सोमवारी (22 सप्टेंबर 2025) नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांसह सर्वांचीच सध्या लगबग सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व देवींची मंदिरे भक्तांनी फुलून निघणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठ आहेत. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. परंतु वेळ आणि पैशांची गणित जुळवताना सामान्यांची तारांबळ उडते. यासाठीच आता एसटी महामंडळाने भक्तांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत 27 सप्टेंबरपासून एसटीच्या माध्यमातून देवीच्या साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन घेता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागातून विशेष बस सोडण्यात येणार आहेत. 27 सप्टेंबरपासून ही सेवा भक्तांसाठी सुरू होईल. पुण्यातील शिवाजीनगर आगारातून सकाळी 7 वाजता बस सुटणार आहेत. अधिक माहिती तुम्हाला संबंधित आगारात गेल्यानंतर मिळेल. चला आता थोडक्यात माहिती घेऊन भाडं किती असेल, प्रवास कसा असेल, मुक्काम कुठे असणार? हे जाणून घेऊ.
कसा असेल प्रवास ?
पुण्यातील शिवाजीनगर आगारातून 27 सप्टेंबरला सकाळी सात वाजता बस देवीच्या दर्शनासाठी मार्गस्थ होईल. पहिल्या दिवशी कोल्हापूर येथे महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मुक्काम हा तुळजापूरला असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माहूर (रेणुका देवी) दर्शन आणि त्याच ठिकाणी मुक्काम असेल. तर तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने धावेल.
एसटीचे भाडे किती?
या तीन दिवसांच्या प्रवासामध्ये पुरुषांना 3101 रुपये आणि महिलांना 1549 रुपये मोजावेल लागतील. त्याचबरोबर महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत दिली जाईल.
(टीप – प्रवास भाड्यात फक्त बस प्रवासाचा समावेश आहे. मंदिरांमधील दर्शन, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था प्रवशांना स्वत: करावी लागणार आहे.)
बुकींग कुठे करायची ?
आपली जागा आरक्षित करण्यासाठी एसटीच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करता येईल. गट बुकिंग असेल तर विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची थोडक्यात माहिती
1. कोल्हापूर – महालक्ष्मी देवी
येथे महालक्ष्मी देवीची पूजा होते. मंदिर शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असून देवीला ‘अंबाबाई’ म्हणतात. हे एक शक्तिपीठ मानले जाते. देवी श्रीविष्णूच्या अर्धांगिनी स्वरूपातील लक्ष्मी मानली जाते.
२. तुळजापूर – तुळजाभवानी
देवी तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदैवत मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही येथे पूजा केली होती. ती दुर्गामातेचे रूप मानली जाते.
३. माहूर – रेणुका देवी
रेणुका मातेला परशुरामाची माता मानले जाते. येथे प्राचीन मंदिर असून देवीच्या शक्तिपीठ स्वरूपात पूजा होते.
¾ शक्तिपीठ – सप्तशृंगी देवी
सप्तशृंगी देवी डोंगरावर वसलेली असून दुर्गेचे रूप मानले जाते. ‘साडेतीन शक्तिपीठां’मध्ये अर्धे पीठ म्हणून गणले जाते.