोलिसांच्या माध्यमातून लाच घेतल्याची प्रकरण सुद्धा उघड झाली आहेत. पोलिसांवर हात उघारल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. रागाच्या भरात आपण एक चुकीचा निर्णय घेतो आणि आयुष्यभरासाठी त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला सुद्धा माहिती असणं गरजेच आहे. जसे की, वाहतुक पोलिसांनी थांबवलं किंवा पकडलं तर काय करायचं आणि कोणत्या अधिकाऱ्यांना तुमचं लायसन्स वगैरे तपासण्याचा अधिकार आहे.
ट्रॅफिक पोलिसाने पकडलं तर काय करावं?
1. शांत रहा आणि त्यांना सहकार्य करा
- घाबरू नका किंवा वाद घालू नका.
- ट्रॅफिक पोलिसाने थांबवलं तर गाडी योग्य ठिकाणी बाजूला लावा.
- पोलिंसाच्या बोलण्याचं शांतपणे उत्तर द्या.
2. योग्य कागदपत्रं दाखवा
ट्रॅफिक पोलिस तुमच्याकडे पुढील कागदपत्रं मागू शकतो:
- ड्रायविंग लायसन्स (DL)
- वाहनाचे आरसी बुक (RC)
- विमा (Insurance)
- प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC)
हे कागदपत्रं मोबाईलमधून DigiLocker किंवा mParivahan App वरून दाखवणं वैध आहे.
3. चलान दिल्यास पावती घ्यायला विसरू नका
- नियमभंग झाल्यास ट्रॅफिक पोलिस दंड (Fine) आकारू शकतात.
- दंड घेतल्यास त्याची पावती/ई-चलान मिळवणं अनिवार्य आहे.
- कधीही रोखीने पैसे देताना अधिकृत पावती घ्या.
4. तुमचं वाहन जप्त करू शकतात का?
- काही गंभीर नियमभंग (जसे की – मद्यपान करून गाडी चालवणे, अपघात, बीमा/RC नसणे इ.) केल्यास पोलीस गाडी ताब्यात घेऊ शकतात.
- पण हे फक्त अधिकृत अधिकार्यांच्या आदेशानुसारच होऊ शकतं.
कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला काय अधिकार आहेत?
1. ट्रॅफिक पोलिस (Traffic Police Constable)
- वाहतूक नियमांचे उल्लंघन असल्यास थांबवू शकतात.
- पण केवळ पोलीस आयकार्ड असलेला ट्रॅफिक पोलीस तुमचं लायसन्स तपासू शकतो.
- रसीदशिवाय रोख दंड घेण्याचा त्यांना अधिकार नाही.
2. सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) किंवा पोलिस निरीक्षक (PI)
- मोठ्या गुन्ह्यांमध्ये तपास करू शकतात.
- वाहने जप्त करणे, कोर्टात हजर करणे यांचे अधिकार.
3. RTO अधिकारी
- वाहनाच्या कागदपत्रांची सखोल तपासणी करू शकतात.
- वाहन चालवण्याची पात्रता तपासू शकतात.
- त्यांना वाहन जप्त करण्याचा अधिकार आहे.
कोणत्या गोष्टी करू नये?
खोटं लायसन्स किंवा बनावट कागदपत्र दाखवू नका.
पोलिंसाशी हुज्जत घालू नका.
लाच देऊ नका किंवा घेऊ नका.
व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्यास पोलिसांना प्रथम सांगूनच करा.
उपयोगी सल्ला
- तुमच्याकडे कायम मोबाइलमध्ये DigiLocker/MParivahan App असू द्या.
- कोणत्याही प्रकारचा दंड भरताना त्याची अधिकृत पावती जरूर घ्या.
- जर एखादा ट्रॅफिक पोलिस नियम तोडत असेल तर त्याचं नाव व आयडी क्रमांक लिहून ठेवा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा.
काही बेसीक गोष्टींचा पालन केल्यास आणि आपल्याला कोणते अधिकार आहेत, याची माहिती असल्यास आपला वेळही वाचतो आणि पोलिसांनी हुज्जत घालण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.