Satara News – वाई, खंडाळा, महाबळेश्वर भूमिगत विद्युत वाहिनीसाठी 39.83 कोटी रुपये मंजूर, मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वाई, महाबळेश्वर आणि खंडाळा तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूरी दिली आहे. 15 व्या वित्त आयोगातून 39.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य आपत्ती सौम्यीकरणांतर्गत मकरंद पाटील यांनी महावितरण कंपनीकडून वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील भूमीगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी पुढाकार घेतला होता. तसेच तसा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. मकरंद पाटील यांच्या या प्रस्तावाला देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर या प्रस्तावाला राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

15 व्या वित्त आयोगातून या कामासाठी 39.83 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. वाई शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणे आणि खांब उभारण्यासाठी 10.01 कोटी, लोणंद पालिकांतर्गत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी 12.22 कोटी, महाबळेश्वर शहरातील भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यासाठी 8.05 कोटी आणि पाचगणी शहरातील कामांसाठी 9.55 कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.