Markandeya Fort – नाशिकचा मार्कंड्या, का पडलं गडाला असं नाव? वाचा सविस्तर…

मुंबई ठाणेमधून गडांवर जाणाऱ्या दुर्गवेड्या भटक्यांची संख्या मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये छोट्यामोठ्या गडांची संख्या जास्त आहे. तरीसुद्धा बऱ्याच गडांबद्दल आपल्याला माहिती नाही. गड कितीही छोटा असला तरी त्याला छोटा का होईना इतिहास असतोच. अशाच एका नाशिक जिल्ह्यातील अपरिचित गडाचा इतिहास आपण पाहणार आहोत. चल तर म सफर करू नाशिकच्या मार्कंड्या गडाची (Markandeya Fort).

सातमाळा अजिंठा डोंगर रागांच्या हद्दीत अनेक छोटे मोठे गड आपल्याला पहायला मिळतात. नाशिक जिल्ह्यातील सप्तऋृंगी गडासमोर असणाऱ्या डोंगरावर मार्कंड्या गडाचे आपल्याला दर्शन होते. मार्कंड्या गडाचा उल्लेख मार्कंडा, मार्कंड्या किंवा मार्कंडेय अशा विविध नावांनी केला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल या गडाला मार्कंडा असे नाव का पडले? तर, त्यासाठी तुम्हाला गडाचा इतिहास वाचावा लागले.

मार्कंडा आणि इतिहास

धूर्त औरंगजेबाचा मुख्य हेतू स्वराज्यावर कब्जा करणे हा होता. त्या अनुषंगाने त्याने स्वराज्यातील छोट्या गडांवर आपला ताबा मिळवला होता. या गडांमध्ये मार्कंड्या गडाचा सुद्धा समावेश होता. शहाजाहनाच्या काळात दक्षिणसुभ्याची जबाबदारी औरंगजेबावर सोपवण्यात आली होती. सत्तेचा विस्तार करण्यासाठी औरंगजेबाने नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिंकून घेण्याचा हुकूम अलिवर्दीखानाला दिला होता. मालकाचा आदेश पाळून चेल्याने गडावर हल्ला करत इ.स 1639 साली मार्कंडा गड जिंकून घेतला. अलिवर्दीखानाच्या कपट वृत्तीचा इंद्राई गडावर असणार्‍या फारशी शिलालेखात उल्लेख करण्यात आलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्या काळात वणी-दिंडोरीची लढाई झाली आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा भगवा फडकवला. या गडांमध्ये मार्कंड्या गडाचा सुद्धा समावेश होता. म्हणजेच मावळ्यांच्या पदस्पर्शाने हा गड पावन झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 साली निधन झाले. त्यानंतर संधी साधत कपटी मुघलांनी मार्कंड्या गड जिंकून घेतला.

मार्कंडा हे नावं का पडले ?

मार्कंड्या गडाबद्दल अनेक रोचक कथा सांगितल्या जातात. परंतु गडाच्या नावाबद्दल प्रचलित असणारी कथा म्हणजे सप्तश्रृंगीगड व रावळ्याजावळ्या या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरतन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. मार्कंडेय ऋषींच्या वास्तव्यामुळे या डोंगराला मार्कंड्या या नावाने ओळखले जाऊ लागले. काळानुरूप त्याच नावाने मार्कंड्या गड सुद्धा ओळखला जातो.

गडावर पाहण्यासारखे काय आहे

मार्कंड्या गडावर जाताना मुलनबारी या नावाने प्रचलित असणारी एक खिंड लागते. मार्कंड्या व रवळ्या-जावळ्या या किल्ल्याच्यामध्ये मुलनबारी नावाची खिंड आहे. याच खिंडीतून मार्कंड्या गडावर जाण्याचा मार्ग सुरू होत. ही खिंड पार पडल्यावर आपण गडाच्या माचीवर येतो. याच माचीवरून बालेकिल्याच्या दिशेने दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. याच वाटेने पुढे गेल्यानंतर डावीकडे कातळकडा आपलं लक्ष वेधून घेतो. याच कातळात दोन गुहा कौशल्यपूर्ण पद्धतीने कोरलेल्या आहेत. गुहांची रचना पाहता ध्यान करण्यासाठी गुहांची निर्मित्ती करण्यात आलेली असावी. त्यामुळे या गुहांना ‘ध्यान गुंफा’ असे म्हणतात.

गुहा बघून झाल्यानंतर याच मार्गे वर चढून गेल्यानंतर उजव्या बाजूला बुरूज आणि डाव्या बाजूला तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. पायऱ्यांच्या या मार्गावर तुम्हाला गुफा आणि बुरूज आणि तटबंदी पाहता येते. पायऱ्यांचा मार्ग संपल्यानंतर समोरच सप्तश्रृंगी गडाचे दर्शन होते. गडाचे दर्शन घेऊन बालेकिल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. बालेकिल्ल्यावर जाताना कमंडलू तीर्थ नावाचं एक पाण्याचं टाक नजरेस पडेल. या टाक्यामध्ये बारमाही पिण्याचे पाणी असते. पहिला टप्पा पार केल्यानंत दुसऱ्या टप्प्यावर तुम्हाला एकाच रांगेत तीन पाण्याची टाकी दिसतील. हे सर्व टप्पे पार केल्यानंतर आपण गडावर पोहोचतो.

गडावर पोहचल्यानंतर मार्कंडेश्वराचे मंदिर नजरेस पडते. मंदिरामध्ये मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर गडावर चढताना आलेला सर्व थकवा एका क्षणात नाहीसा होतो. मंदिरात क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर गडाच्या आजूबाजूच्या परिसर न्याहाळून घ्यावा. गडावरून तुम्हाला सप्तश्ऱंगी गड, रावळ्या जावळ्या आणि धोडप या गडांचे दर्शन होते.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी तुम्हाला नाशिक-सापूतारा रस्त्यावर असणारे वणी गाव गाठावे लागणार आहे. नाशिक ते वणी हे साधारण 40 किमी अंतर आहे. वणी गावात आल्यानंतर या गावापासून 9 किमी अंतरावर बाबापूर नावाचे गाव आहे. मार्कंड्या गडावर जाण्यासाठी बाबापूर हे मुख्य गडाच्या पायथ्याशी असणारे गाव आहे.

गडावर राहण्याची जेवणाची सोय आहे का

गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय गडावर होऊ शकते. मात्र, गडावर राहण्याची आणि जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे गडावर येताना जेवणाची सोय आपली आपणच करावी.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment