Punganur cow – उंची लहान पण किर्ती महान, जगातील सर्वात छोटी गाय दुध किती देते? जाणून घ्या सर्व माहिती

Punganur Cow ही छोटी गाय लहाणांपासून मोठ्यांपर्यंच सर्वांसाठीच एक चर्चेचा विषय ठरली आहे. कमी जागेत, कमी खर्चात आरोग्यसंपन्न असणारी ही गाय अनेक अंगांनी फायदेशीर आहे. आपल्या भारतामध्ये गायीला “गोमाता” म्हणून पुजलं जातं. परंतु जागेअभावी बऱ्याच वेळा इच्छा असूनही गोमातेची सेवा करण्याच भाग्य अनेकांना मिळत नाही. तर अशा नागरिकांसाठी पुंगनूर गाय हा एक उत्तम पर्याय आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तुम्ही घरात पुंगनूर गायीचे संगोपन अगदी सहज करू शकता. याचीच सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  

पुंगनूर गाय म्हणजे काय?

पुंगनूर गाय ही भारतातील एक स्थानिक गायींची जात असून ती मुख्यतः आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर गावातून उगम पावलेली आहे. तिचे शरीर लहान, पाय आखूड, आणि शेपटी लहान असते. तिच्या वैशिष्ट्यांमुळे तिला “ड्वार्फ गाय” (Dwarf Cow) असेही म्हणतात. तिचे वजन सुमारे 150 ते 250 किलो असते आणि उंची केवळ 70 ते 90 सें.मी. पर्यंत असते.

1. कमी जागेत संगोपन शक्य

पुंगनूर गाय लहान असल्यामुळे ती फार मोठी जागा न व्यापता सहज संगोपन करता येते. शहरी भागात, टेरेसवर, बागेत किंवा कमी जमिनीच्या शेतातसुद्धा तिचे पालन करता येते. त्यामुळे ज्यांच्याकडे शेत नाही, पण गायीचे दूध वापरायचे आहे किंवा जैविक शेती करायची आहे, त्यांच्यासाठी ती उत्तम पर्याय ठरते.

2. कमी चाऱ्यात जास्त दूध

पुंगनूर गायीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती फार कमी अन्नावर तग धरते. साधारणतः ती दिवसाला 5 ते 6 किलो कोरडा चारा व थोडंसं पाणी खाऊनही 2 ते 5 लिटर A2 दूध देते. यामुळे ती इतर मोठ्या गायींच्या तुलनेत कमी खर्चात जास्त फायदेशीर ठरते.

3. A2 दूध – आरोग्यदायी अमृत

पुंगनूर गाय A2 प्रकारचे दूध देते, जे प्राचीन भारतीय गायींपासून मिळतं. A2 दूधात असणारे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, CLA (Conjugated Linoleic Acid), ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स हे हृदयासाठी, मेंदूसाठी आणि पचनासाठी फायदेशीर असतात. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि मधुमेह, हृदयविकार, कर्करोगग्रस्त रुग्णांकरिता हे दूध अमृतासमान मानलं जातं.

4. औषधी गुणधर्म असलेलं दूध व मूत्र

पुंगनूर गायीचे दूध, शेण व गोमूत्र यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदातही या गायीच्या गोमूत्राचा उपयोग विविध रोगांवर उपचारासाठी केला जातो.
त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. गोमूत्रापासून गोमूत्र अर्क, पंचगव्य, औषधी द्रव्ये तयार केली जातात.

5. शेणाचा वापर जैविक शेतीसाठी

पुंगनूर गायीच्या शेणातून जैविक खत तयार करता येते. हे शेण जिवामृत, घनजिवामृत, वर्मी कंपोस्ट, बीजामृत, अशा अनेक नैसर्गिक पद्धतींमध्ये वापरले जाते. किटकनाशक, रासायनिक खतांपासून मुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही गाय एक वरदान आहे.

6. रोगप्रतिकारक क्षमता चांगली

ही गाय स्थानिक हवामानाशी सहज जुळवून घेते. ती फारशी आजारी पडत नाही आणि त्यामुळे डॉक्टरांची गरज कमी पडे, औषध खर्च कमी, आणि संगोपन अधिक सोयीचे होते. कोरड्या हवामानातही ती सहज तग धरते. तिचं आरोग्य टिकवायला फार मेहनत लागत नाही.

7. शांत स्वभाव आणि देखभालीस सुलभ

पुंगनूर गाय खूपच शांत स्वभावाची असते. ती लहान मुलांना त्रास देत नाही, आणि फारसा आवाजही करत नाही. तिचे देखभाल करणे फारसे कठीण नाही. रोजच्या वेळेवर खाणं-पिणं दिल्यास ती आनंदात राहते.

8. धार्मिक महत्त्व आणि पूज्य स्थान

भारतीय धर्मपरंपरेत गाय पूजनीय मानली जाते. पुंगनूर गाय लहान आणि गोंडस असल्यामुळे पूजेमध्येही याला महत्त्व आहे. काही लोक तिच्या दुधाचा उपयोग पंचामृत, होम-हवन, आणि तीर्थ तयार करण्यासाठी करतात.

9. स्वतःच्या घरासाठी दूधाचा स्रोत

आजकाल बाजारात मिळणाऱ्या दुधात भेसळ असते. अशा वेळी जर तुमच्याकडे पुंगनूर गाय असेल, तर तुम्ही शुद्ध, आरोग्यदायी, A2 दूध रोज मिळवू शकता. हायप्रेशर मशीनवर दूध काढण्याची गरज नसल्यामुळे गायीला त्रास होत नाही आणि ती नैसर्गिक पद्धतीने दूध देते.

10. व्यवसायिक संधी

पुंगनूर गायीच्या दुधाला बाजारात चांगली किंमत मिळते. लोक A2 दूधासाठी अधिक पैसे द्यायला तयार असतात. त्याशिवाय, तिच्या गोमूत्र व शेणाचा वापर जैविक खत, औषधी तयार करण्यात केला जातो, ज्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणूनही ती फायदेशीर आहे. पुंगनूर गाय ही लहान असूनही मोठे फायदे देणारी गाय आहे. ती आरोग्यदायी, खर्चिक नसलेली, आणि शाश्वत शेती व जीवनशैलीसाठी उपयुक्त अशी गाय आहे.

आता तुम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे पुंगनूर गायीची किंमत किती आहे? (punganur cow price)

सध्याच्या बाजारात पुंगनूर गाय ₹50,000 पासून 1,000,000 किंवा त्यापेक्षाही जास्त दरात मिळतात. सामान्यत 1 ते 5 लाख या श्रेणीत अनेक गाय उपलब्ध असतात.