PM Vidyalaxmi Scheme – उच्च शिक्षणासाठी सरकार देणार कर्जावर व्याज सवलत, टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी

श्रीमंत असो अथवा गरीब शिक्षण हे सर्वांसाठीच गरेजचं आहे. शिक्षणाच्या जोरावर गरिबीच्या चिखलातून श्रीमंतीच्या सोफ्यावर बसण्याचा आनंद घेणाऱ्यांची संख्या जगाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने आहे. योग्य शिक्षण घेतल्यामुळे अनेकांनी आपल्या गरिबीवर मात केल्याची अनेक उदाहरणे तुम्ही सुद्धा पाहिली असतील. श्रीमंताच्या घरात जन्मलेल्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक चणचण अजिबात भासत नाही. पैशांच्या जोरावर पाहिजे त्या ठिकाणी आणि पाहिजे त्या महाविद्यालयात त्यांना शिक्षण मिळते. परंतु मध्यमवर्गीय किंवा अत्यंत गरीब घरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण घेताना आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे चांगलीच तारांबळ उडते. उच्च शिक्षण घ्यावं का नाही? हा प्रश्न वारंवार त्यांना सतावत राहतो. परंतु आता तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी भारत सरकारने PM Vidyalaxmi Scheme सुरू केली आहे. 

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य, शिक्षण कर्जाची प्रक्रिया सुलभ करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबू नये यासाठी ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार ठरते. चला या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. 

योजनेचा मुख्य उद्देश

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी शिक्षण कर्ज उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ आल्यास विद्यार्थ्यांना सोपी आणि पारदर्शक कर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देणे. तसेच विद्यार्थ्यांना डिजिटल अर्ज प्रणाली आणि विविध बँकांचा पर्याच या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजावर सवलत आणि सुरक्षा म्हणून गहाण न ठेवता कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेच चांगला फायदा करून घेता येईल. 

PM Vidyalaxmi Scheme अंतर्गत कोणती मदत मिळणार?

  • ₹10 लाखांपर्यंत शिक्षण कर्ज
  • कोणतीही गहाण किंवा हमीदार न घेता कर्ज
  • व्याजावर सवलत:
    – वार्षिक उत्पन्न ₹4.5 लाखांपर्यंत असल्यास पूर्ण व्याज सवलत
    – वार्षिक उत्पन्न ₹4.5 लाख ते ₹8 लाख दरम्यान असल्यास 3% व्याज सवलत
  • डिजिटल अर्ज प्रक्रिया – Vidya Lakshmi पोर्टलद्वारे
  • एकाच अर्जावर अनेक बँकांमध्ये अर्ज करण्याची सुविधा
  • शैक्षणिक संस्थांशी थेट संपर्क व समन्वय

PM Vidyalaxmi Scheme साठी पात्रता काय आहे?

  • विद्यार्थी भारतीय नागरिक असणे आवश्यक
  • विद्यार्थ्याने  10+2 किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असणे
  • विद्यार्थ्याने राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असणे (NIRF रँकिंगनुसार)
  • विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपर्यंत असणे
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे उच्च शिक्षणासाठी कर्ज घेण्याची गरज असणे
  • मॅनेजमेंट कोट्यातून प्रेवश घेतलेले विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र
  • इतर कोणतीही शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजना घेतलेली नसावी.
  • एका कोर्ससाठीच एकदाच सवलत (UG/PG/इंटीग्रेटेड कोर्स).

PM Vidyalaxmi Scheme साठी पात्र शिक्षण संस्था

  • राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारच्या अव्वल 200 संस्था
  • NIRF यादीतील अव्वल 100 संस्थांमध्ये समाविष्ट असणाऱ्या केंद्रशासित संस्था
  • भारत सरकारच्या अखत्यारीतील उर्वरित सर्व संस्थांचा समावेश

7 टप्प्यांमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

  1. विद्या लक्ष्मी पोर्टलला भेट द्या: www.vidyalakshmi.co.in
  2. नोंदणी करा: वैयक्तिक माहिती, शिक्षण तपशील भरा
  3. अर्ज फॉर्म भरा: Common Education Loan Application Form (CELAF)
  4. बँक निवडा: जास्तीत जास्त 3 बँका निवडण्याचा पर्याय
  5. दस्तऐवज अपलोड करा: प्रवेश पत्र, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, इतर कागदपत्रे
  6. अर्ज सबमिट करा: निवडलेल्या बँकांकडून संपर्क साधला जाईल
  7. कर्ज मंजुरी: प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध होईल

PM Vidyalaxmi Scheme चा लाभ कोणाला?

  • ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना
  • गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना होतकरू विद्यार्थ्यांना
  • परदेशात किंवा देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी कर्ज हवे असलेल्या विद्यार्थ्यांना
  • व्याजदरामुळे शिक्षण थांबू नये यासाठी मदत हवी असलेल्या विद्यार्थ्यांना

PM Vidyalaxmi Scheme च्या अंमलबजावणीसाठी कॅनरा बँक (Canara Bank) ही नोडल बँक म्हणून कार्यरत आहे. कॅनरा बँक पुढील जबाबदाऱ्या पार पडणार आहे, या जबाबदाऱ्यांमध्ये, 

  • अर्ज प्रक्रियेचे समन्वयन
  • शिक्षण कर्ज मंजुरीसाठी बँक आणि विद्यार्थ्यांमध्ये दुवा साधणे
  • व्याज सवलत योजना अंमलात आणणे
  • अर्जासाठी पोर्टल विकसित आणि व्यवस्थापित करणे
  • बँकांच्या नेटवर्कद्वारे विद्यार्थ्यांना सेवा प्रदान करणे

कॅनरा बँकेशी संपर्क

  • मुख्य कार्यालय – जेवण प्रकाश इमारत, 113-1, जयचामराजेंद्र रोड, हो अँनेक्स, बेंगळुरू – 560002, कर्नाटका
  • टोल-फ्री – 1800 1031
  • ईमेल – support@pmvidyalakshmi.co.in

“ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. अधिकृत तपशील व अर्जासाठी कृपया संबंधित संकेतस्थळाला भेट द्या.”