Noel Tata – रतन टाटा यांचे उत्तराधिकारी, किती आहे नोएल टाटा यांची संपत्ती? वाचा सविस्तर…

रतन टाटा यांचे उत्तराधिकारी

भारताच्या मुकुटातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे उद्योगपती Ratan Tata यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार याची सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर निर्णय झाला आणि रतन टाटा यांचे सावत्र भाऊ 67 वर्षीय Noel Tata यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कोण आहेत नोएल टाटा? काय आहे त्यांची पार्श्वभूमी? कसं गेलं त्यांच बालपण? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत आवर्जून वाचा.

नोएल टाटा यांच्या जीवनप्रवासाकडे जाण्यापूर्वी टाटा समूहाच्या दोन सर्वात मोठ्या धर्मादाय संस्थांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्या प्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर असणार आहे. यापूर्वी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून काम करण्याचा अनुभव नोएल टाटा यांच्या गाठीशी आहे. परंतु, आता नोएल टाटा यांच्यावर या दोन्ही संस्थांची संपूर्ण जबाबदारी असणार आहे. विशेष बाब म्हणजे टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो आणि टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची 66 टक्के भागीदारी आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विविध धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याची काम केले जाते.

कोण आहेत नोएल टाटा?

नोएल टाटा हे भारतातील सर्वात प्रभावशाली आणि सामर्थ्यवान कुटुंबातील प्रमुख सदस्य आहेत. व्यवसायाचे बाळकडू बालवयातचं त्यांना मिळाले होते. व्यवसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे व्यवसायातील खाचखळग्यांची त्यांना पूर्वीपासूनच कल्पना होती. नवल टाटा आणि आई सिमोन टाटा यांच्या पोटी 1957 साली नोएल टाटा यांचा जन्म झाला. रतन टाटा यांचे ते सावत्र भाऊ आहेत. प्रतिष्ठित घरात जन्म झाल्यामुळे सहाजिकच शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी अतुलनीय कामगिरी केली.

नोएल टाटा यांचे शिक्षण मुंबई आणि युकेच्या सक्सेस विद्यापीठात झाले आहे. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनंतर अर्थशास्त्रामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी यूकेच्या सक्सेस विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांचा शैक्षणिक प्रवास पुढेही सुरू राहिला. त्यांनी युकेमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर फ्रान्समधील प्रतिष्ठित बिझनेस स्कूल असलेल्या INSEAD मध्ये प्रवेश घेतला. या स्कूलमध्ये त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केला. घरात व्यवसायाचे वातावरण त्यांना बालवयातचं अनुभवायला मिळाले होते. या वातावरणाला नोएल टाटा यांनी शिक्षणाची जोड दिली आणि आपला चौफेर व्यवसायिक दृष्टिकोन विकसित केला. त्यानंतर त्यांच्या व्यवसायिक कारकि‍र्दीला सुरुवात झाली.

नोएल टाटा यांची व्यवसायिक कारकिर्द / Noel Tata companies

नोएल टाटा यांची संपूर्ण व्यवसायिक कारकिर्द अर्थातच टाटा समूहाशी निगडीत आहे. कुटुंबातील पूर्वजांनी उभं केलेले वटवृक्ष अधिक उंचीवर घेऊन जाण्याची जबाबदारी नोएल टाटा यांच्या सुद्धा खांद्यावर होती. रतन टाटा यांच्या हाती सर्व कार्यभार असल्यामुळे नोएल टाटा यांचा परिचय बऱ्याच लोकांना नव्हता. परंतु नोएल टाटा यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे टाटा सन्सला भरपूर फायदा झाला आहे. टाटा समूहाच आज जे काही जगभरात नाव आहे. हे नाव अधिक उंचीवर घेऊन जाण्यात नोएल टाटा यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे.

नोएल टाटा यांनी आपल्या आतापर्यंतच्या व्यवसायिक कारकिर्दीमध्ये टाटा ट्रस्ट, ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनेचे अध्यक्षपद, टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक, टायटन कंपनी आणि टाटा स्टीलच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. त्यांच्या या प्रवासाची थोडक्यात आपण माहिती घेऊ.

नोएल टाटा यांच्या कारकि‍र्दीची सुरुवात टाटा इंटरनॅशनमधून झाली. टाटा इंटरनॅशन ही परदेशात उत्पादन आणि सेवा पुरवणारी टाटा समूहाची महत्त्वाची शाखा आहे. व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली आणि कंपनीच्या हितासाठी शक्य ते योग्य निर्णय घेतले. सिमोन टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा समूहाच्या रिटेल शाखा ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जून 1999 मध्ये नोएल टाटा यांनी पदभार स्विकारला.

या दरम्यान ट्रेंटने डिपार्टमेंट स्टोअर लिटलवुड्स इंटरनॅशनल या कंपनीची खरेदी केली. तसेच याच्या नावात बदल करून त्याचे नामकरण ‘वेस्टसाइड’ असे केले. नोएल टाटा यांनी आपल्या बुद्धी चातुर्याने वेस्टसाइडचा चांगला विकास केला आणि एका फायदेशीर कंपनीत त्याचे रुपांतरण केले. नोएल टाटा यांच्या कामाचा धडाका पाहून सर्वांनाच कौतुक वाटले आणि त्यांच्यावर अजून जबाबदारी सोपवण्यात आली. 2003 साली टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टासचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

नोएल टाटा यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर सर्वजण प्रभावित झाले होते. रतन टाटा यांचा सुद्धा यामध्ये समावेश होता. त्यामुळेच 2010-11 मध्ये घोषणा करण्यात आली आणि टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. टाटा इंटरनॅशनल ही कंपनी परदेशातील व्यवसायाशी संबंधीत आहे. जेव्हा नोएल टाटा यांची टाटा इंटरनॅशनलच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली, तेव्हा समाजमाध्यमांवर आणि उद्योगविश्वात नोएल टाटा यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून तयात केले जात असल्याच्या चर्चांना उधान आले होते.

परंतु या सर्व चर्चांना 2011 साली पूर्ण विराम बसला कारण सायरस मिस्त्री यांची रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र, सायरस मिस्त्री फार काळ या पदावर टिकू शकले नाहीत. ऑक्टोबर 2016 साली त्यांना हटवण्यात आले आणि पुन्हा रतन टाटा यांनी फेब्रुवारी 2017 पर्यंत अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पुढे 2018 मध्ये नोएल टाटा यांची टायटन कंपनीच्या उपाध्यक्ष पदावर निवड झाली. फेब्रुवारी 2019 मध्ये सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डावर नोएल टाटा यांना घेण्यात आले. पुढे मार्च 2022 मध्ये नोएल टाटा टाटा स्टीलचे उपाध्यक्ष झाले.

नोएल टाटा आणि कौटुंबिक जीवन / Noel Tata family

पालोनजी मिस्त्री हे एक बांधकाम व्यवसायिक आणि टाटा सन्समधील सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक आहेत. पालोनजी मिस्त्री यांची मुलगी आलू मिस्त्री यांच्याशी नोएल टाटा यांचे लग्न झाले आहे. नोएल टाटा आणि आलू मिस्त्री यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुले सध्या टाटा समूहाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

नोएल टाटा यांची सर्वात मोठ्या मुलगीचे नाव लेआ टाटा असे आहे. लेआ हिने माद्रिदमधील IE बिझनेस स्कूलमधून मार्केटींगमध्ये आपली पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लेआ सुद्धा टाटा समूहात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहे. लेआ सध्या टाटा हॉस्पिटॅलिटीची शाखा असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडमध्ये उपाध्यक्ष आहे.

नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा हा सुद्धा यशस्वी व्यावसायिक आहे. सध्या स्टार बाजारच्या नेतृत्वाची जबाबदारी नेव्हिल टाटावर आहे. नेव्हिलने INSEAD मधून MBA ची पदवी घेतली आहे. नेव्हिलने आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात मुख्य रिटेल शाखा असलेल्या ट्रेंट लिमिटेडमधून केली. त्यानंतर झुडिओमध्ये ऑपरेशन्स डिपार्टमेंटची जबाबदारी पार पाडली आणि आता स्टार बाजारला यशस्वी करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नोएल टाटा यांची दुसरी मुलगी माया टाटा. रतन टाटा यांच्या निधनानंतर आणि नोएल टाटा यांची उत्तराधिकारी पदावर निवड झाल्यानंतर. सोशल मीडियावर माया टाटा हीचे नाव चर्चेमध्ये होते. मायाने आपले शिक्षण लंडनमधील बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून पूर्ण केले आहे. शिक्षण जरी परदेशातून पूर्ण केले असले तरी त्यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात टाटा समूहासोबत केली.

टाटा कॅपिटलची उपकंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंड या कंपनीमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याबरोबर टाटा ग्रुपमध्ये टाटा न्यू लाँच सुरू करण्यात माया टाटा यांचे मोठे योगदान आहे. माया टाटा या टाटा कॅपिटलमध्ये विश्लेषक म्हणून कार्यरत होत्या. पंरतु आता माया टाटा या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्ड सदस्य आहेत. त्याबरोबर टाटा डिजिटलमध्ये सुद्धा त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. प्राथमिक माहितीनुसार माया टाटा यांना टाटा ट्रस्टचे संभाव्य उत्तराधिकारी मानले जात होते.

नोएल टाटा यांची संपत्ती किती?  Noel Tata net worth

नोएल टाटा यांची नेमकी संपत्ती किती याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे टाटा कुटुंबाची संपत्ती वैयक्तिक संपत्तीऐवजी टाटा समूह आणि टाटा ट्रस्टशी जोडलेली आहे. त्यामुळे नोएल टाटा यांच्या संपत्तीचा अंदाज लावता येऊ शकत नाही.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment