दरवर्षी राज्यातील हजारो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांना बसतात. परंतु मोजकेच विद्यार्थी यशस्वी होतात. अनेक रात्री जागून अभ्यास केल्यानंतर मिळालेलं हे यश जेव्हा साजरं करण्याची वेळ येते, तेव्हा मिळणारा परमोच्च आनंद शब्दात सांगता येत नाही. असाच आनंद 2023 च्या PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आलेल्या अश्विनी केदारी (PSI Ashwini Kedari) यांना झाला असेल. PSI झाल्यानंतर जिल्हाधिकारी (Collector) होण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. परंतु नियतीने घात केला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अश्विनी केदारी पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू गावातील मुळ रहिवासी आहेत. 28 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी त्या अभ्यास करण्यासाठी लवकर उठल्या होत्या. याच दरम्यान अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी त्यांनी ठेवले होते. पाणी किती तापले हे पाहण्यासाठी त्या बाथरुममध्ये गेल्या असता हिटरचा त्यांना शॉक लागला आणि उकळत पाणी त्यांच्या अंगावर पडलं. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेत त्या 80 टक्के भाजल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास 11 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबासह पाळू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.