Nick Vujicic Biography
भारतासह जगभरात तरुण मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अभ्यास, करिअर, जॉब, ब्रेकअप, समाजाच्या अपेक्षा इत्यादी गोष्टींमुळे नैराश्यात जाणाऱ्या तरुणांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढली आहे. नैराश्यातून सावरू न शकल्यामुळे आत्महत्ये सारख्या चुकीच्या मार्गाचा तरुणांकडून अवलंब केला जात आहे. शाळकरी मुले सुद्धा यामध्ये आघाडीवर आहेत. मोबाईल घेऊन दिला नाही, गेम खेळायला नकार दिला यामुळे सुद्धा लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. हात आणि पायासह शरीराचे सर्व अवयव सुस्थितीत असताना सुद्धा कोणताही विचार न करता आत्महत्येचा विचार केला जातो. मात्र या जगात अशा अनेक व्यक्ती आहेत. ज्यांना फक्त हात किंवा पाय यापैकी एकच अवयव असताना सुद्धा अशक्यप्राय गोष्टी त्यांनी शक्य केल्या आहेत. मात्र यालाही अपवाद असणारा संपूर्ण जगात एकमेव व्यक्ती आहे ज्याला जन्मताच दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाहीत, तरीही जगाच्या कानाकोपऱ्यात त्याच्या नावाची आज दखल घेतली जाते. त्याला आवर्जून बोलावले जाते. त्याचे नाव म्हणजे Nick Vujicic (Nick Vujicic biography) होय. आत्महत्येसारखा भिकार विचार करणाऱ्या तरुणांनी यांचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा.
लेखक, Life Without Limbs चा संस्थापक आणि आपल्या भाषण शैलीतून करोडो नागरिकांना जगण्याची दिशा दाखवणारा Motivational Speaker म्हणजे Nick Vujicic. दोन्ही हात आणि पाय नसताना सुद्धा कोणाचीही मदत न घेता सामान्य माणसांसारखे तो त्याचे जीवन जगत आहे. खोल पाण्यात बिंदास पोहतो. हातपाय असणार्या एखाद्या व्यक्तिला ज्या गोष्टी जमणार नाहीत, त्या गोष्टी तो सहज करतो. हे सर्व त्याने शक्य केल ते अफाट जिद्द, कधीही हार न मानण्याची वृत्ती, लढवय्या स्वभाव आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे. टेट्रा-अमेलिया सिंड्रोन नावाच्या दुर्मिळ विकाराने त्याला घेरलं होतं. अनेकवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला. मात्र गर्भातच गगनभरारी घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या निकने सर्व विकारांना धूळ चारून जगाच्या पटलावर अगदी थाटात आपला डंका वाजवला. त्याचा खडतर आणि प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत आवर्जून वाचा.
निकचा जन्म झाला आणि आई-वडिलांना धक्का बसला
Nick Vujicic हा एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन प्रेरक वक्ता, लेखक आणि ना-नफा संस्था Life Without Limbs चा संस्थापक आहे. निकचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात 4 डिसेंबर 1982 रोजी ड्युशांका आणि बेरिस्लाव वुजिसिक यांच्या घरी झाला. निकच्या जन्मामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. निकला जन्मताच Phocomelia (टेट्रा-अमेलिया सिंड्रोम) या दुर्मिळ विकाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का होता. त्याच्या आई वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांचा एका क्षणात चोथा झाला होता. कारण निकला इथून पुढचे संपूर्ण आयुष्य दोन्ही हात आणि पायांशिवाय जगावे लागणार होते. सामान्य मुलांप्रमाणे त्याला खेळता किंवा बागडता येणार नव्हते. या विचारांनी सुरुवातीला त्याच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला होता. मात्र, त्यांनी कधीही निकला याची जाणीव होऊ दिली नाही. ते त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याला पाठिंबा दिला.
साहजिक दोन्ही हातपाय नसल्यामुळे निकचे बालपण खडतर गेले. इतर मुलं ज्या गोष्टी सहज करू शकत होते. त्या गोष्टी निक करू शकत नव्हता. तो मोठा होता गेला आणि त्याला त्याची जाणीव व्हायला लागली. आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याची सतत त्याला जाणीव होऊ लागली. याच जाणिवेतून तो नैराश्यात जाऊ लागला आणि नैराश्यातून त्याने वयाच्या 10 व्या वर्षी पहिल्यांदा बाथटबमध्ये बुडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बालमनावर वाईट परिणाम होत होते. मात्र, या कठीण काळात त्याच्या आई वडिलांनी त्याला पाठिंबा दिला त्याला प्रेरित केलं.
एक लेख अन् निकच्या आयुष्याला कलाटणी मिळाली
निकला हातपाय नसले तरी त्याची बुद्धी तरबेज होती. वाचनाची त्याला आवड होती. असाच एक दिवस स्थानिक वृत्तपत्र वाचत असताना एक लेख त्याने वाचला. त्या लेखामध्ये एका मुलाची स्टोरी सांगण्यात आली होती. त्या मुलाने अपंगत्वावर यशस्वी मात केली होती. त्या मुलाची संपूर्ण कहाणी वाचून निकला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याच्या डोळ्यावर असणारी अपंगत्वाची झापड कायमची उडून गेली. तो लेख वाचल्यानंतर त्याला समजलं की, आपण ज्या समस्येने ग्रासलो आहोत. तसे अनेक लोक या जगात आहेत. जे अपंगत्वावर मात करत यशाची चव चाखत आहेत. त्या एका लेखामुळे निकचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आणि सकारात्मक दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली.
प्रेरक वक्ता म्हणून कारकिर्दीला सुरुवात
निकने हळूहळू यशाच्या दिशने पाऊल टाकायला सुरुवात केली. त्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करण्याता निर्धार त्याने केला होता. सुरुवातीला त्याने लिहायला आणि संगणकावर टायपिंग शिकायला सुरुवात केली. याच दरम्यान त्याने वयाच्या 17 व्या वर्षी शाळेत आणि चर्चच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रेरणादाई भाषण देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे श्रोत्यांना त्याची बोलण्याची शैली आवडली आणि त्याला दाद सुद्धा दिली. अशा पद्धतीने वयाच्या 21 व्या वर्षी निकने ग्रिफिथ विद्यापीठातून Accounting And Finance मध्ये डबल पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्याने Motivational Speaker म्हणून आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात केली.
निकने हळूहळू आपल्या कक्षा रुंदावल्या आणि पुढचे पाऊल टाकतं Attitude is Attitude या नावाने एक कंपनी सुरू केली. त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळे श्रोत्यांमध्ये त्याची चर्चा व्हायला सुरुवात झाली. स्थानिक पातळीवर लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. शाळा, महाविद्यालयांमध्ये त्याला बोलावले जाऊ लागले. ज्यांनी ज्यांनी त्याला लहान असताना हिनवलं त्या सर्वांना त्याने चोख प्रत्युत्तर दिले.
निक आणि त्याचे कुटुंब | Nick Vujicic Wife
निकने आपल्या भाषण शैलीमुळे सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग देशभरात वाढू लागला होता. याच काळात त्याच्या आयुष्यात पत्नी काना मियाहार हिचा प्रवेश झाला. 12 फेब्रुवारी 2012 रोजी दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्न झाल्यानंतर निकला त्याच्या पत्नीने सुद्धा चांगली साथ दिली. दोघांना चार मुले आहेत. दोघांनी मिळून पुढील आयुष्याच्या दिशेन यशस्वी वाटचाल केली. कालांतराने त्यांनी प्रेरणा आणि सकारात्मकतेचा संदेश जगभरात पोहचवण्यासाठी ‘Life Without Limbs’ नावाची ना-नफा संस्था सुरू केली.
निकने सुरू केलेल्या या संस्थेमार्फत जगभरातील अनेक देशांना त्याने प्रेरक वक्ता म्हणून भेट दिली आहे. लोक स्वत: त्याला बोलावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 81 देशांना त्याने भेट दिली आहे. यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये विशाखापट्टनम येथील आंध्रा युनिवर्सिटीमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले होते. जवळपास 10,000 विद्यार्थ्यांनी त्याचा शो लाईव्ह अटेंड केला होता.
निकचे वेगळेपण
अपंगत्वावर मात करत त्याने आपल्या अंगी असणारे वेगळेपण स्वीकारत त्याचे अनुभव शेअर करून त्यांनी जगभरातील लाखो लोकांना आजपर्यंत प्रेरणा दिली आहे. सध्याच्या घडीला निक वुजिसिक हा अनेक पुस्तकांचे लेखक आहे. ज्यात Life Without Limbs आणि अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून जगण्याचा उद्देश शोधणे, अडथळ्यांवर मात करणे आणि आत्मसन्मान वाढवणे यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. Life Without Limbs या संस्थेच्या माध्यमातून निक आणि त्याची संपूर्ण टीम जागतिक स्तरावर शाळा, व्यवसाय आणि विविध समुदायांना भाषणे, प्रेरक चर्चा आणि शैक्षणिक संसाधने वितरीत करत आहेत. तसेच अपंगत्व जागरुकता आणि विश्वासावर आधारित प्रेरणा याविषयीच्या वकिली कार्यासाठी देखील निक ओळखला जातो. निकचे जीवन आणि कार्य हे लवचिकता, विश्वास आणि सकारात्मकतेच्या सामर्थ्याचा पुरावा आहे, अपंगत्व सारख्या खडतर आव्हानाला बाजूला सारून जगभरातील करोडो लोकांना जीवनातील आव्हानांना सकारात्मक दिशा दाखवण्याचे काम तो करत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.