Leopard Attack – नातवासाठी बिबट्याला भिडल्या 75 वर्षांच्या आजीबाई; थरार जीवन आणि मरणाचा

पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांसह सह्याद्रीच्या पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचे (Leopard Attack) अनेक व्हिडीओ आणि घटना दररोज समोर येत आहेत. बऱ्याच घटना या बिबट्याने प्राण्यांचा फडशा पाडल्याच्या किंवा माणसांवर हल्ला केल्याच्या असतात. परंतु काही घटनांमध्ये बिबट्यालाच पाणी पाजल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. अशीच घटना नाशिकमध्ये घडली असून एक 75 वर्षांच्या आजीबाईंनी नातवाला वाचवण्यासाठी बिबट्याला टक्कर दिली आहे. आजीने केलेल्या जोरदार प्रतिकारामुळे नातवाचा जीव वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील खडांगळी गावात ही घटना घडली आहे. रविवारी (7 सप्टेंबर 2025) सकाळच्या सुमारास संपत बोस हा 6 वर्षांचा चिमुकला खडांगळी-पंचाळे शिव रस्त्यावर निमगाव-देवपूर शिवारात एका भावाकडे खेळण्यासाठी गेला होता. खेळून झाल्यावर त्याची आजी लंकाबाई पंढरीनाथ बोस (75) त्याला घेऊन घरी परतत होत्या. याच दरम्यान सोयाबीनच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर अचानक झडप मारली. त्यामुळे मुलासह आजी चांगल्याच घाबरल्या परंतु त्यांनी तिथून पळ न काढता बिबट्याला सर्व जोरदार प्रितकार केला आणि बिबट्याला पिटाळून लावलं. त्यानंतर आरडाओरडा केल्यावर स्थानिकांनी घटनास्थली धाव घेतली तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता. या हल्ल्यात मुलाला नखे लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मटाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.