Satara News बेकायदेशीर खडी क्रशर बंद करण्यात यावा, यासाठी सुरू असलेला कुसगांव, व्याहळी, एकसर ग्रामस्थांचा लढा आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. लाँग मार्च दरम्यान जेवण करत असताना कोंडाबाई शिंदे यांना अचानक स्ट्रोक आला. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. गावकऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोंडाबाई शिंदे या एकसर गावातील पार्टेवाडीतल्या रहिवासी आहेत. खडी क्रशरच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात त्या सक्रियपणे सहभागी होत्या.
अधिक माहिती अशी की, दुपारी जेवणाच्या वेळेत कोंडाबाई शिंदे यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ जवळील रुग्णालयात हलवण्यात आलं त्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु या घटनेमुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ रस्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं. त्यामुळे काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. तसेच आंदोलनकर्त्यांनी कात्रज बोगद्यात अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी प्रशासानाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.