Peb fort information in Marathi; कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला

सह्याद्रीने महाराष्ट्राला भरभरुन दिले आहे. धबधबे, गडकिल्ले, डोंगररांगा, नद्या शब्द अपुरे पडतील ऐवढी निसर्ग संपदा या सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळेच ऊन, वारा आणि पाऊस याचा विचार न करता सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मुंबई,नवी मुंबई, पुणे आणि ठाणेकरांसाठी जवळ असणारा किल्ला म्हणचे पेब किंवा विकटकड (Peb Fort Information in Marathi). माथेरानच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या टुमदार गडाला तुम्ही आवर्जून भेट दिली पाहिजे. य गडाची सविस्तर माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

कड्यावरच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारा हा गड रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये वसला आहे. कड्यावरचा गणपती तसेच गडावर सर्वात उंचीवर असणारे गणपतीचे मंदिर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्रा बाहेरील लोकं सुद्धा आवर्जून भेट देतात. गणपती मंदिर टॉपला असल्यामुळे मंदिरातून दिसणारं सह्याद्रीचं देखणं रुप डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी तुम्ही सुद्धा आतुर असाल, तर म वाट कसली पाहताय नियोजन करा, बॅग भरा आणि वेळ न दवडता गडाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. पण तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील. जसे की गडावर जायचे कसे? गडावर जाणारा कोणता मार्ग सोपा आहे आणि कोणता मार्ग अवघड आहे? गडावर राहण्याची सोय आहे का? गडावर पिण्याचे पाणी आहे का? लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे सुरक्षित आहे का? असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतील. पण काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉगमध्ये मिळणार आहेत.

पेब (विकटकड) / Peb fort Information In Marathi

गडाचा इतिहासावर नजर फिरवली, तर तुमच्या निदर्शनास येईल की पेब गडावर स्वराज्याच्या काळात धान्याचा साठा ठेवला जायचा. तशी नोंद इतिहासामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे स्वराज्याचे धान्य कोठार अशी एक ओळख पेब किल्ल्याची आहे. गडावर असणाऱ्या मुर्त्या आणि कड्यावरील गणरायाची देखणी मुर्ती सर्वांच्या आकर्षणाचे मुख्ये केंद्र आहे. तसेच गडावर काही (माळडुंगे मार्गे) तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदीच्या सहाय्याने गडावर जाण्यासाठी शिडीची व्यवस्था करण्यात आली आहे. इथूनवर गेल्यानंतर गडावर पुरातन बांधकामांचे अवशेष आणि दत्ताच्या पादुका आढळून येतात.

गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था

पेब गडाची कमाल उंची 2,050 फुट आहे. गडावर जाण्याचे तीन ते चार मार्ग आहेत. पनवेलमधील माळडुंगे या गावातून गडावर जाणारी वाट ही काही ठिकाणी थोडी अवघड आहे. मध्यम श्रेणीची चढण असलेला हा गड घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. माळडुंगे या गावातून ट्रेक सुरू केल्यास वाटेमध्ये पडक्या वास्तुंचे अवशेष पाहायला मिळतात. इथून थोडे अंतर पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची देखणी मुर्ती लक्ष वेधून घेते. गडावर पोहचल्यावर चांगल्या स्थितीमध्ये असणारे गणपतीचे मंदिर आणि सह्याद्रीचे देखणे रुप निदर्शनास येते.

गडावर जाण्यासाठी कोणता मार्ग सोईस्कर आहे?

पेब गड हा मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून येणार्‍या निसर्ग प्रेमींसाठी जवळचा गड आहे. गडावर जाण्याचे चार ते पाच मार्ग आहेत. नवी मुंबई, मुंबई आणि पुण्यावरून गडावर जाणाऱ्यांसाठी प्रामुख्याने पनवेल माळडुंगेमार्गे पेब किल्ला हा मार्ग सोईस्कर असेल. माळडुंगे गावाच्या हद्दीपासून ट्रेकला सुरुवात करता येते. ज्यांना खरचं सह्याद्रीचे देखणे रुप डोळ्यात साठवायचे आहे, त्यांनी या मार्गाने ट्रेक करून गडावर जायला हरकत नाही. आम्ही सुद्धा याचमार्गे गडावर गेलो होते. या मार्गे गडावर जाण्यासाठी म्हणजचे माळडुंगे पर्यंत येण्यासाठी स्वत:ची गाडी असेल तर उत्तम, अन्यथा प्रवास मोठा होऊ शकतो.

गडावर जाणारा दुसरा मार्ग हा प्रामुख्याने नेरळ आनंदवाडीमार्गे पेब किल्ला असा आहे. नेरळ रेल्वे स्थानकार उतरल्यानंतर खासगी वाहनाने आनंदवाडी पर्यंत पोहचता येते. आनंदवाडी पासून पुढे ट्रेकला सुरुवात होते. या मुख्य मार्गांव्यतिरिक्त नेरळ मार्करमार्गे पेब किल्ला, वांगणी नाखिंडमार्गे पेब किल्ला आणि वाघाची वाडी वरून पेब किल्ला हे काही अन्य मार्ग आहेत. परंतु शक्यतो माळडुंगे आणि आनंदवाडीमार्गे गडावर जाण्यास प्राधान्य द्यावे.

गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय आहे का?

माळडुंगे मार्गे गडावर जाताना वाटेमध्ये एक गुहा लागते या गुहेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. तसेच स्वत:चा टेंट असेल तर गडावर योग्य जागा बघून राहता येऊ शकते. जेवणाची गडावर कोणतीही सोय नाही. त्यामुळे गडावर जाताना पाण्याची आणि जेवणाची सोय तुम्हालाच करावी लागणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या बॉटल किंवा जेवन घेऊन गडावर जाणार असाल, तर तो कचरा गडावर न फेकता गडाच्या पायथ्याला येऊन कचराकुंडीत टाका.

गडावर गेल्यावर काय बघणार?

एक ते दोन तासांचा ट्रेक करून वरती आल्यानंतर पाहायचं काय? हा प्रश्न नवख्या ट्रेकर्सच्या मनात निर्माण होते. गडावर पोहचल्यावर हवामान स्वच्छ असेल तर गडावरून मलंगगड, ताहुली, प्रबळगड, कलावंतीण आणि चंदेरी हे गड आणि माथेरानचे पठार नजरेस पडते. सह्याद्रीचे देखणे सौंदर्य पाहायला मिळते. तसेच गडावरील मुख्य आकर्षण म्हणजे कड्याचा गणपती लक्ष वेधून घेतो. याव्यतिरिक्त गुहा, गणपती मंदिर, तटंबदी, दत्ताच्या पादुका व माथेरान ते पनवेलपर्यंतचा विस्तीर्ण परिसर पाहता येतो. तसेच पेब किल्ल्याच्या पायथ्याशी पेब देवीचे मंदिर पाहयला मिळते.

माथेरानच्या मिनी ट्रेनचा ट्रेक आलोंडून गडाच्या दिशेने जाताना डोंगराच्या एका सुळक्याला गणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. हा सुळका रंगवण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीची भव्य मुर्ती कोरल्याचा भास होतो. लांबून पाहिल्यास ही विलोभणीय मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते.

हे लक्षात ठेवा

1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.

Leave a comment